कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सौ. प्रमिला केसरकर अंथरुणाला खिळून असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केसरकरकाकूंना वेळोवेळी सांगितलेले नामजपादी उपाय आणि मी (काकूंचे पती अधिवक्ता रामदास केसरकर यांनी) काकूंसाठी केलेले नामजपादी उपाय अन् या उपायांमुळे काकूंना झालेले लाभ’, यांविषयीची सूत्रे या लेखात दिली आहेत. आजच्या लेखात १८.१०.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांनी काकूंच्या आनंदावस्थेविषयी सांगितलेली सूत्रे आणि काकूंच्या निधनसमयी त्यांची झालेली स्थिती याविषयी माहिती दिली आहे.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा !https://sanatanprabhat.org/marathi/522898.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

६. १८.१०.२०२१

६ अ. परात्पर गुरुदेवांनी ‘सौ. प्रमिला यांच्या पायापासून डोक्यापर्यंत आनंद जाणवत असून त्या लवकरच कृष्णाकडे जाणार आहेत आणि आता त्यांच्यासाठी नामजपादी उपाय न करता त्यांच्यासाठी केवळ प्रार्थना करा’, असे सांगणे : ‘१८.१०.२०२१ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता सौ. प्रमिला यांचे शरीर थंड पडले आणि त्या जोरात श्वास घेऊ लागल्या. मी तसे परात्पर गुरुदेवांना कळवले. दुपारी ३.५० वाजता गुरुदेवांनी सौ. प्रमिला यांच्याविषयी चौकशी करून त्यांनी सूक्ष्म परीक्षण केले आणि ते मला म्हणाले, ‘‘कुठेही अडथळा नाही. पायापासून डोक्यापर्यंत आनंदच जाणवत आहे. त्या लवकरच कृष्णाकडे जाणार आहेत. त्या आता आनंदात आहेत आणि आनंदाने पुढच्या प्रवासाला चालल्या आहेत. तुम्ही आता त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करायला नको. केवळ प्रार्थना करा. उमाला (मुलीला) त्या असेपर्यंत त्यांची सेवा करू द्या.’’ (ठाणे येथे रहाणारी माझी मुलगी कु. उमा आईला भेटण्यासाठी १३.१०.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात आली होती. ती त्या वेळी खोलीत आईच्या जवळ उभी होती.)

६ आ. सौ. प्रमिला यांचे शरीर थंड पडत जाणे, अधून मधून त्या जोरात श्वास घेत असणे अन् त्यांच्या डोळ्यांची उघडझाप चालू असतांना त्यांची दृष्टी श्रीकृष्णाच्या चित्राकडे खिळलेली असणे : त्यानंतर मी आणि माझी मुलगी कु. उमा ‘सौ. प्रमिला यांच्या शरिराच्या हालचाली कशा होतात ?’, हे पहात होतो. सौ. प्रमिला यांचे शरीर अगदी थंड पडत चालले होते. त्या अधून मधून जोरात श्वास घेत होत्या. त्यांच्या डोळ्यांची उघडझाप चालू होती. जेव्हा त्या डोळे उघडत, तेव्हा त्यांची दृष्टी खोलीत असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे खिळलेली असे.

अधिवक्ता रामदास केसरकर

६ इ. सौ. प्रमिला यांच्या हाताच्या बोटात ‘ऑक्सिमीटर’ लावून त्यांच्या शरिरातील प्राणवायूचे प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केल्यावर ‘ऑक्सिमीटर’ काही नोंद (रिडींग) दाखवत नसणे; परंतु त्यांचा श्वास जोराने चालू असणे : मी सौ. प्रमिला यांच्या हाताच्या बोटाला ‘ऑक्सिमीटर’ लावून त्यांच्या शरिरातील प्राणवायूचे प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘ऑक्सिमीटर’ काही नोंद (रिडींग) दाखवत नव्हता. परात्पर गुरुदेवांशी बोलणे झाल्यानंतर मी पुन्हा ‘ऑक्सिमीटर’ लावला. तेव्हाही ‘ऑक्सिमीटर’ काही नोंद दाखवत नव्हता. ‘ऑक्सिमीटर’ नादुरुस्त नाही ना ?’, याची निश्चिती करण्यासाठी मी माझ्या हाताच्या बोटाला तो लावून पाहिला. तेव्हा तो चालू स्थितीत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता मी पुन्हा सौ. प्रमिला यांच्या हाताच्या बोटात ‘ऑक्सिमीटर’ लावला. तेव्हाही ‘ऑक्सिमीटर’ काही नोंद दाखवत नव्हता; पण त्या जोरात श्वास घेत होत्या.

(‘यावरून सौ. केसरकर यांचे शरीर केवळ चैतन्याच्या बळावर कार्य करत होते, हे सिद्ध होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

६ ई. परात्पर गुरुदेव रात्री सौ. प्रमिला यांना भेटण्यासाठी आल्यावर त्यांनी सूक्ष्म परीक्षण करण्यासाठी सौ. प्रमिला यांच्या सर्व चक्रांवरून हात फिरवून ‘पूर्ण आनंदावस्था असून कुठल्याही चक्रात अडथळा नाही’, असे सांगणे आणि परात्पर गुरुदेवांनी सौ. प्रमिला यांच्या डोळ्यांत पाहिल्यावर त्यांनी दोन्ही डोळे पूर्ण उघडून परात्पर गुरुदेवांकडे पहाणे : त्यानंतर रात्री ८.४५ वाजता पुन्हा परात्पर गुरुदेव सौ. प्रमिला यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी सौ. प्रमिला यांच्या सर्व चक्रांवरून हात फिरवून सूक्ष्म परीक्षण केले आणि मला म्हणाले, ‘‘पूर्ण आनंदावस्था आहे. कुठल्याही चक्रात अडथळा नाही. त्या आनंदाने श्रीकृष्णाकडे चालल्या आहेत.’’ त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी सौ. प्रमिला यांच्या डोळ्यांकडे पाहिले. तेव्हा त्यांचे डोळे अर्धवट उघडे होते. जेव्हा परात्पर गुरुदेव सौ. प्रमिला यांच्या डोळ्यांत पुन्हा पाहू लागले, तेव्हा त्या दोन्ही डोळे पूर्ण उघडून गुरुदेवांकडे पाहू लागल्या. त्यानंतर परात्पर गुरुदेव त्यांच्या खोलीत गेले.

७. सौ. प्रमिला यांचे निधन

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

रात्री ९.४५ वाजता पाहिले, तर सौ. प्रमिला यांचे शरीर एकदम थंड पडले होते, तरीही त्यांचा श्वास काही प्रमाणात चालू होता. रात्री १० वाजून २० मिनिटांनी त्यांचे श्वास घेणे थांबले. त्यामुळे मी आधुनिक वैद्यांना बोलावले. त्यांनी सौ. प्रमिला यांना तपासल्यावर सौ. केसरकर यांचे निधन झाल्याचे मला सांगितले.’

८. कृतज्ञता

सौ. प्रमिला केसरकर यांना होत असलेल्या असह्य त्रासावर आणि त्यांचा अंत्यसमय जवळ आलेला असतांना परात्पर गुरुदेवांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन अन् नामजपादी उपाय सांगितले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे शब्दातीत आहे. परात्पर गुरुदेव साधकांची साधना चांगली होण्यासाठी अविरत प्रयत्नरत असतात, तसेच साधकांच्या अंत्यसमयी अन् त्यांचा मृत्यूत्तर पुढील प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठीही ते सूक्ष्मातून कार्यरत असतात, हे यातून मला प्रकर्षाने जाणवले. एकूणच या संपूर्ण प्रक्रियेतून ते आम्हा साधकांना घडवत आहेत, यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञता !

– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)     (समाप्त)


‘पल्स ऑक्सिमीटर’ नोंद न दाखवण्याची कारणे

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

‘रक्तातील तांबड्या पेशींतील ‘हिमोग्लोबिन’ हे द्रव्य प्राणवायूचे वहन करते. त्या माध्यमातून शरिरातील सर्व पेशींना प्राणवायू पुरवला जातो. ‘पल्स ऑक्सिमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने त्या त्या क्षणी रक्तातील ‘हिमोग्लोबिन’पैकी ‘किती टक्के ‘हिमोग्लोबिन’ प्राणवायूचे वहन करत आहे’, हे समजते. रक्तदाब न्यून झाला असल्यास, शरिराचे अवयव (विशेषतः बोटे) थंड पडली असल्यास, हवेतील प्राणवायू खेचून घेण्यास रुग्णाचा श्वास अपुरा पडत असल्यास (गास्पिंग रेस्पिरेशन), बोटांच्या नखांना रंग (नेल पॉलिश) लावलेला असल्यास ‘पल्स ऑक्सिमीटर’ हे यंत्र ‘हिमोग्लोबिन’युक्त प्राणवायूचे मापन करू शकत नाही किंवा चुकीची नोंद दाखवते.’ – डॉ. दुर्गेश सामंत (२९.१०.२०२१)