कुडाळ येथे गोवंशियांची अवैध वाहतूक संतप्त नागरिकांनी रोखली : ३ धर्मांधांना १ दिवसाची पोलीस कोठडी
-
२८ गोवंशासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात : एका बैलाचा गुदमरून मृत्यू
-
चालक आणि पोलीस यांनी नकार दिल्यावर गोप्रेमींनी कंटेनर उघडून गोवंश असल्याचे केले सिद्ध
कंटेनरमध्ये गोवंश आहे, हे स्वतः न पहाणार्या आणि गोप्रेमींचा मागणीनंतरही कंटेनर उघडण्यास नकार देणार्या पोलिसांचे कसायांशी लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण करावे !
कुडाळ – हत्या करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील नेरूर येथून निर्दयपणे गोवंशियांची अवैधपणे वाहतूक करणारा कंटेनर संतप्त नागरिकांनी ३० ऑक्टोबरला शहरातील एस्.एन्. देसाई चौकात पकडला. या वेळी कंटेनरच्या चालकासहित त्याच्या साहाय्यकाने योग्य प्रकारे उत्तर न दिल्याने नागरिकांनी त्यांना चोप दिला. अखेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कंटेनर कह्यात घेतला. या प्रकरणी ३ धर्मांधांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी २८ गोवंश, १ रेडा आणि कंटेनर, असा एकूण २१ लाख ८८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. २८ गोवंशियांमधील एका बैलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पशूवैद्यांनी केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले.
तालुक्यातील नेरूर गावातून बेळगाव येथे हत्या करण्याच्या उद्देशाने गोवंशियांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते, अशा संशय काही नागरिकांना होता. ३० ऑक्टोबरला नेरूर गावातून निघालेला कंटेनर कुडाळ शहरातून जात असतांना भाजपचे अविनाश पराडकर यांनी पाहिला आणि पाठलाग करून हा कंटेनर एस्.एन्. देसाई चौकात पकडला. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले आणि कंटेनरचा चालक अन् साहाय्यक यांना कंटेनरची मागची बाजू उघडण्यास सांगितली; परंतु चालक आणि त्याच्या साहाय्यकाने तसे करण्यास नकार दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांना चोप दिला. या वेळी संतप्त नागरिकांनी ‘गुरांच्या वाहतुकीच्या मुख्य सूत्रधाराला आणावे’, अशी मागणी केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कंटेनर कह्यात घेतला. या वेळी नागरिकांनी कंटेनर उघडण्याची विनंती पोलिसांना केली; मात्र पोलिसांकडून नकार देण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर उघडला आणि आतमध्ये जनावरे असल्याचे पोलिसांना दाखवून दिले. (नागरिकांना अशी भूमिका पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळेच घ्यावी लागते. अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा ! – संपादक)
या प्रकरणी संशयित अक्रम मोहम्मद गौस पाशा (रहाणार चमाराजा नगर, कर्नाटक), शफी मुजावर (मैसुर, कर्नाटक) आणि अझी मुजावर (दुर्गवाड, नेरूर, कुडाळ) यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कंटेनरमधील गोवंशीय आणि १ रेडा यांना कह्यात घेऊन सरसोलीधाम येथील गोशाळेत ठेवले आहे.
राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पक्षभेद विसरून हिंदु म्हणून एकत्र !
या वेळी पोलीस ठाण्याचा परिसर ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमला होता. या वेळी भाजपचे अतुल काळसेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेचे रमाकांत नाईक, दैवेश रेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रसाद नातू, विजय कांबळी, गणेश भोगटे आदी उपस्थित होते. (पक्षभेद विसरून हिंदु म्हणून एकत्र येणारे राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन ! – संपादक) कंटेनरचा पाठलाग करून गोवंशियांची वाहतूक पकडणारे अविनाश पराडकर यांनी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली आहे.