अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाही ‘युनिव्हर्सल पास’ सक्तीचा !
मुंबई – अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाही आता लसीकरण सक्तीचे करण्यात आले असून त्यांनाही ओळखपत्राऐवजी ‘युनिव्हर्सल पास’वरच रेल्वेचा पास देण्याचे आदेश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनास दिले आहेत.
सरकारने अत्याश्यक सेवेत काम करणार्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न पहाता रेल्वे प्रवासाची मुभा दिली होती. त्यानुसार सरकारी, वैद्यकीय-अत्यावश्यक सेवेतील सर्वांनाच रेल्वे पास आणि दैनंदिन तिकिटेही दिली जात होती; मात्र आता राज्यात लसींचा पुरेसा साठा असल्याने लसीकरण पूर्ण झालेल्यांना रेल्वे पास देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती; मात्र अत्यावश्यक सेवेतील विविध आस्थापनांमध्ये काम करत असल्याची बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वे पास मिळवणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने आवश्यक सेवेतील, तसेच शासकीय सेवेतील लोकांनाही लसीकरण बंधनकारक केले आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर दोन लसी घेतलेल्या एकूण २५ लाखांहून अधिक जणांनी मासिक पास घेतला आहे.