फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !

कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये दिवाळी आणि अन्य सणांच्या वेळी फटाके फोडण्यावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने रहित केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; परंतु त्यांचा अपवापर रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक भक्कम करावी लागेल.’ यासह न्यायालयाने बंदी असलेले फटाके आणि संबंधित वस्तू राज्यात आयात केल्या जाणार नाहीत, याची राज्याच्या प्रवेशद्वारांवरच निश्‍चिती करण्याचे निर्देश बंगाल सरकारला दिले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी बंगालमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री, वापर आणि खरेदी यांवर बंदी घालणार्‍या कोलकाता उच्च न्यायालयाच्या २९ ऑक्टोबरच्या आदेशाच्या विरोधातील याचिकांवर सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

तमिळनाडूमध्ये फटाके फोडण्यासाठी दिवसभरात २ घंट्यांची मर्यादा

तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाके फोडण्यासाठी दोन घंट्यांचा कालावधी घोषित केला आहे. त्यानुसार सकाळी ६ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ८ या वेळातच फटाके फोडता येणार असल्याचे पर्यावरण आणि वन विभागाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

देहलीमध्ये फटाक्यांवरील बंदी कायम !

देहलीत फटाक्यांवर बंदी असतांना भारत-पाक सामन्यात भारताचा पराभव झाल्यावर धर्मांधांनी फटाके कसे फोडले ? आणि पोलीस अन् देहली प्रशासन यांनी त्यांच्यावर काय कारवाई केली ?, हे जनतेला समजले पाहिजे !

देहली – देशाची राजधानी देहलीमध्ये फटाके फोडण्यावर असलेली बंदी कायम राहील, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.

देहलीच्या हवेच्या अतीवाईट गुणवत्तेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने २ डिसेंबर २०२० या दिवशी सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि वापर यांवर पूर्णपणे बंदीचे निर्देश दिले होते.