हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ‘चलो मडगाव’ या हाकेला प्रतिसाद देत दीड सहस्रांहून अधिक हिंदू गोव्यामध्ये एकवटले !
इस्लामी झेंडे काढण्यासाठी आणखी ६ दिवसांची मुदत, अन्यथा संघटित हिंदू ७ नोव्हेंबरला आपापल्या भागात करणार शक्तीप्रदर्शन ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली पोलिसांना चेतावणी
|
मडगाव, १ नोव्हेंबर (वार्ता.) – दवर्ली परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे ३० ऑक्टोबर २०२१ या निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ‘चलो मडगाव’ अशी हाक समस्त हिंदूंना दिली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिलेल्या या हाकेला हिंदूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवून ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी दीड सहस्र हिंदूंनी मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानात उपस्थिती लावली. यानंतर जमलेल्या हिंदूंनी लोहिया मैदानातून मडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांनी हिंदूंच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. इस्लामी झेंडे काढण्यासाठी आणखी ६ दिवसांची मुदत दिली असून संघटित हिंदू ७ नोव्हेंबरला आपापल्या भागात शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चेतावणी हिंदूंच्या प्रतिनिधींनी पोलिसांना दिली. यानंतर दवर्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे प्रमुख श्री. जयेश नाईक यांनी मालभाट, मडगाव येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिलेल्या स्थानावर उपस्थित हिंदूंना संबोधित करून देशद्रोह्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
श्री. जयेश नाईक आणि त्यांचा मुलगा ओम नाईक यांच्यावर धर्मांधांनी लोखंडी सळीने आक्रमण केल्याची घटना गत आठवड्यात घडली आहे. या घटनेनंतर दुसर्या दिवशी श्री. जयेश नाईक यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातील हिंदू श्री स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या वेळी हिंदूंनी दवर्ली परिसरात ईदच्या निमित्ताने लावलेले इस्लामी झेंडे आणि फलक ३० ऑक्टोबरपर्यंत हटवण्याची मागणी केली होती; मात्र हा निर्धारित कालावधी संपुष्टात येऊनही इस्लामी झेंडे हटवण्यात न आल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘चलो मडगाव’ अशी हाक दिली होती. (पोलीस या झेंड्यांविषयी बघ्याची भूमिका का घेत आहेत ? – संपादक)
प्रारंभी ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी राज्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोहिया मैदानात एकत्र आले. यानंतर हिंदूंनी मडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. मोर्च्यामध्ये ‘सुन ले बेटा पाकिस्तान: बाप तुम्हारा हिंदुस्तान’, ‘धर्म की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे’, ‘कौन चले रे, कौन चले, हिंदुस्थान के वीर चले’, अशा स्फूर्तीदायी घोषणांनी मडगाव शहर दुमदुमले.’’
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली. या प्रकरणी राहुल शानभाग यांनी तक्रार दिल्यानंतर नेमका प्रकार कुठे घडला ? आणि कसा घडला ? यांविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
गोव्यातील मुसलमानांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी मानसिकतेच्या लोकांना समाजातून बाहेर ठेवावे ! – जयेश नाईक, प्रमुख, श्री स्वामी समर्थ मंदिर
यानंतर मोर्चा पुन्हा दवर्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ होत असतांना वाटेत मालभाट, मडगाव येथे ज्या ठिकाणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या २९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या निषेध सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या, त्या ठिकाणी मोर्च्याचे एका छोटेखानी सभेत रूपांतर झाले. या सभेत श्री स्वामी समर्थ मंदिराचे प्रमुख श्री. जयेश नाईक यांनी उपस्थित हिंदूंना संबोधित केले. या वेळी श्री. जयेश नाईक म्हणाले, ‘‘आम्ही गोव्यातील मुसलमानांना सांगू इच्छितो की, त्यांनी गोव्याबाहेरील जिहादी मानसिकतेच्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या लोकांपासून दूर रहावे. जिहादी मानसिकतेच्या लोकांना समाजातून बाहेर ठेवले पाहिजे.’’