चीनविरुद्ध बहिष्कारास्र !

संपादकीय

भारतियांनी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतल्याने त्याची अनुमाने ५० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने म्हटले आहे की, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनामुळे या सणासुदीच्या हंगामात चीनची एवढी हानी झाल्याचा अंदाज आहे. चीनच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातल्यामुळे भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंच्या विक्रीतही पुष्कळ वाढ झाली आहे. ही वाढ अनुमाने २ लाख कोटी रुपये एवढी होण्याचा अंदाज आहे. ही भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी पुष्कळ चांगली गोष्ट आहे. यातून भारतीय व्यापारी आणि भारतीय यांनाच लाभ आहे. भारतियांनी ठरवले, तर तो चीनची खोड मोडू शकतो, हेसुद्धा यातून सिद्ध झाले.

चिनी ‘ड्रॅगन’च्या कारवाया भारताच्या सीमाभागात चालूच आहेत. चीन ३ वर्षांपूर्वी डोकलाममध्ये अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नापासून सातत्याने भारताच्या खोड्या काढत आहे. विनाकारण सीमावाद उकरून काढून चीन युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. डोकलामच्या वेळी तर चिनी सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘देहलीला चांगला धडा शिकवण्यासाठी चिनी सैन्याने त्यावर आक्रमण केले पाहिजे’, अशी भाषा वापरली होती. त्यामुळे युद्ध होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच वेळी जागृत आणि राष्ट्रप्रेमी भारतियांनी चीनच्या मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गंभीरपणे घेत ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये ‘भारतीय व्यापारी चीनच्या मालावर पूर्णपणे अवलंबून आहेत. ते चीनचा माल घेणे थांबवू शकत नाहीत’, असे सांगत भारतियांना न्यून लेखण्याचा प्रयत्न केला. भारताच्या व्यापारी महासंघाने ‘हे भारतियांच्या देशप्रेमाला ललकारणेच आहे, चीनला ते करून दाखवू’, अशी भूमिका घेतली. त्यांनी लगोलग कार्यवाहीला प्रारंभ केला.

चीनला प्रत्युत्तर !

भारताच्या व्यापारी महासंघाने स्थानिक लघु, मध्यम उद्योजकांना भेटणे, त्यांचे साहित्य व्यापारी महासंघाशी संबंधित दुकानांमध्ये वाटण्यासाठी साखळी सिद्ध करणे, चीनचा माल खरेदी न करण्यासाठी व्यापार्‍यांना आवाहन करणे इत्यादी अनेक मार्ग वापरून चीनच्या मालाविरुद्ध कंबर कसली. त्याचा परिणाम मागील दिवाळीच्या वेळी काही प्रमाणात जाणवला, तर या दिवाळीच्या वेळी अधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. चीनचे साहित्य स्वस्त असले, तरी ते तकलादू आणि कमकुवत असते, हा भारतियांचा अनुभव आहे. पुष्कळ मूल्याच्या वस्तू चीन अगदी अल्प मूल्यात बनवतो; पण त्याच वेळी त्याचा दर्जा आणि गुणवत्ता यांना तिलांजली देतो. चांगले साहित्य, उदा. भ्रमणभाष उत्पादित करून भारतात वितरित केला, तर त्यातून हेरगिरी करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी चीन हा भारताचा शत्रूच ! ‘शत्रूराष्ट्र चीन भारताला काही चांगले देईल’, ही भोळसट आशा आहे, हे भारतियांना उमजले आहे. चीन भारताला केवळ बाजारपेठ म्हणून पहातो आणि तेथील नागरिक, व्यवस्था, सुरक्षा यांच्याशी त्याला काही देणे-घेणे नाही. चीनकडून भारत सणासुदीला ७० सहस्र कोटी रुपयांच्या साहित्याची आयात करतो. या वेळी व्यापार्‍यांनी चीनकडून साहित्य मागवले नसल्याने ही दिवाळी पूर्णपणे भारतीय साहित्य वापरून साजरी केली जात आहे. डोकलामच्या वेळी चीनने दिलेले आव्हान भारतीय व्यापार्‍यांनी स्वीकारून ते ३ वर्षांत पूर्णही करून दाखवले आहे.

गुणवत्तापूर्ण वस्तूंचे उत्पादन हवे !

गत वेळी चीन आणि भारत संघर्षाचा थेट परिणाम चीनमधील भ्रमणभाष उत्पादन करणार्‍या आस्थापनांवर होणार होता. ‘एम्आय’ सारख्या चिनी आस्थापनाचे भ्रमणभाष भारतात विक्रमी संख्येत वितरित होतात आणि तरुण वर्गामध्ये त्या भ्रमणभाषचे पुष्कळ आकर्षण आहे. भारत-चीन संबंध ताणल्यावर या चिनी आस्थापनांनी बनवलेल्या भ्रमणभाषसंचांची विक्री कशी होणार ? या विचाराने त्यांचे धाबे दणाणले होते; मात्र काही देशप्रेम नसलेल्या भारतियांनी स्वस्त आणि अनेक सुविधा असलेले हे भ्रमणभाषसंच विकत घेतले. हे भ्रमणभाषसंच अगदी काही मिनिटांमध्ये ‘ऑनलाईन’ विक्री होतात. ते मिळण्यासाठी भारतीय तरुणांमध्ये स्पर्धा असते. भ्रमणभाषच्या उत्पादनात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही भारतात चांगले आस्थापन नसणे, ही भारतियांसाठी नामुष्की आहे. नवीन चालू होणार्‍या उद्योगांना (स्टार्टअप) मोदी सरकारने चांगले धोरण निर्माण केले आहे. त्यासाठी सुविधा, भांडवलही उपलब्ध करून देण्यात येते. या उद्योगांचा चांगला लाभ होऊन भारतियांना रोजगार उपलब्ध होण्यासमवेत स्थानिक ठिकाणीच आवश्यक त्या वस्तू, साहित्य उपलब्ध होत आहे. यामध्ये स्थानिक दुकानदार, उत्पादक एकमेकांना साहाय्य करत एकमेकांच्या वस्तूंची विक्री वाढवण्याचाही चांगला प्रयत्न करत आहेत. विदेशी आस्थापनांना भारतात त्यांचे उत्पादन घेण्यासाठी (मेक इन इंडिया) पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने आवाहन करतात. त्याच्या परिणामस्वरूप अनेक विदेशी आस्थापने भारतात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून देशाची अर्थव्यवस्था विस्तारण्यास साहाय्यभूत होत आहे. चीनमध्ये उत्पादित करणार्‍या प्रत्येक वस्तूला भारतीय पर्याय आहेत. हे पर्याय काही स्वस्त आहेत, तर काही वस्तू अधिक मूल्य देऊन घ्याव्या लागतील.

चीनच्या सीमाभागात उचापती चालूच आहेत. चीन गुप्तपणे भारताला घेरण्याचा आणि एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सीमेवर ‘हेलिपॅड’ बांधणे, बंकर बांधणे, रस्ते बांधणे, सैन्य तळ उभारणे आदी अनेक उचापती भारताने कितीही विरोध केला, तरी तो करत आहे. यातून चीनचे युद्धाचे मनसुबे ठळकपणे लक्षात येत आहेत. चीन कपटी आणि धूर्त असल्याने कधी युद्धाला प्रारंभ करील, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याला सध्या अप्रत्यक्ष आणि कठोर प्रत्युत्तर देत रहाणे आवश्यक आहे. आर्थिक नाडी ही कोणताही देश, संघटना अथवा व्यक्ती यांची दुखरी नस आहे. ही नस भारतियांना सापडली आहे. ही नस दाबून चीनला पुरते गुदमरवून टाकण्याची संधी भारताकडे आहे. ही संधी साध्य करावी, ही अपेक्षा !