६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांच्या स्वप्नामध्ये अनेक संतांनी बालरूपात दर्शन देऊन त्यांना खाऊ भरवण्याचा आग्रह करणे आणि कु. मधुरा यांनी तसे करणे !
‘अशी अनुभूती कुणाला येऊ शकते’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सूक्ष्मातून ज्ञान मिळवणार्या कु. मधुरा भोसले यांना आलेली ही अनुभूती संग्राह्य आहे. अशी अनुभूती अनुभवल्याबद्दल कु. मधुरा यांचे अभिनंदन !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. विविध संतांनी बालरूपात दर्शन देऊन खाऊ भरवण्याचा हट्ट करणे
‘१५.४.२०२० या दिवशी माझ्या स्वप्नात सनातनचे सर्व संत आले. ते माझ्या जवळ येताच त्यांचे बालरूप प्रगट होऊन ते माझ्याकडे त्यांच्या आवडीचा खाऊ खाण्यासाठी मागत होते. तेव्हा अन्नपूर्णामातेच्या कृपेने माझ्याकडून प्रत्येक संतांचा आवडीचा पदार्थ बनवला गेला. तेव्हा संतांच्या बालरूपांनी त्यांचा खाऊ त्यांना भरवण्यास सांगितला. तेव्हा माझा वात्सल्यभाव जागृत होऊन मी प्रत्येक संतांच्या बालरूपाला माझ्या मांडीवर बसवून त्यांना त्यांच्या आवडीचा खाऊ देत होते. तितक्यात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दुरून माझ्याकडे येतांना दिसल्या. त्या जेव्हा माझ्याजवळ आल्या, तेव्हा त्यांचे रूपांतर ४ – ५ वर्षांच्या बालिकांमध्ये झाले. त्यांनी सुंदर रेशमी परकर पोलके घातले होते. बालरूपातील अंजलीताई आणि बिंदाताई यांनी लगेच त्यांच्याजवळील अनुक्रमे शिवलिंग अन् विष्णूची मूर्ती काढून त्यांचे भावपूर्ण पूजन चालू केले. त्यानंतर त्यांनी मला शिवाला दहीभाताचा आणि विष्णूला रव्याच्या शिर्याचा नैवेद्य बनवून दाखवण्यास सांगितला. नैवेद्य दाखवून होताच त्यांची पूजा संपली आणि त्यांनी मला नैवेद्य भरवण्यास सांगितले. त्यानुसार मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या बालरूपाला माझ्या उजव्या मांडीवर आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या बालरूपाला माझ्या डाव्या मांडीवर घेतले अन् दोघींनाही प्रसाद भरवला. तेव्हा त्या दोघी शिव आणि विष्णु यांच्याशी एकरूप झाल्याने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या बालरूपाची कांती विष्णुप्रमाणे निळसर रंगाची दिसून त्यांच्या कपाळावर उभे गंध होते आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या बालरूपाची कांती पांढरी शुभ्र दिसत होती अन् त्यांच्या कपाळावर भस्माचे तीन आडवे पट्टे (त्रिपुंड्रक) होते. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ महालक्ष्मीचे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महाकालीचे बालरूप असल्याचे जाणवून पुष्कळ आनंद जाणवत होता. त्यानंतर योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन बालरूपातील दत्त, परात्पर गुरु पांडे महाराज बालरूपातील गणेश, प.पू. कालीदास देशपांडेकाका बालरूपातील विष्णु, सद्गुरु सत्यवान कदम बालरूपातील शिव, सद्गुरु पिंगळेकाका मारक रूपातील हनुमान आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि प.पू. दास महाराज तारक रूपातील हनुमान, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर बालरूपातील राधा, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये बालरूपातील दुर्गादेवी आणि इतर संत विविध देवतांच्या बालरूपात दिसले.
२. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी आधी विष्णु आणि नंतर शिव यांच्या बालरूपात दर्शन देऊन खाऊ भरवण्याचा हट्ट करणे
इतक्यात परात्पर गुरु डॉक्टर आठवले पांढर्या रंगाच्या पोषाखात माझ्याकडे येतांना दिसले. ते माझ्याजवळ आल्यावर प्रथम मला त्यांच्या ठिकाणी चतुर्भुज विष्णूचे बालरूप आणि नंतर शिवाचे बालरूप यांचे दर्शन झाले. त्यांनीही मला खाऊ भरवण्याचा हट्ट केला. अन्नपूर्णादेवीने आधीच मला परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना गाजराचा हलवा आवडतो; म्हणून तो बनवण्यास सांगितला होता. त्याप्रमाणे मी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या विष्णुरूपातील बालरूपाला गाजर हलवा भरवला. त्यानंतर त्यांनी शिवाचे बालरूप घेतले आणि मी त्यांना दहीभात भरवला.
३. सकाळी उठल्यावर आलेली अनुभूती
सकाळी उठल्यावर मला आदल्या रात्री पडलेले स्वप्न आठवून पुष्कळ आनंद झाला. तेव्हा मला माझे तळहात नेहमीपेक्षा मऊ जाणवले आणि माझ्या बोटांच्या पेरांना वेगळाच सुगंधही येत होता.
‘हे गुरुमाऊली, तुझ्या कृपेमुळे समस्त संत माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी माझ्याकडून खाऊ भरवून घेऊन मला वात्सल्यसुखाची आणि संतरूपी देवांना नैवेद्य भरवण्याची अनोखी अनुभूती दिली’, यासाठी मी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२०)
|