मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
विविध मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्यांचे आरोप आणि कारवाईचे प्रकरण
कोल्हापूर, २ नोव्हेंबर – सरकारमधील एका मंत्र्याला भ्रष्टाचारावरून अटक झाली. एका मंत्र्याच्या नातेवाईकांकडे १ सहस्र २०० कोटी रुपयांची मालमत्ता मिळाली. अमली पदार्थांच्या संदर्भात एका मंत्र्याच्या नातेवाइकावर कारवाई झाली. एका मंत्र्याच्या जावयाचे १ सहस्र ५०० कोटी रुपयांचे कंत्राट रहित झाले. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून त्यागपत्र देऊन मध्यावधी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी २ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘सर्व कायदेशीर पर्याय संपल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीला सामोरे जावे लागले आणि मध्यरात्री त्यांना अटक झाली. आता असा कोणताही गुन्हा उरला नाही, ज्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर नाही. राजकारणातील नैतिकता महाविकास आघाडीने धुळीस मिळवली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आहे. राज्याने कर अल्प केले, तर पेट्रोल, डिझेल यांचे दर अल्प होतील; पण अजित पवार इंधनाच्या करातून मिळणारा आयता पैसा सोडायला सिद्ध नाहीत.’’