दिवाळीत सात्त्विक वस्तूंचा वापर करून सजावट केल्यास देवतांच्या तत्त्वाचा लाभ होतो !
१. देवतांचे तत्त्व आकर्षित करण्यासाठी प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांपासून बनवलेले तोरण लावावे !
‘दिवाळीच्या दिवसांत आपले घर किंवा कार्यालय यांमध्ये देवतांचे तत्त्व आकर्षित करण्यासाठी प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांपासून बनवलेले तोरण लावावे. सध्या लोक रंगीबेरंगी कागद, प्लॅस्टिकच्या पताका किंवा चकचकीत कागदाची तोरणे लावतात किंवा प्लास्टिकच्या मोत्यांच्या माळांनी घराचे प्रवेशद्वार सजवतात. या सर्व गोष्टी सात्त्विक नसल्याने त्यांच्यात देवतांचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता नसते. शक्य असल्यास घराच्या प्रवेशद्वारावर केळीच्या खांबाने सजावट करावी. त्यामुळे देवतांचे तत्त्व सहजतेने आपल्या घरात प्रवेश करते. (महाराष्ट्रात दिवाळीला असे करण्याची पद्धत नाही.)
२. विदेशी फुलांना सुवास नसून त्यांचा आकारही देवतांचे तत्त्व आकर्षित करू शकत नसल्याने पूजेत या फुलांचा वापर करू नये !
शहरात काही लोकांच्या घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही विदेशी फुलांचा किंवा प्लॅस्टिकच्या गुच्छांचा उपयोग करतात. विदेशी फुलांना सुवास नसतो आणि त्यांचा आकार देवतांचे तत्त्व आकर्षित करू शकत नाही. काही विदेशी फुलांना सुगंध असतो; परंतु तो मायावी असून वाईट शक्तींना आकृष्ट करणारा असतो. त्यामुळे प्राचीन मंदिरांमधील पूजेत विदेशी फुलांचा वापर करत नाहीत.
३. आज हिंदूंना ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ या गोष्टींविषयी ठाऊक नसल्याने त्यांना प्रत्येक विदेशी वस्तूविषयी प्रेम वाटते अन् दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून विदेशी वस्तूंचा सर्रास वापर केला जातो.
४. दारासमोर रांगोळी काढण्याचे महत्त्व
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीतत्त्व आकर्षित करणारी रांगोळी आणि इतर दिवशी संबंधित देवतेचे तत्त्व, उदा. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णतत्त्व आकर्षित करणारी रांगोळी काढावी. दारासमोर रांगोळी काढल्यास वास्तूतील नकारात्मक शक्ती आणि स्पंदने नष्ट होऊन घरात सात्त्विक स्पंदने आकर्षित होतात.’ – पू. तनुजा ठाकूर (२६.१०.२०२१)