वासुदेवनगर, डिचोली येथे पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळे बालकाचा गेला बळी
डिचोली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – खेळता-खेळता सर्व्हिस पिस्तुलातून अचानक सुटलेली गोळी तोंडात घुसल्याने मिहीर वायंगणकर या ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. वासुदेवनगरी, डिचोली येथे २८ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजता ही दुर्घटना घडली. बालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कारापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिहीर हा डिचोली येथील एका शाळेत बालवाडीत शिकत होता.
पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे विभागात हवालदारपदी असलेले कारापूर, सांखळी येथील दशरथ वायंगणकर हे गोव्यात आलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विशेष सुरक्षा गटात होते. काम संपवून ते २८ ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्या वासुदेवनगरी, डिचोली येथील ‘रिव्हर डे’ या अपार्टमेंटमधील सदनिकेत आले. त्यांच्याकडील सर्व्हिस पिस्तुल टेबलवर ठेवून ते स्वच्छतागृहात गेले. मागाहून ही दुर्घटना घडली. पिस्तुल घरी आणल्याने या प्रकरणाचे खात्यांतर्गत अन्वेषण चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.