इतरांना आपुलकीने साहाय्य करणारे आणि संपर्कात येणार्यांना साधनेशी जोडणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. भास्कर रघुनाथराव खाडिलकर (वय ६० वर्षे) !
‘श्री. भास्कर रघुनाथ खाडिलकर (काका), म्हणजे देवगड येथील एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व ! ३१.८.२०२१ या दिवशी ते ‘बँक ऑफ इंडिया’, वाडा (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील शाखेतून व्यवस्थापक (मॅनेजर) या पदावरून निवृत्त झाले. साधी रहाणी, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या खाडिलकरकाकांमध्ये ‘झोकून देऊन सेवा करणे, लोकसंग्रह, इतरांना सतत साहाय्य करण्याची वृत्ती, समंजसपणा, सकारात्मक दृष्टीकोन’, असे अनेक समष्टी गुण आहेत. खाडिलकरकाकांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला झालेला आरंभ !
१ अ. सौ. खाडिलकर यांनी सत्संगांना येण्यास आरंभ करणे : ‘वर्ष २००० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यासाठी सौ. बाळेकुंद्री या साधिका खाडिलकर यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. खाडिलकरकाकूंना विषय पटल्यामुळे त्या प्रत्येक रविवारी शाळेत होणार्या सत्संगाला येऊ लागल्या.
१ आ. श्री. खाडिलकरकाकांच्या मनातील शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांनी साधना अन् सेवा करायला आरंभ करणे : त्या सत्संगात २० – २५ लोक त्यांच्या लहान मुलांच्या समवेत सत्संगासाठी यायचे. ती लहान मुले सत्संगात दंगा करायची; म्हणून माझ्याकडे त्यांना बाहेरच्या बाजूला सांभाळायची सेवा होती. खाडिलकरकाका दुचाकीवरून काकू आणि मुले यांना सत्संगासाठी सोडायला यायचे. मी त्यांना सांगायचो, ‘‘विषय चांगला आहे. तुम्हीही ऐका.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘माझ्या मनात काही शंका आहेत. त्यांचे निरसन झाल्यावर मी सत्संगाला येईन.’’ मधूनमधून ते मला काही प्रश्न विचारायचे. मी त्यांना मला जमेल, तशी उत्तरे देत असे. हळूहळू त्यांना विषय पटू लागला आणि काकांनी साधनेला आरंभ केला.
२. खाडिलकरकाकांनी विज्ञापन सेवेला आरंभ करणे
अनुमाने २ मास निरीक्षण केल्यानंतर काका सेवा करू लागले. आरंभी खाडिलकरकाकांनी विज्ञापने आणण्याच्या सेवेला आरंभ केला. त्या सेवेसाठी त्यांनी संपूर्ण देवगड तालुका पालथा घातला आहे.
३. गुणवैशिष्ट्ये
३ अ. साधी रहाणी : काकांना अधिकोषात चांगल्या वेतनाची नोकरी होती आणि काका-काकू दोघे नोकरी करत असूनही त्यांची रहाणी साधी आहे.
३ आ. उत्साही असणे : काका ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह, सतर्कता आणि प्रगल्भ बुद्धी हे गुण शिकण्यासारखे आहेत. त्यांना कधीच कुठल्याही गोष्टीचा आळस किंवा कंटाळा नसतो. त्यांच्या शब्दकोशात ते शब्दच नाहीत. काका सर्व ऋतूंत थंड पाण्याने स्नान करतात.
३ इ. जवळीक साधणे : काकांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते थोड्या कालावधीत लोकांना आपलेसे करून घेतात. त्यामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. ते म्हणतात, ‘आपल्याशी कुणीही कसेही वागू दे, आपण मनात काहीही न आणता त्यांच्याशी चांगलेच वागले पाहिजे. आपण पेरत रहायचे. चांगले उगवल्याविना रहाणार नाही. आपण प्रत्येकाला आपल्या जवळचे चांगलेच द्यायचे. आपले वागणे असे असायला हवे की, त्या व्यक्तीला आपल्याकडे परत यावेसे वाटले पाहिजे.’
त्यांनी जोडलेल्या वाचकांकडे साप्ताहिक आणि रविवारचे दैनिक ‘सनातन प्रभात’ आज २० वर्षांनंतरही चालू आहेत. त्यांनी त्या प्रत्येक घराशी जवळीक साधून त्यांना जोडून ठेवले आहे.
३ ई. इतरांना साहाय्य करणे
३ ई १. ठेकेदाराला व्यवहारात साहाय्य करून साधनेशी जोडून घेणे : त्यांच्या घराचे बांधकाम करणारा ठेकेदार अल्प शिकलेला होता. त्यामुळे पुष्कळ कामे करूनही त्याच्याकडे पैसे शिल्लक रहात नसत. तेव्हा काकांनी १ – २ वर्षांत त्याचे व्यवहार पाहून त्याला त्यातील त्रुटी दाखवून दिल्या. त्याला त्याचा लाभ झाला आणि त्याचे पैसे साठू लागले. तेव्हापासून त्याच्याकडे नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाला. काका त्याच्याकडून अर्पण किंवा विज्ञापनही घेतात. कधी सेवेसाठी ट्रक हवा असल्यास तो ट्रक उपलब्ध करून देत असे.
३ ई २. ग्राहकांची कामे पूर्ण करण्यासाठी साहाय्य करणे : अलीकडे अधिकोषात ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही. पूर्वी काकांनी देवगड तालुक्यातील ३ – ४ ठिकाणच्या शाखांत सेवा केल्यामुळे काही ग्राहक त्यांना सेवेच्या संदर्भात संपर्क करतात. काका त्या त्या शाखेकडे ग्राहकांच्या कामाचा पाठपुरावा करून त्यांचे काम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी पुष्कळ आदरभाव आहे.
३ उ. जिज्ञासूंना रामनाथी आश्रमात आणल्यावर ते सनातन संस्थेशी नेहमीसाठी जोडले जाणे : एखाद्या व्यक्तीला साधना सांगितल्यावर काका नियोजन करून त्या व्यक्तीला रामनाथी आश्रमात घेऊन येतात. त्यामुळे ती व्यक्ती सनातन संस्थेशी नेहमीसाठी जोडली जाते. नंतर काकांचा तिच्याशी सतत संपर्क असतो.
३ ऊ. सेवेची तीव्र तळमळ
३ ऊ १. सकारात्मकता : ‘एखादी सेवा मला जमणार नाही’, असे ते कधीच म्हणत नाहीत. त्यांना तातडीच्या सेवेसाठी विचारल्यावर ते सकारात्मक राहून सेवेत साहाय्य करतात.
३ ऊ २. निवडणुकांच्या कालावधीत काकांनी स्थानिक आमदारांना भेटून त्यांच्याकडून पंचांगांचे प्रायोजकत्व मिळवणे, ‘किती मतदान केंद्रे आहेत ? आणि किती पंचांग वितरित होतील ?’, याचा अभ्यास करणे आणि पंचांगांचे देयकही जमा करून घेणे : वर्ष २०१९ मध्ये निवडणुका होत्या. तेव्हा त्या काळात निवडणुकीला उभा रहाणार्या आमदारांकडून पंचांग प्रायोजित करण्यासाठी प्रयत्न करायचे होते. त्याप्रमाणे लगेचच काकांनी ‘किती मतदान केंद्रे (बूथ) आहेत ? प्रत्येक मतदान केंद्रावर किती पंचांग वितरित करता येतील ?’, याचा अभ्यास केला. नंतर त्यांनी ‘आमदार केव्हा येणार आहेत ? त्यांची भेट कुणाच्या ओळखीतून घेता येईल ? त्यांची भेट कुठे घ्यायची ? विषय कसा मांडायचा ?’, या सर्वांचा अभ्यास केला. आमदार आल्यावर काकांनी त्यांना सनातन संस्थेविषयी माहिती सांगितली. आमदारांनी लगेच २ सहस्र पंचांग घ्यायचे मान्य केले. काकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संपर्क करून पंचांगांचे पैसेही मिळवले.
३ ऊ ३. काकांचे स्थानांतर झाल्याचे कळल्यावर त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे अनेक जण त्यांना भेटायला येणे, काकांनी भेटायला येणार्यांना साधनेशी जोडून ठेवणे आणि प्रसार अन् हिंदू धर्मजागृतीसभा या सेवांसाठी काकांनी साहाय्य करणे : शिरगाव येथील अधिकोषातून त्यांचे स्थानांतर वाडा (तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाले. आधी शिरगाव येथे ‘व्यवस्थापक’ म्हणून जायला कुणीच सिद्ध नव्हते. अधिकोषाची ती शाखा जवळ जवळ बंद पडायला आली होती. काकांनी ते आव्हान स्वीकारले आणि ३ वर्षांत त्या अधिकोषात पालट घडवून आणला. त्यामुळे ‘शिरगाव येथून काकांचे स्थानांतर होत आहे’, असे समजल्यावर अनेक लोक त्यांना भेटायला येत होते. काकांनी त्या २-३ दिवसांत त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधत त्यांना साधना सांगितली आणि २१ साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करून घेतले. काकांचे शिरगाव येथून स्थानांतर झाल्यानंतर अनुमाने २ वर्षांनंतर तिथे हिंदू धर्मजागृतीसभा झाली होती. त्या सभेसाठीही काकांनी पुष्कळ साहाय्य उपलब्ध करून दिले होते.
३ ए. कर्तेपणा नसणे : ‘देवच सेवा करून घेतो’, मी केवळ निमित्तमात्र असतो’, असा त्यांचा भाव असतो.
३ ऐ. गुरुदेवांवर असलेली दृढ श्रद्धा
१. काही वर्षांपूर्वीच त्यांचे जावई गंभीर रुग्णाईत होते आणि त्यांच्या आजाराचे निदान होत नव्हते; परंतु काकांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले सर्व मंत्रोपाय श्रद्धेने केले. त्यानंतर त्यांचे जावई त्या आजारातून पूर्णपणे बरे झाले.
२. कुठल्याही कठीण परिस्थितीत त्यांची गुरुदेवांवर असलेली श्रद्धा कधीच डळमळीत होत नाही. त्यांना कुणाकडूनही काही अपेक्षा नसते. प्रत्येक प्रसंगात ते प्रार्थना करून गुरुदेवांचे साहाय्य घेतात. त्यामुळे त्यांना बळ मिळते आणि त्यांना सतत भगवंताचे निर्गुण तत्त्व अनुभवता येते.
४. काकांमध्ये जाणवलेले पालट
४ अ. कर्मकांडातून उपासनाकांडाकडे वळणे : पूर्वी ते ‘ग्रंथ वाचणे किंवा देवदर्शनास जाणे’, अशा कर्मकांडातील गोष्टी करायचे. आता ते सतत गुरुकृपेसाठी प्रयत्न करतांना दिसतात, उदा. काकांचा तिथीनुसार वाढदिवस झाला, तेव्हा कुठलेही धार्मिक कार्यक्रम न करता त्यांनी गुरुचरणी धन अर्पण केले.
४ आ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढणे : आता ते व्यष्टी साधनेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अलीकडे बर्याच वेळा ‘ते अंतर्मुख झाले आहेत’, असे जाणवते. अलीकडे अनेक वेळा त्यांची बोलतांना भावजागृती होते.
‘हे गुरुमाऊली, काकांमधील हे गुण आमच्यात येऊ देत. काकांची आध्यात्मिक उन्नती लवकर होऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. शेखर इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (१०.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |