प्रेमभाव, सेवेची तळमळ असणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असणारे सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे (वय ६६ वर्षे)
व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा परिपूर्ण करणारे अन् चुकांविषयी संवेदनशील असणारे सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे यांच्याविषयी संत आणि सहसाधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. (कु.) दीपाली मतकर, सोलापूर यांना श्री. राजन बुणगे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
१. प्रेमभाव
‘पूर्वी श्री. बुणगेकाकांचा स्वभाव पुष्कळ कडक होता. ‘त्यांना अधिक हसलेले आणि बोललेले आवडायचे नाही’, असे मला वाटायचे; परंतु आता काकांच्या वागण्यामध्ये पुष्कळ सहजता आली आहे. ते आनंदी असतात आणि सगळ्यांशी सहजतेने बोलतात. समोरचा साधक जसा आहे, तसे त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्याशी लहान होऊन वागतात.
२. चुकांविषयी संवेदनशील असणे
बुणगेकाका सेवेविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याशी बोलत असतांना सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी त्यांना सेवा आणि साधना यांमध्ये ते कुठे मागे रहातात किंवा त्यांच्याकडून होणार्या चुकांविषयी सूत्रे सांगायला सांगितली. तेव्हा काकांनी मला पुष्कळ लीनतेने विचारले, ‘‘मी कोणते प्रयत्न करू ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘काका सतत भाव ठेवून, मनमोकळेपणे बोलून आणि संघभावाने प्रयत्न करायला हवेत. तेव्हा काका म्हणाले, ‘‘मला आता गुरूंविना काहीच नको. मला त्यांची कृपाच संपादन करायची आहे. मला चांगले प्रयत्न करायचे आहेत.’’ तेव्हा काकांना पुष्कळ खंत वाटत होती. काकांनी त्यांना सांगितलेले त्वरित स्वीकारले आणि त्या वेळी काकांचा कंठ दाटून आला होता. त्यांची ती स्थिती पाहून माझीही भावजागृती झाली.
३. प्रवास करूनही व्यष्टी आणि समष्टी सेवा परिपूर्ण करणे
एकदा काकांनी सेवेसाठी १० दिवस अखंड आणि पुष्कळ प्रवास केला. मार्ग (रस्ते) खराब असूनही काका प्रवास करून आल्यावर हितचिंतकांना वैयक्तिक संपर्क करायचे, तसेच सेवेच्या नियोजनाच्या संदर्भात साधकांशी बोलून आणि व्यष्टीचे प्रयत्न भावपूर्ण करून प्रतिदिन रात्री ११ वाजेपर्यंत दिवसभरातील सेवेचा आढावा द्यायचे. ‘साधनेत किंवा नियोजनात कोणत्या अडचणी आल्या’, हे सांगून ‘आता पुढे कसे नियोजन करायचे ?’, याविषयी ते विचारून घ्यायचे. हा आढावा देतांना त्यांचा भाव जागृत व्हायचा.
४. साधकांच्या प्रकृतीशी जुळवून घेऊन त्यांना साहाय्य करणे
पूर्वी काही साधकांशी जुळवून घेतांना काकांच्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. आता ते त्यांच्याशीही प्रेमाने बोलतात. ते त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना साहाय्य करतात.
५. साधकांना समजून घेतल्याने पुढील समष्टी सेवेचे नियोजन करता येणे
सेवेत साधकांनी ऐकले नाही किंवा पाठपुरावा करूनही नियोजनाप्रमाणे झाले नाही, तर आधी त्यांना ताण यायचा. ‘कोणतेही नवीन नियोजन आले, तर काका अस्थिर व्हायचे; परंतु आता नियोजनात कितीही पालट झाला आणि कुणी साधकांनी सांगितलेले केले अथवा नाही केले, तरी ते त्यांना समजून घेतात. आता ‘परिस्थितीनुसार समष्टी सेवेचे नियोजन कसे करूया ?’, असा त्यांचा विचार होतो अन् काका तसे प्रयत्न करतात. त्या वेळी कुठेच अस्थिरता आणि अपेक्षा नसते.
६. सतत सेवारत असणे
काका सतत सेवारत असतात. ते वेळ वाया घालवत नाहीत. एखादी सेवा चालू केली की, ते त्या सेवेच्या पुढील फलनिष्पत्तीचे लगेच चिंतन चालू करतात. काकांचे हे प्रयत्न पाहून ‘सेवेचा व्यापक स्तरावर विचार करून फलनिष्पत्ती कशी वाढवायची ?’, हे मला शिकता आले.
७. परात्पर गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) नाव जरी घेतले, तरी काकांचा भाव जागृत होतो.
८. तोंडवळ्यात पालट होणे
काकांचा तोंडवळा लहान बाळासारखा निरागस वाटतो. ते सर्व साधकांशी लहान बाळाप्रमाणे निरागसपणे बोलतात आणि हसतात. काकांचा तोंडवळा तेजस्वी दिसतो.’ – (पू.) कु. दीपाली मतकर (२५.१०.२०२१)
श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर सेवाकेंद्र
१. प्रेमभाव
अ. ‘श्री. बुणगेकाका यांच्यातील प्रेमभाव वाढला असून ते दूरभाषवर बोलतांना प्रेमाने बोलतात. साधकांची मानसिकता समजून घेऊन ‘त्यांना कसे हाताळायचे ?’, याचे कौशल्य काकांमध्ये असल्याने काकांची साधकांशी चांगली जवळीक झाली आहे.
आ. काका लहान मुलांशीही प्रेमाने बोलतात. त्यांच्याशी बोलतांना काका त्यांच्याएवढेच लहान होतात. माझा मुलगा कु. अर्णव गणेश कुलकर्णी (वय ९ वर्षे) याच्याशी बोलतांना काका त्याचा मित्र असल्यासारखेच बोलतात. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली असून जवळीकही निर्माण झाली आहे.
२. नियोजनकौशल्य
काकांमध्ये समष्टी सेवांचे नियोजन करण्याचे कौशल्य असल्याने ते अनेक सेवांचे नियोजन उदा. आंदोलन, निवेदन देणे, संपर्क सेवा, साधकांच्या समष्टी सेवांचे नियोजन करणे यांसारख्या सेवा सहजतेने आणि कौशल्याने करत आहेत.
३. सेवेची तळमळ
अ. काकांना विविध शारीरिक त्रास होत असतात किंवा त्यासाठी त्यांना अनेक वेळा आधुनिक वैद्यांकडे जावे लागते. असे असूनही ते त्याविषयी तक्रार न करता अधिकाधिक तळमळीने सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
आ. ‘समाजातील व्यक्तींची केवळ ओळख होऊन त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि झाले’, असे काकांना कधीच वाटत नाही, तर ‘समाजातील जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीने साधना करायला हवी’, अशी त्यांची तळमळ असते आणि त्या पद्धतीनेच ते प्रत्येक व्यक्तीशी संभाषण करतात.
इ. काकांचे वय अधिक असूनही ‘ते युवकांना लाजवेल’, अशा पद्धतीने समष्टी सेवा तळमळीने करतात. ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी गुरुसेवा व्हायला हवी’, अशी त्यांची तळमळ असते.
४. साधकांप्रती भाव
साधक गुरुदेवांविषयी बोलत असतांना अनेक वेळा काकांचा भाव जागृत होतो. त्या वेळी बोलत असतांना काका भावस्थितीतच असतात. दसर्याच्या दिवशी सेवाकेंद्रातील साधक आणि साधिका काकांना त्यांच्या खोलीजवळ भेटण्यास गेल्यावर त्यांचा भाव जागृत होऊन ते म्हणाले, ‘‘सर्व साधिकांकडे पाहून ‘देवीची ९ रूपेच मला भेटण्यास आली आहेत’, असे मला जाणवत आहे.’’
५. श्री. बुणगेकाका यांनी स्वतःमध्ये केलेला पालट
‘पूर्वी काकांचा साधकांना समजून घेण्याचा भाग अल्प होता. काकांच्या अपेक्षांमुळे त्यांच्या बोलण्यातून साधक दुखावले जात होते; मात्र आता काकांनी स्वतःमध्ये पालट केला आहे. त्यांच्याकडून ‘साधकांना समजून घेणे, त्यांच्या अडचणी सोडवणे’, असे प्रयत्न होत आहेत.’ (२५.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |