भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त किल्ले स्पर्धा !
पनवेल – येथील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या सहकार्याने ‘भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ७ सहस्र रुपये, तर द्वितीय आणि तृतीय अनुक्रमे ५ सहस्र आणि ३ सहस्र रुपये, असे असून एकूण ३० सहस्र रुपयांची २० उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. विजेत्यांना पारितोषिके आणि आकर्षक चषक यांनी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणीचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी रोहित जगताप (८६९१९३०७०९), अजिंक्य भिडे (८८५०६४४२०७), देवांशू प्रभाळे (८४३३५१३५४०) किंवा अनिकेत भोईर (९९३०१०४४९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बाजार भावापेक्षा अल्प दरात बाजार साहित्य उपलब्ध !
दीपावली सणानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने भाजपच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर या दिवशी कळंबोली येथे करण्यात आले. दिवाळीनिमित्त कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे, तर नवीन पनवेल येथील नगरसेवक संतोष शेट्टी यांचे जनसंपर्क कार्यालय, असे एकूण ४ ठिकाणी दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये रवा, मैदा, चणाडाळ, साखर, पोहे, गूळ, डालडा आणि गोडेतेल आदी वस्तूंचा समावेश आहे.