कोल्हापूर येथील आखरी रस्त्याच्या कामाचा राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ !
कोल्हापूर, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातील प्रमुख वर्दळीच्या असलेल्या आखरी रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. या कामाची लवकरात लवकर पूर्तता व्हावी, यासाठी या भागातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याविषयी शिवसेनेचे किशोर घाटगे, नंदकुमार मोरे, नीलेश हंकारे आदींनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन रस्त्याचे काम तातडीने चालू करण्याची मागणी केली होती. यावर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तात्काळ चालू करण्याच्या सूचना श्री. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार ३० ऑक्टोबर या दिवशी आखरी रस्त्याचा कामाचा राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या वेळी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘राज्याचे नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा नुकताच पार पडला. या दौर्यात त्यांनी रंकाळा तलाव सुशोभिकरणास ९ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी संमत केला आहे. त्यामुळे येणार्या काळात शिवसेनाच शहराचा विकास करून दाखवेल.’’ या वेळी आखरी रस्त्याच्या कामास प्रारंभ केल्याविषयी प्रभाग क्रमांक २९, ३० आणि ५० मधील नागरिकांच्या वतीने श्री. राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.