कोल्हापूर येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध !
कोल्हापूर – शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ यांचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, नोकरदार, शेतकरी, बेरोजगार युवक, तसेच सर्वसामान्य नागरिक यांना आर्थिक फटका बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतांनाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत करत आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी.’’
या वेळी अविनाश कामते, योगेश चौगले, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, कपिल सरनाईक, दादू शिंदे, सचिन मांगले यांसह युवासेनेचे पदाधिकारी आणि युवासैनिक उपस्थित होते.