सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधिकांना झालेले लाभ आणि त्यांनी स्वतःमध्ये अनुभवलेले पालट
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (प.पू. गुरुदेवांच्या) कृपेने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये गेल्या २ मासांपासून आध्यात्मप्रसार करणार्या काही साधकांचा नियमित व्यष्टी आढावा घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, गोवा राज्य आणि कोकण प्रांत येथील काही साधक प्रतिदिन त्यांना व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देतात. या सत्संगामुळे सर्व साधिकांमध्ये सकारात्मकता आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे सेवा आणि व्यष्टी साधना यांतील आनंदही अनुभवता येत आहे. यातील काही साधकांचे प्रयत्न सद्गुरु ताई आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत. सद्गुरु ताईंना अपेक्षित असे प्रयत्न करण्यास आम्ही अजूनही पुष्कळ अल्प पडत आहोत. ‘त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी शरणागतभावाने प्रयत्न करता येऊ देत’, अशी सद्गुरु ताईंच्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे. – आढाव्यातील सर्व साधिका’ (भाग १)
सौ. विद्या कदम, सातारा
१. आधीची स्थिती
‘पूर्वी व्यष्टी साधना पूर्ण करण्यासंदर्भात माझ्या मनाची नकारात्मक स्थिती असायची. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प आणि वरवरचे होत असत. त्यामुळे मला अन्य साधकांचा आढावा घेतांना ताण यायचा. माझ्या चुकांचे प्रमाण पुष्कळच असायचे. ध्येय ठरवतांना नियोजन करून कृती केली जात नसे. माझ्या स्वतःकडून आणि साधकांकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या; परंतु स्वतःत पालट होण्यासाठी माझे कृतीशील प्रयत्न नसायचे. आपल्याकडून काहीच होत नाही; म्हणून मला निराशा असायची.
साधना करण्यासाठी मन संघर्ष करायला सिद्ध नसायचे. जेव्हा मला साधना समजली होती, तेव्हाची मनाची स्थिती पाहिली, तर देव आणि इतर यांच्याप्रती अंतर्मनामध्ये पुष्कळ प्रेम वाटायचे. त्या वेळी ‘मला पुष्कळ काही मिळाले आहे’, अशी भावना होती; पण ‘आता ती कुठेतरी अल्प झाली आहे आणि मनाला पुष्कळ कोरडेपणा आला असून ते रुक्ष झाले आहे’, असे वाटायचे.
२. व्यष्टी आढावा सत्संगामुळे अनुभवलेले पालट
२ अ. आढाव्यापासून प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागणे आणि मनातील निरर्थक विचार थांबून नामजप भावपूर्ण होऊ लागणे : सद्गुरु स्वातीताई यांनी दोन मासांपूर्वी आमचा प्रतिदिन व्यष्टी प्रयत्नांचा आढावा घ्यायला आरंभ केला. तेव्हापासून मला प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. सद्गुरु ताई प्रतिदिन ‘नामजप करतांना विविध भाव कसे ठेवायचे ?’, हे सांगतात. तसे प्रयत्न होऊ लागले. तेव्हा मनाला उभारी येऊ लागली. मनाची सकारात्मकता आणि उत्साह वाढला. मनात आत्मविश्वास निर्माण झाला. ध्येय ठेवून प्रयत्न होऊ लागले. आधी दोन घंटे नामजप पूर्ण व्हायला पाहिजे; म्हणून नामजप करायचे; परंतु आता ‘नामजप अधिक करावा’, असे मनाला वाटते. नामजपातून आनंद मिळतो आणि शांतता जाणवते. ‘आतून नामजप चालू आहे’, असे वाटते. आता ‘मनात काय चालू आहे ?’, याचा अंतर्मुख होऊन आढावा घेता येऊ लागल्यामुळे अयोग्य विचारांवर मात करता येत आहे. मनात येणारे असंख्य निरर्थक विचार थांबवण्यास साहाय्य झाले. प्रत्येक प्रसंगात मन ‘योग्य-अयोग्य काय ?’, असा विचार करू लागले. देवाला आत्मनिवेदन स्वरूपात मी माझ्या मनाची विचारप्रक्रिया सांगू लागले.
२ आ. नामजपादी उपायांमुळे शरीर आणि मन यांना आलेली मरगळ निघून जाऊन मन उत्साही बनणे : आवरण काढतांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ, उदबत्ती आणि मोरपीस यांचा वापर करतांना त्या वस्तू नसून देवाने दिलेली शस्त्रे आहेत अन् तीच माझ्यात सात्त्विकता निर्माण करण्यासाठी साहाय्य करत आहेत’, या विचाराने त्यांच्याप्रतीही कृतज्ञता वाटते. कापूर आणि अत्तर यांच्या उपायांतून शरिराला हलकेपणा जाणवतो. शरीर आणि मन यांना आलेली मरगळ निघून जाते. मन उत्साही बनते.
२ इ. देवता, प.पू. गुरुदेव, सद्गुरु ताई आणि प.पू. गुरुदेव यांच्याप्रती अखंड कृतज्ञता वाटणे : सकाळी उठल्यापासून सूर्यदेवता, पृथ्वीदेवता, जलदेवता, अग्निदेवता, अन्नपूर्णामाता, वास्तुदेवता आणि वायुदेवता यांना प्रार्थना होऊ लागल्या. त्यांच्याप्रती मनात कृतज्ञताभाव जागृत होऊ लागला. हे सर्व सद्गुरु ताईंनी माझ्यात निर्माण केले; म्हणून त्यांच्याप्रतीही अखंड कृतज्ञता वाटते.
हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच होत आहे, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता.’ (१५.३.२०२०)
सौ. मनाली भाटकर, गोवा
१. आधीची स्थिती
‘आधी माझा नामजप दोन घंटे व्हायचा; परंतु तो पूर्ण करायचा; म्हणून केला जायचा. स्वयंसूचनांची सत्रे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय, बगलामुखी स्तोत्र ऐकणे, आवरण काढणे व्हायचे; परंतु त्यामध्ये भाव नसायचा. पूर्वी माझ्या मनात नकारात्मक विचार येऊन मला निराशा यायची.
२. व्यष्टी आढावा सत्संगामुळे अनुभवलेले पालट
२ अ. नामजप भावपूर्ण होऊ लागणे : केवळ प्रतिदिन व्यष्टी आढावा देत असल्यामुळे आणि सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगामुळे भाव ठेवून प्रयत्न करता येऊ लागले. आता नामजप भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होतात. इंद्रियांवर मानस नामजप लिहिणे आणि ‘इंद्रिये नामजप करत आहेत ना ?’, हे अनुभवता येऊ लागले.
२ आ. मनाचा उत्साह आणि सकारात्मकता वाढणे : व्यष्टी साधना दिवसभरात पूर्ण करायची आहे, हे अंतर्मनापासून वाटू लागले. त्यामुळे मनाचा उत्साह आणि सकारात्मकता वाढून प्रसंगांवर मात करता येऊ लागली. सेवा करण्याचा उत्साह वाढला. ‘मी आणखी काय करायला पाहिजे ?’, हे देव सुचवू लागला. ‘त्याप्रमाणे करण्यासाठी देवच मला शक्ती देत आहे आणि तो करवूनही घेत आहे’, हे अनुभवता येऊ लागले.
२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांशी अनुसंधान वाढल्याने त्यांचे सूक्ष्मातून अस्तित्व अनुभवता येणे आणि स्थिरता येणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून अस्तित्व अनुभवणे आणि त्यांच्याशी अनुसंधान ठेवणे वाढले. एकदा रात्री ९ वाजल्यानंतर बसने एका केंद्रात जायचे होते. मी एवढ्या रात्री बसने कधी एकटीने प्रवास केला नव्हता. मी गोव्यात नवीन असल्याने माझी कुणाशी ओळखही नव्हती. त्या दिवशी ती बसही पुष्कळ विलंबाने आली; परंतु त्या वेळी मला स्थिर रहाता आले. बसमध्ये पुष्कळ गर्दी होती. बसायलाही जागा नव्हती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आता या वेळी माझ्या समवेत प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून आहेत का ? ते माझ्या समवेत आहेत, हे मी कसे ओळखू ?’ त्याच वेळी बसमधील एका अनोळखी मुलीने मला विचारले, ‘‘तुम्ही सनातनच्या साधिका आहात का ?’’ मी ‘‘हो’’ म्हटल्यावर तिने स्वतः उभे राहून मला बसायला जागा दिली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. गुरुदेवांनी ‘ते माझ्या समवेत आहेत’, याची अनुभूती दिली, त्यासाठी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२ ई. केंद्रातील साधकही सकारात्मक होऊन त्यांचेही व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढणे : माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू झाल्यानंतर केंद्रातील साधकही सकारात्मक होऊन त्यांचेही प्रयत्न वाढल्याचे लक्षात आले. तसेच केंद्र आणि राज्य सत्संग यांमध्ये भाववृद्धीचे प्रयत्न चालू केल्यामुळे सत्संगही भावपूर्ण होऊ लागले. त्यामुळे साधकांचा उत्साह आणि सत्संगातील सहभाग वाढला.
२ उ. सद्गुरु ताईंच्या मार्गदर्शनामुळे ‘भावभक्ती वाढायला पाहिजे’, असे वाटणे : सद्गुरु ताई प्रतिदिन करत असलेल्या मार्गदर्शनामुळे ‘माझ्यातील भावभक्ती वाढायला पाहिजे’, असे मला आतून वाटू लागले. त्यासाठी भावपूर्ण प्रार्थना होऊ लागली, वेगवेगळा भाव ठेवून ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न देवच करवून घेत आहे’, हे अनुभवता येऊ लागले. त्यामुळे त्यातील आनंदही घेता येऊ लागला.
प्रतिदिन सद्गुरूंचा सत्संग आणि दिव्यवाणी ऐकल्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यासाठी त्यांच्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (१५.३.२०२०)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/524489.html
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |