साहाय्य न केल्यास शेतकरी मंत्र्यांना बडवल्याविना रहाणार नाहीत !
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्च्यात भाजपचे नेते अनिल बोंडे यांची चेतावणी !
अमरावती – शेतकर्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात गेल्या १५ दिवसांपासून भाजप आवाज उठवत आहे. अमरावतीसाठी साहाय्य करण्याचा निर्णय सरकारने विलंबाने घेतला आहे. त्यातही जिल्ह्यातील अचलपूर, वरूड, मोर्शी आणि चांदुर बाजार तालुका वगळण्यात आला आहे. त्यात संत्र्याच्या पिकाची हानी झाली आहे. महावितरण विभाग वीजदेयके देण्यासाठी शेतकर्यांच्या मागे लागला आहे. वीजतोडणी चालू आहे, त्यामुळे रब्बी पीकही शेतकर्यांना घेता येणार नाही. यंदाही शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांना साहाय्य न केल्यास गावात फिरणार्या मंत्र्यांना शेतकरी बडवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी सरकारला दिली आहे. १ नोव्हेंबर या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यावर साहाय्य जमा करावे, अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा, संत्र्यांची गळती होत असल्याने संत्री उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी १ लाख रुपये साहाय्य द्यावे’, या मागण्या या वेळी करण्यात आल्या.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झुणका-भाकरीचे जेवण करत राज्य सरकारचा निषेध केला, तसेच ‘जनआक्रोश आंदोलन’ करून ‘काळी दिवाळी’ साजरी केली. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.