सशक्त पिढी हवी !

संपादकीय

अमली पदार्थांना सर्वस्व मानणारी आजची तरुण पिढी राष्ट्रोत्कर्ष कसा साधणार ?

अमली पदार्थ’ ही गोष्ट भारतासाठी नवीन नाही. उलट त्यांचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हे अमली पदार्थ अनेक भारतियांच्या जीवनाचा एक भागच होत आहेत, हे सध्याच्या घडामोडींतून प्रकर्षाने दिसून येते. खरेतर अमली पदार्थ नव्हे, तर जीवनमूल्ये, संस्कार, नैतिकता या गोष्टी मानवाच्या आयुष्याचा भाग व्हायला हव्यात. तसे झाल्यासच खर्‍या अर्थाने मनुष्याचा उद्धार आणि विकास होऊ शकतो; पण हे चित्र आज उलटच होत आहे. अमली पदार्थांचे पारडे अधिकाधिक जड होत आहे. अमली पदार्थांचे हे दुष्टचक्र देशाला कुठे घेऊन जाईल ? याचीच चिंता आहे. या चिंतेत भर टाकणार्‍या आणखी घटनाही घडत आहेत. अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणी करण्यात आलेली अटक आणि नुकताच त्याला मिळालेला जामीन या अनुषंगाने अनेकांनी आर्यनचे केलेले समर्थन सर्वांनी पाहिले असेलच. अनेकांनी आर्यन खान याला ‘लहान’, ‘निरागस’, ‘निरपराध’, ‘बिचारा’ अशी विशेषणे जोडत त्याची जणू पाठराखणच केली. अर्थात् असे करणारे कुणी सर्वसामान्य नव्हते, तर अनेकांचे ‘आदर्श’ (?) असणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारच होते. अर्थात् ‘उंदराला मांजर साक्ष’ या म्हणीप्रमाणे असे होणारच, यात वाद नाही. समर्थनात्मक भूमिकेमुळे ‘अमली पदार्थ ही जीवनावश्यक गोष्टच आहे’, असेच सर्वांना वाटू लागले. थोडक्यात काय, तर आर्यन खान चुकला नाही. चुकले ते अमली पदार्थविरोधी पथक की, ज्यांनी त्याला अटक केली. अशा स्वरूपाचेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. आता आर्यनला जामीन मिळाल्याने या विषयावर पडदा पडेलच; पण यामुळे निर्माण झालेल्या स्थितीकडे दुर्लक्षून चालणार नाही. भलेही त्याला जामीन मिळाला असला, तरी या ना त्या नात्याने त्याचा अमली पदार्थांशी संबंध आलेला होताच. एका अभिनेत्रीसमवेत अमली पदार्थांच्या दृष्टीने त्याचे संभाषणही झालेले आहे. हीच म्हणायची का भारताची भावी पिढी ? व्यसनाधीन असणारी, अमली पदार्थांच्या आहारी गेलेली, त्यांनाच सर्वस्व मानणारी, त्यांच्या आधारावरच आयुष्य जगू पहाणारी ही पिढी राष्ट्रोत्कर्ष कधीतरी घडवू शकेल का ? अमली पदार्थांच्या विश्वात स्वतःचेच नियंत्रण गमावणार्‍या तरुणाईलाच आधार देण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ती राष्ट्राची आधारशिला कशी होणार ? ही सर्व परिस्थिती चिंताजनक आहे. कोणे एकेकाळी पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास घडलेला भारत देश आज अमली पदार्थांच्या विळख्यात पुरता अडकलेला असणे याहून मोठे दुर्दैव कोणते असेल ? या स्थितीतून देशाला बाहेर काढायला हवे.

अमली पदार्थांच्या कुबड्या !

आर्यनचा विषय संपण्याच्या मार्गावर आला असतांनाच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार के.टी.एस्. तुलसी यांनी पुन्हा तीच ‘री’ ओढली आहे. ते म्हणाले, ‘‘अमली पदार्थ हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. अमली पदार्थ आयुष्यातील वेदना न्यून करतात. दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही हानी होते; तरीही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात; मग अन्य अमली पदार्थांना अनुमती का नाही ? आवश्यकता असल्यास अमली पदार्थांच्या वापरास मान्यता का दिली जाऊ नये ?’’ ज्या काँग्रेसने भारतावर अनेक दशके राज्य केले, त्याच काँग्रेसच्या नेत्यांची अशी मानसिकता असणे, यावरूनच लक्षात येते की, भारत हा अमली पदार्थांचे आगार नक्की कुणामुळे झालेले आहे ? समाजहित साधणे तर दूरच; पण समाजविघातक गोष्टी करणेच काँग्रेसींना अधिक रुचते. रक्तरंजित आतंकवादापेक्षाही अमली पदार्थांचे व्यसन हे भारतासाठी अधिक धोकादायक आणि तितकेच घातकही आहे. असे असतांना त्यांच्या वापराला मान्यता देण्याची मागणी देशातील विघातक शक्तींनी करणे म्हणजे अमली पदार्थांच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या आतंकवादालाच पाठिंबा दिल्यासारखे आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही सर्रास अमली पदार्थ घेतात, अनेक जण अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असतात. ‘एखाद्या अमली पदार्थामुळे चांगली शरीरयष्टी मिळते’, ‘ऊर्जा मिळते’, ‘ताण न्यून होतो’, असे लाभ सांगून आमिषे दाखवली जातात. तरुणाई याला भुलते आणि व्यसनाधीन होते. ‘ड्रग्ज’ घेणे म्हणजे ‘स्टेटस’ (प्रतिष्ठेचे लक्षण) आहे’, असे समजून अनेक जण त्यांच्या आहारी जातात. वेगळेच विश्व त्यांना आपलेसे वाटू लागते. अशा भासमान विश्वात वावरतांना स्वतःच्या हातून कोणते दुष्कृत्य होत आहे, याचाही त्यांना विसर पडतो. अभिनेते प्रतीक बब्बर यानेही मध्यंतरी सांगितले होते, ‘‘अमली पदार्थांमुळे मी मनातील कोलाहलापासून दूर राहू शकत होतो. प्रथम गांजा आणि चरस यांसारख्या पदार्थांनंतर मी हळूहळू त्या पुढील अधिक तीव्रतेच्या अमली पदार्थांकडे वळलो. आयुष्याचा आनंद लुटण्याचा हाच एक मार्ग असल्याचे मला वाटायचे.’’ ‘मनाची दुःस्थिती घालवण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे अमली पदार्थ’, असे सध्याचे चित्र आहे. ही स्थिती पालटायला हवी. पोलीस, प्रशासन किंवा सरकार अमली पदार्थांच्या विरोधात जोपर्यंत ठोस आणि कठोर कारवाई संबंधितांवर करत नाहीत, तोपर्यंत हे प्रकार चालूच रहाणार आहेत. ही कारवाई अमली पदार्थ मिळणार्‍या स्रोतापासून ते त्यांची विक्री करणार्‍यांपर्यंत करायला हवी. अमली पदार्थांच्या कुबड्या आयुष्यभर पुरणार्‍या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून रहाणे घातकच आहे. नैतिकता, संस्कार, धर्माचरण, त्याग यांमुळेच जीवनातील खरा आनंद अनुभवता येत असतो, हे निर्विवाद सत्य आहे. ते आजच्या पिढीवर बिंबवायला हवे. तसे झाल्यासच भारताची सशक्त पिढी निर्माण होऊ शकते. हे सर्व साध्य होण्यासाठी अमली पदार्थांचे समर्थन न करता त्यांची होणारी तस्करी रोखून त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारने कृतीशील व्हायला हवे !