(म्हणे) ‘मी जन्माने हिंदु आहे आणि मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही !’ ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट
|
पणजी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – मी जन्माने हिंदु आहे, यासाठी मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. मला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. मला सर्व धर्मांना समवेत घेऊन पुढे जायचे आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यास येथील धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात आल्यावर पणजी येथे आयोजित पहिल्याच जाहीर कार्यक्रमाद्वारे केला.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मी लोकांमध्ये फूट घालण्याऐवजी मरणे पसंत करेन. देहली येथील दादागिरी येथे चालणार नाही. आम्हाला देशातील संघीय संरचना मजबूत करायची आहे. गोमंतकियांना मी आश्वस्त करू इच्छिते की, तृणमूल काँग्रेस गोव्यातील संस्कृती आणि वारसा यांना संरक्षण देईल. प्रत्येक गोमंतकियाने आत्मसन्मानाने जगावे असे तृणमूलला वाटते.’’ (गोव्यातील संस्कृती आणि वारसा म्हणजे पोर्तुगिजांनी मंदिरे पाडून बांधलेल्या चर्च नव्हेत ! इथला मूळ गोमंतकीय वारसा हिंदु धर्माचा असल्याने तोच जतन करायला हवा ! – संपादक)
तृणमूल काँग्रेस महिला आणि तरुण उमेदवार यांना अधिकाधिक उमेदवारी देणार, युतीसाठीही सिद्ध
मी गोव्यात तुमची बहीण म्हणून आले आहे. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस महिला आणि तरुण उमेदवार यांना अधिकाधिक उमेदवारी देणार आहे. टॅक्सीचालक, मासेमार आदींना उमेवारी दिली जाणार आहे. तृणमूल काँग्रेस निवडणूकपूर्व युतीसाठी सिद्ध आहे; मात्र निवडणूकपूर्व युती पुढे फलद्रूप होत नाही, असा आमचा अनुभव आहे. तृणमूल काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार योग्य वेळी घोषित करणार आहे. गोवा राज्य गोव्यातूनच चालले पाहिजे; मात्र आज गोवा देहली येथून चालते. गोवा राज्य आत्मनिर्भर झाले पाहिजे आणि यासाठी आवश्यक साधनसुविधा पुरवण्यासाठी तृणमूल काँग्रेस सिद्ध आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था राखून भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी तृणमूल काँग्रेस कटीबद्ध आहे. मला हसणारा गोवा पाहिजे.’’ (भ्रष्टाचारमुक्त सरकारची भाषा करणार्या तृणमूल काँग्रेसला बंगालमधील शारदा घोटाळ्याविषयी काय म्हणायचे आहे ? गोव्यात निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर जे फलक आणि भित्तीपत्रके लावली आहेत, त्यांचा खर्च कुठून करण्यात आला ? किती जणांना पैशांचे आमीष दाखवण्यात आले ? याची उत्तरे गोमंतकीय जनतेला द्यावीत ! सर्व पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, हे जनता जाणून आहे ! – संपादक)
ढवळीकर बंधू, चर्चिल आलेमाव आणि रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घेतली सदिच्छा भेट
‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर, नेते श्री. दीपक ढवळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव, तसेच अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दोनापावला येथील ‘इंटरनॅशनल सेंटर’मध्ये सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर पत्रकारांना म्हणाले, ‘‘तृणमूल काँग्रेसने गोव्यातील सर्व ४० मतदारसंघांत त्यांचे उमेदवार ठेवणार असल्याचे घोषित केलेले आहे. ‘मगोप’ हा पक्ष गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा वारसा पुढे घेऊन जाणारा पक्ष असल्याने ‘मगोप’ इतर पक्षात विलीन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीच्या वेळी राजकारणावर अधिक चर्चा झाली नाही.’’ भेटीनंतर आमदार रोहन खंवटे म्हणाले, ‘‘विद्यमान भाजप शासनाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी संघटित होणे आवश्यक आहे.’’ आमदार चर्चिल आलेमाव आणि वालांका आलेमाव यांनी भेटीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी सदिच्छा भेट झाल्याचे सांगितले.
प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
भारताचा प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी गोव्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी लिएंडर पेस म्हणाला, ‘‘भारतीय लोकशाही खूप मोठी आहे. माझा जन्म जरी बंगालमध्ये झालेला असला, तरी गोवा हे माझे दुसरे घर आहे.’’ अभिनेत्री तथा काँग्रेसच्या माजी नेत्या नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभु यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नफीसा अली यांनी वर्ष २००४ मध्ये कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. वर्ष २००९ मध्ये त्यांनी लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) मधून समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. पराभवानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (अशा माकडउड्या मारणारे नेते असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष स्थिर सरकार काय देणार ? – संपादक)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गोव्यातील प्रमुख मंदिरे आणि तपोभूमी येथे भेट !
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी म्हार्दोळ येथील श्री महालसा मंदिर, मंगेशी येथील श्री मंगेश मंदिर आणि तपोभूमी, कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ यांना भेट दिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजी यांची भेट घेऊन स्वामीजींचा आशीर्वाद घेतला.