‘फेसबूक’च्या काल्पनिक जगाची भयावहता !

संपादकीय

समाजमाध्यमांचे दुष्परिणाम पहाता ‘मेटा’चे आभासी जग भारतात चालू होण्यापूर्वीच कायदे करायला हवेत !

‘फेसबूक’ ‘मेटा’ 

‘फेसबूक’ या आस्थापनाने ‘मेटा’ हे नाव आता धारण केले आहे. केवळ पैशांसाठी ग्राहक वाढतात म्हणून द्वेषपूर्ण टीका, भांडणे लावणे, हिंदुद्वेष आदी गोष्टी फेसबूकवर चालू दिल्या जात असल्यामुळे फेसबूकची जगात अपकीर्तीही होत आहे. त्यामुळे नाव पालटण्यामागे काही धोरणे पालटणे, प्रतिमा सुधारणे हा फेसबूकचा उद्देश तर आहेच; पण त्याचसमवेत फेसबूक ‘मेटा व्हर्स’ नावाची एक नवीन आभासी जगाची यंत्रणा घेऊन येत आहे. त्यामुळे जे काही या जगात होणार आहे, त्याचे दुष्परिणाम हे फेसबूकच्या सध्याच्या दुष्परिणामांपेक्षा अतिशय भयंकर आहेत. पुढील काही वर्षांत फेसबूकवर अशी यंत्रणा येणार आहे, ज्यातून आपण एका आभासी जगात जाऊ शकणार आहोत आणि या आभासी जगातून प्रत्यक्ष खरेदी वगैरेही करू शकणार आहोत. आतापर्यंत आपण समाजमाध्यमांद्वारे निरोप देणे, लिखाण करणे, छायाचित्र किंवा व्हिडिओ ठेवणे आदी गोष्टी करत होतो. त्यात ‘आपण आणि ते समाजमाध्यम’ अशी दुहेरी साखळी होती. आता याला एक तिसरा कोन येणार आहे. ‘मेटा’च्या माध्यमातून ‘अशा एका आभासी जगात जाता जाणार आहे की, एकदा त्या जगात गेल्यावर पुढील काही गोष्टी या आपल्या हातातही रहाणार नाहीत’, असे आहे. ‘मेटा’च्या या आभासी जगात आपण जगाच्या पाठीवर कुठेही, कधीही जाऊ शकणार आहोत. या आभासी विश्वात गेल्यावर ‘कुणाशी आपले भांडण झाले आणि त्याने आपल्याला मारले, तर ते आपण थांबवू शकणार नाही’, अशी त्यात गुरफटून जाण्याची योजना आहे. या माध्यमातून समजा ‘आपल्याला मोठी अभिनेत्री व्हायचे आहे’, तर आपण तसे होऊ शकणार आहोत; पण ‘अभिनेत्री झाल्यावर काय करायचे ?’ हे आपल्या हातात रहाणार नाही. यामुळे याचा मनावर फार मोठा परिणाम होणार आहे. यामुळे एकतर मनोरंजनाचे पुष्कळ सुख मिळेल किंवा त्यामुळे कदाचित् पुष्कळ दुःखही होईल; परंतु त्यात माणूस पुरता गुरफटून जाईल. युवा पिढी याच्या आहारी जाऊन मनोरुग्णही होऊ शकते. सध्या समाजमाध्यमांत अती गुंतून राहिल्यामुळे अनेक शारीरिक अडचणींपासून विविध मानसिक अडचणींपर्यंत आणि अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होण्यापासून मुलांनी आत्महत्या किंवा हत्या करण्यापर्यंत अनेक दुष्परिणाम आपण मुळातच भोगत आहोत. पालक मुलांकडे दुर्लक्ष करत आहेत, लग्न मोडत आहेत, फितुरी होत आहे, घोटाळे होत आहेत, व्यसने वाढत आहेत. एक ना अनेक गोष्टींसाठी ही समाजमाध्यमे या ना त्या कारणाने साहाय्यभूत ठरत आहेत. ‘मेटा’च्या संभाव्य आभासी जगामुळे नवीन गुन्हे निर्माण होतील आणि त्यासाठी नवीन कायदे बनवावे लागतील. भारत ‘मेटा’ची मोठी ग्राहकपेठ आहे. येणार्‍या काळात वरील विषयाच्या संदर्भात सतर्कता वाढवून प्रसार करणे, हे सजग नागरिकांचे कर्तव्य राहील !