पुढील काही वर्षे कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे

मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – अद्यापही कोरोनावर रामबाण उपाय सापडलेला नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन चाचणी करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे कुणाला काही वेगळे वाटल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी. पुढील काही वर्षे कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. १ नोव्हेंबर या दिवशी ‘वर्षा’ या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सध्या राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १ सहस्र ३०० मेट्रिक टन इतकी आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यास दीड वर्ष लागेल; मात्र ‘कोरोना गेल्यानंतर ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे काय करायचे ?’ हा प्रश्न आहे. मला जे काम करायचे आहे, ते मी येथून करत आहे. त्यासाठी मंत्रालयात गेलेच पाहिजे, असे नाही. केंद्रशासनाकडून मुलांसाठी कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे; मात्र अद्याप लस आलेली नाही. पालकांनी मुलांच्या लसीकरणाविषयी सतर्क रहावे.’’