गोरक्षणाचे महत्त्व !
१ नोव्हेंबर २०२१ या दिवशी ‘वसुबारस’ आहे. त्या निमित्ताने…
१. ‘आपण जे अयोग्य साहित्य विकत घेतो, त्यामुळे प्रतिवर्षी एका गायीची हत्या होऊ शकते. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१ अ. तुपाच्या नावाखाली चरबी घालून बनवलेली मिठाई, चांदीचा वर्ख लावलेली मिठाई, चीज, बटर, चरबी घालून बनवलेले खारे पदार्थ, बिस्किट, पाव (ब्रेड), रासायनिक शेतीचे धान्य, उपाहारगृहातील भोजन, एडिटिव्ज (मिश्रित) युक्त बिस्किट, चॉकलेट, आईस्क्रीम, पेय (ड्रिंक), जंक फूड इत्यादी.
१ आ. टूथपेस्ट, साबण, क्रीम इत्यादींमध्ये गायीची हाडे आणि चरबी यांचा उपयोग केला जातो.
१ इ. औषधे : पुष्कळशा औषधी गोळ्यांमध्ये गायीच्या हाडांचा चुरा, गायीपासून (‘बोव्हाईन’पासून) बनवलेले शक्तीवर्धक (टॉनिक), आयर्न शक्तीवर्धक (लोह टॉनिक), कॅप्सूलमधील जिलेटीन.
१ ई. नामांकित कंपनीचे (ब्रँडेड) चप्पल, बूट, पर्स, जीन्स इत्यादी विकत घेणे बंद करावे. विवाह, उत्सव इत्यादी विशेष प्रसंगी याकडे आवर्जून लक्ष द्यावे.
२. एक रुपयाही व्यय न करता प्रत्येक कुटुंब वर्षभर एका गायीचा व्यय उचलू शकतो
तुमच्या घरात जेवढे साहित्य आणले जाते, उदा. भोजन साहित्य (दूध-तूप, धान्य, डाळी, मसाले, मिठाई, खारे पदार्थ, बिस्किट आदी), सौंदर्यप्रसाधने (कॉस्मेटिक), दंतमंजन, टूथपेस्ट, उटणे, साबण, शॅम्पू, तेल, क्रीम, हँडवॉश, औषधे, टॉनिक, धूप, उदबत्ती, फिनाईल इत्यादी. हे साहित्य सर्व गोपालक किंवा गोशाळेद्वारा बनवलेले आपण विकत घेतले, तर आपल्याकडून एक गाय सांभाळली जाऊ शकते.
३. प्रत्येक डेअरीशी एक पशूवधगृह जोडलेले आहे.
४. गोरक्षणासाठी सोपे उपाय
पुढील सहज शक्य असलेल्या सोप्या उपायांमुळे गोरक्षण होऊ शकते.
४ अ. गायीचा मुख्य शत्रू ‘कॉर्पाेरेट’ आस्थापने आहेत. आपण त्यांची उत्पादने किंवा भागभांडवल विकत घेऊ नयेत.
४ आ. गोपालकाची आर्थिक स्थिती बळकट करावी.
४ इ. उन्हाळ्याच्या ३ -४ मासांत आणि दुष्काळाच्या काळात गोपालकांना आधार द्यावा.
४ ई. गायीसाठी देणगी नाही, तर दान द्यावे; देणगी आपल्यापेक्षा लहानांना दिली जाते आणि दान हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणार्यांना दिले जाते. तसेच देणगी दयेवर अवलंबून असते, दान आपले कर्तव्य आहे, उदा. कन्यादान
४ उ. गायीला आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजून तिचा वाटा तिला द्यावा. गायीविना घर अनाथ आणि दरिद्री असते.
५. कापलेल्या नव्हे, तर केवळ मेलेल्या गायीच्या कातड्याच्या वस्तू विकत घेतल्यास गोहत्या थाबू शकणे
ज्यामुळे गोहत्या करणार्यांची शक्ती वाढेल अशी गंभीर चूक आपण करू नये. चांभार आणि कसायी संगनमताने व्यवहार करतात. यासाठी कातड्यांवर बहिष्कार टाकावा. कातडे अपवित्र असते; म्हणून त्यापासून बनवलेला तबला, ढोल, मृदंग मंदिरामध्ये वाजवले जात नाहीत. कातडी सामान विकत घेतांना (खरेदी करतांना) दुकानदाराला विचारा, ‘‘हे मेलेल्या पशूचे आहे कि कापलेल्या पशूंचे आहे ?’’ दुकानदार म्हणतील, ‘‘आम्हाला ठाऊक नाही.’’ त्या वस्तू विकत घेऊ नका. जर त्याने म्हटले, ‘‘मेलेल्या पशूचे आहे’’, तर त्याचा पुरावा मागावा. पुरावा नसेल, तर त्या वस्तू खरेदी करू नका. जेव्हा ग्राहक तुटतील, तेव्हाच त्यांना जाणीव होईल, उदाहरणार्थ आज उपाहारगृहामध्ये जैन भोजन मिळते, तसेच दुकानांमध्ये हिंसा न केलेले कातडे मिळेल. मेलेल्या गायीचे कातडे काढून घ्यावे. त्यामुळे कातड्यासाठी एक जिवंत गाय कापली जाणार नाही.
६. गोरक्षणाचे काम करणार्या आणि गोरक्षण कायद्याचे पालन करणार्या पक्षाला पाठिंबा द्या !
गोभक्तांनो, राजकीय पक्षांच्या मागे लागू नका. त्यांना आपल्या मागे लागू द्या. जो ‘गोरक्षणाविषयी केवळ बोलतो, गोरक्षणाचा कायदा बनवू’, असे म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जो पक्ष गोरक्षणाचे खरोखर काम करील आणि कायद्याचे पालन करील, त्याला पाठिंबा द्या.’
(साभार : ‘संवत्सर सुषमा’ दिनदर्शिका)