‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखून सामाजिक माध्यमांवरील भावनिक बाजारापासून सावधान रहा ! – अजित पारसे, सायबर तज्ञ
नागपूर – ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांवर अनोळखी व्यक्तींसमवेत मैत्री, संभाषण करतांना किंवा व्यक्तीगत माहिती पाठवतांना धोका असतो. सामाजिक माध्यमांवर ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’च्या (अनोळखी व्यक्तींशी बोलणे) मोहात अडकून शहरातील अनेकांनी स्वतःची हानी करून घेतली आहे. शहरातील सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वर्ष २०१९ मध्ये १२६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर वर्ष २०२० मध्ये २०० च्या आसपास सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती सायबर तज्ञ अजित पारसे यांनी दिली आहे.
सायबर तज्ञ अजित पारसे म्हणाले…
१. देशात वर्ष २०२० मध्ये ५० सहस्रांहून अधिक सायबर गुन्हे घडले आहेत. यापेक्षाही पोलीस ठाण्यात नोंद न झालेले सायबर गुन्हे कितीतरी पटींनी अधिक आहेत. यातील बहुतांश सायबर गुन्हे ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका न ओळखल्यामुळे घडले आहेत.
२. समाजात एकटेपणा वाटणारे लोक ‘डिजीटल फ्रेंडशिप’चा पर्याय निवडतात. संकेतस्थळ, सामाजिक माध्यमे यांवर असंख्य ‘चॅट रुम्स’ (बोलण्यासाठीच्या सुविधा) आहेत. यातील काही विनामूल्य असतात, तर काहींना पैसे द्यावे लागतात. काही ‘चॅट रुम्स’ ओळख घोषित करत नसल्याचा दावा करतात. तेथे काहींचा तोल सुटतो आणि लैंगिक विषयावर उघडपणे संवाद होऊ लागतो. यातूनच नागरिकांना फसवले जाते. आभासी जगात वावरतांना सावधानता बाळगायला हवी.