सणानिमित्त शुभेच्छा देतांना एकमेकांना शुभेच्छापत्र देण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्याव्यात !
दिवाळी सात्त्विकदृष्ट्या साजरी करण्याच्या पद्धती
१. वैदिक संस्कृतीतील व्रते आणि सण हे आपल्यातील प्रेमभाव अन् सद्भावना यांचा संदेश देतात !
‘आपण सणानिमित्त शुभेच्छा देतांना एकमेकांना शुभेच्छापत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्याव्यात. त्यामुळे आपल्याला शुभेच्छा देण्याचे चांगले फळ मिळते आणि आपल्यामध्ये प्रेमभावही वाढतो. शुभेच्छापत्र देण्याची पद्धत विदेशी लोकांनी चालू केली. आजही शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून आपल्या भारत देशातून अनेक विदेशी आस्थापने कोट्यवधी रुपये लुटून नेत आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीतील व्रते आणि सण हे आपल्यातील प्रेमभाव अन् सद्भावना यांचा संदेश देतात.
२. सणांनिमित्त आपण एकमेकांना भेटल्याने मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आपल्यापेक्षा लहानांना प्रेम अन् आशीर्वाद देतो !
आपल्या संस्कृतीमध्ये अवडंबर आणि दिखाऊपणा याला स्थान नाही, म्हणून आजही लहान गावांत होळी आणि दिवाळी या सणांना एकमेकांना भेटण्याची पद्धत आहे. त्यासह दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांनिमित्त आपण आपल्या नातेवाईकांना स्वतःहून भेटण्याची पद्धत आहे. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून आपण त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आपल्यापेक्षा लहानांना प्रेम अन् आशीर्वाद देतो. आपल्याकडून उत्स्फूर्तपणे काहीच न लिहिलेल्या एका कागदाच्या तुकड्यावर इतरांनी लिहिलेल्या भावनाशून्य संदेशातून कधी आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त होईल का ?
३. प्रत्यक्षात न भेटता दिलेल्या शुभेच्छापत्रांमुळे आपल्या नात्यात अजून दुरावा निर्माण होतो आणि व्यक्ती-व्यक्तींमधील प्रेम न्यून होते !
सध्या महानगरात रहाणारे लोक आपल्या शेजारी रहाणार्या लोकांशी साधे बोलतही नाहीत. स्वतःच्या कोशात संकुचितपणे राहिल्यामुळे हे शहरी लोक अत्यंत एकाकी आणि तणावग्रस्त असतात. अशा लोकांच्या घरी नातेवाईक आमंत्रण नसतांना (आगंतुकपणे) आले, तर त्यांचा तोंडवळा पडतो. अशा भावनाशून्य काळात शुभेच्छापत्रांमुळे व्यक्ती-व्यक्तींमधील प्रेम न्यून होते आणि आपल्या नात्यात अजूनच दुरावा निर्माण होतो. अनेक घरे आणि व्यावसायिक संस्था यांच्याकडे दिवाळीच्या वेळी आलेली शुभेच्छापत्रे न उघडताच दिवाळीनंतर ती सरळ रद्दीवाल्याला दिली जातात.
४. आपण आपल्या वैदिक संस्कृतीचे प्रत्येक अंग पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे !
ईश्वराने मला ग्रामीण भागात रहाण्याचे सौभाग्य दिले आहे. तेथेही धर्माचा नाश झाला आहे; परंतु आजही गाव एखाद्या कुटुंबाप्रमाणे रहाते. प्रथम क्रूर मोगलांनी आपल्या वैदिक संस्कृतीचा नाश केला आणि उरल्या सुरल्या संस्कृतीचा नाश इंग्रजांनी बुद्धीपुरस्सर केला. आता आपण आपल्या वैदिक संस्कृतीचे प्रत्येक अंग पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे.
५. या वर्षीच्या दिवाळीला स्वतः सर्वांना भेटायला जा आणि प्रत्यक्ष शुभेच्छा द्या !’
– पू. तनुजा ठाकूर (२६.१०.२०२१)