हिंदु धर्मजागृती सभेत प्रसारसेवा करण्याची संधी मिळाल्यावर आलेल्या अडचणी आणि वर्तमानात रहाण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांवर गुरुकृपेने करता आलेली मात !
‘४.२.२०१८ या दिवशी धनकवडी (पुणे) येथे हिंदु धर्मजागृती सभा आहे’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला काही अडचणींमुळे सतत गावी जावे लागत होते. ‘हिंदु धर्मजागृती सभेचे ठिकाण घराजवळ असल्याने जेव्हा मी पुण्यात असेन, तेव्हा प्रसारात सहभागी होऊन लाभ करून घेऊ’, अशी माझ्या मनाची विचारप्रक्रिया होती.
१. उत्तरदायी साधिकेने प्रसारसेवा करण्याविषयी विचारल्यावर त्यांना अडचण सांगितल्यावर त्यांनी उपाययोजना सांगणे आणि सहसाधिकेने वर्तमानकाळात राहून सेवा करण्यास सुचवल्याने दिशा मिळणे
उत्तरदायी साधिकेने मला प्रसारसेवा करण्याविषयी विचारल्यावर मी त्यांना ‘८ दिवसांसाठी गावाला जावे लागत आहे’, ही अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी सहसाधिकेला सेवा चालू करायला सांगितली आणि गावाहून आल्यानंतर ‘तुम्ही दोघींनी मिळून सेवा करा’, असे मला सांगितले.
तेथून घरी येतांना माझे ‘घरातील कामे, सेवा आणि व्यष्टी साधना’, या दृष्टीने चिंतन चालू झाले. सहसाधिकेशी बोलतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘आपण अन्य विचार न करता वर्तमानकाळात राहून ही सेवा करूया.’’ त्यांच्या या बोलण्याने मला एक दिशा मिळाली.
२. सेवेत पालट झाल्याचे समजल्यावरही देवाच्या कृपेने स्थिर राहाता येणे
दुसर्या दिवशी उत्तरदायी साधिकेने ‘प्रसारसेवा न करता एका साधिकेच्या समवेत तुम्हाला दुसरी सेवा करायची आहे’, असे सांगितल्यावर माझ्या मनाची स्थिती स्थिर होती. मला वाटले, ‘देवाला जी सेवा करवून घ्यायची आहे, ती तो मला सांगत आहे.’ नंतर देवाने माझ्या लक्षात आणून दिले, ‘२ वर्षांपूर्वी याच मैदानात हिंदु धर्मजागृती सभा झाली होती. त्या वेळी तुला एक सेवा दिली होती; परंतु घरातील अडचणीमुळे तुला ती करता आली नाही.’ हे सूत्र लक्षात आल्यावर ‘देव किती दयाळू आणि कृपाळू आहे ! तो मला पुनःपुन्हा संधी देत आहे’, याची मला जाणीव झाली.
३. सेवा करतांना व्यष्टी साधनेचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे स्वतःत जाणवलेले पालट
सेवा मिळाल्यानंतर जे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू उफाळून आले, त्यांवर मी स्वयंसूचना सिद्ध केल्या. त्यामुळे मला स्वभावदोष आणि अहं यांत पालट जाणवू लागला.
३ अ. कर्तेपणाचे विचार येत असतांना त्यावर स्वयंसूचना घेणे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्याने ताण न येता सेवेतून आनंद अन् चैतन्य मिळणे : माझ्यामध्ये ‘कर्तेपणा घेणे’ या अहंच्या पैलूची तीव्रता अधिक आहे. सेवा मिळाल्यावर कृतज्ञता न वाटता ‘मी घरातील सर्व कामे करून व्यष्टी साधना आणि सेवा करते’, असे कर्तेपणाचे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा मी त्यावर स्वयंसूचना बनवली. मी ‘प्रत्येक कृती करतांना प्रार्थना, कृतज्ञता आणि गुरुमाऊलींचे अस्तित्व अनुभवणे’, असे भावाच्या स्तरावर प्रयत्न चालू केले. त्यामुळे मला सेवेतून आनंद आणि चैतन्य मिळू लागले. मला घरातील कामे आणि सेवा करतांना ताण येत नव्हता. ‘देवच हे सर्व सहजतेने करवून घेत आहे’, याची जाणीव माझ्या मनाला होत होती.
३ आ. मनातील विचार सहसाधिका आणि उत्तरदायी साधिका यांच्याशी बोलल्यामुळे ताण न येणे : मी सेवा करतांना स्वतःच्या मनाची विचारप्रक्रिया, स्वतःची स्थिती आणि व्यष्टीचे प्रयत्न, यांविषयी सहसाधिकेशी बोलू लागले. त्यामुळे मला माझ्या मनाच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होऊ लागली. एकदा चिंतन सत्संग घेत असतांना माझ्या मनात ‘समोरचा साधक सक्षम आहे आणि त्यांनी अनेक वेळा ही सेवा केल्यामुळे ते ही सेवा चांगली करतील’, असे विचार येत होते. नंतर मला ‘माझ्या साधनेच्या दृष्टीने हे विचार अयोग्य आहेत’, याची जाणीव झाली. हा विचार मी सहसाधिकेला सांगितला. तेव्हा मन लगेच सतर्क झाले आणि पुन्हा अशी विचारप्रक्रिया झाली नाही. मी सेवेतील प्रलंबित सूत्र आणि अडचणी यांविषयी सहसाधिका आणि उत्तरदायी साधिका यांच्याशी बोलल्यामुळे माझ्या मनावर कुठलाच ताण आला नाही.
३ इ. मी ‘सेवेत झालेला पालट आणि मिळालेली सेवा ही गुरुदेवांनी माझ्या साधनेसाठी दिली आहे’, असा दृष्टीकोन ठेवल्यामुळे गुरुकृपेने कुठलेच विकल्प माझ्या मनात आले नाहीत.
४. सेवा करतांना अनुभवलेली देवाची कृपा !
४ अ. ‘साधकांच्या माध्यमातून देव साहाय्य करत आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे : सेवा करतांना अनेक साधकांशी माझा संपर्क होत होता. त्या वेळी ‘देव प्रत्येक साधकातील गुण दाखवत आहे. देव साधकांच्या माध्यमातून आवश्यक ते सुचवत आहे. ‘माझी साधना चांगली व्हावी’, यासाठी भगवंताचे माझ्यावर लक्ष आहे; म्हणून तो समष्टीच्या माध्यमातून मला साहाय्य करत आहे’, याची मला जाणीव होत होती. ‘साधकांच्या माध्यमातून भगवंत साहाय्य करत आहे’, असे वाटून प्रत्येक क्षणी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.
४ आ. ‘चिंतन सत्संग’ घेत असतांना श्रीकृष्ण आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे अस्तित्व जाणवणे : सेवेच्या संदर्भातील ‘चिंतन सत्संग’ ज्या ठिकाणी असायचे, त्या ठिकाणी मला पुष्कळ चैतन्य जाणवायचे. त्या वेळी ‘श्रीकृष्णाचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्यातून मला चैतन्य मिळत आहे. गुरुमाऊलीच सर्व सुचवत आहेत’, असे मला जाणवत असे. कधी मला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे अस्तित्व जाणवायचे. ‘ते आसंदीवर बसून मला ‘काय चालू आहे ? सेवा कशी चालू आहे ? सेवा करतांना आनंद मिळतो ना ?’, असे विचारत आहेत’, असे मला जाणवत असे. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.
५. सेवा करतांना आलेल्या वैयक्तिक अडचणी आणि देवाने सेवेच्या माध्यमातून प्रारब्ध सुसह्य केल्याची आलेली अनुभूती
५ अ. वयोवृद्ध सासू-सासर्यांना भेटण्यासाठी गावी जावे लागणे : गावी वयोवृद्ध सासू-सासरे आहेत. त्यामुळे मला मासातून १ – २ वेळा त्यांना पहाण्यासाठी गावी जावे लागत होते. १२.१.२०१८ या दिवशी माझे गावी जायचे नियोजन होते. ९.१.२०१८ या दिवसापासून उत्तरदायी साधिकेने मला सभेची सेवा करायला सांगितली होती; म्हणून मी यजमानांना सांगितले, ‘‘आपल्या नियोजनाप्रमाणे १२.१.२०१८ या दिवशी आपण गावी जाऊन येऊया आणि नंतर सभा झाल्यावरच जाऊया, म्हणजे मला सेवेवर लक्ष केंद्रित करता येईल.’’
५ आ. ‘सासर्यांना पुष्कळ बरे नाही’, असा भ्रमणभाष आल्यावर नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात भरती करणे आणि यजमानांना सुटी मिळाल्यावर ते गावी जाणे : २६.१.२०१८ या दिवशी ‘सासर्यांना पुष्कळ बरे नाही’, असा भ्रमणभाष आला. गुरुदेवांच्या कृपेमुळे माझे मन स्थिर होते. यजमानांनी नातेवाइकांच्या साहाय्याने सासर्यांना इंदापूर येथील रुग्णालयात भरती केले आणि त्यांच्यावर उपचार चालू झाले. नंतर यजमानांना १ – २ दिवसांची सुटी मिळाल्यावर ते गावी गेले.
५ इ. यजमानांनी ‘गावी जाऊन रहाणे शक्य नसल्याने बाबांना पुण्याला उपचारांसाठी घेऊन येऊया’, असे सांगणे, दिवसभरात पुष्कळ प्रवास करूनही थकवा न येणे आणि सासर्यांना त्रास न होणे : २८.१.२०१८ या दिवशी मी सकाळीच सेवेसाठी बाहेर पडले होते. मी दुपारी १.३० वाजता घरी गेल्यावर यजमानांनी सर्व स्थिती सांगितली आणि ते म्हणाले, ‘‘आपल्याला तिकडे जाऊन रहाणे शक्य नाही. बाबांना उपचारांसाठी पुण्याला घेऊन येऊया.’’ देवाच्या कृपेने माझ्या मनात कुठलाच विकल्प किंवा नकारात्मक विचार आला नाही. आम्ही दुपारी २.३० वाजता गावाला जाण्यास निघालो. तेथे गेल्यावर प्रथम रुग्णालयाची पूर्तता केली. नंतर सासूबाईंची गावाकडे रहाण्याची व्यवस्था केली आणि रात्री १२ वाजता आम्ही पुण्याला पोचलो. दिवसभरात साधारण २९० कि.मी. प्रवास करूनही देवाच्या कृपेने आम्हाला थकवा जाणवला नाही किंवा सासर्यांनाही त्रास झाला नाही.
५ ई. देवाने ‘वर्तमानकाळात राहून जे अपेक्षित आहे, ते करूया’, असे सुचवणे आणि त्यामुळे काळजी न वाटता निरपेक्षतेने वागता येणे : माझ्या मनात ‘हिंदु धर्मजागृती सभेच्या दिवशी मी कुठे असेन ? मला सेवेची संधी मिळेल का ?’, असे विचार होते. तेव्हा देवाने ‘वर्तमानकाळात राहून जे अपेक्षित आहे, ते करूया’, असे सुचवले. त्यामुळे काळजी न वाटता आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता मी स्थिर होते. नंतर माझ्या मनात ‘त्यांना कोणत्या रुग्णालयात न्यायचे ? कोणते रुग्णालय जवळ आहे ?’, हे विचार चालू झाले.
५ उ. साधक भ्रमणभाष करून सेवेविषयी विचारत असल्याने देवाच्या कृपेने सेवा होणे : मी उत्तरदायी साधिका आणि सहसाधक यांना ‘मी गावी जात आहे’, असे कळवले होते, तरी काही साधकांना हे ठाऊक नसल्याने ते मला सेवेच्या संदर्भात भ्रमणभाष किंवा लघुसंदेश करत. देवाच्या कृपेने माझी सेवा होत होती. तेव्हा माझी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त होत असे.
५ ऊ. गुरुदेवांच्या कृपेमुळे सासर्यांचा सोनोग्राफीचा अहवाल सर्वसाधारण येणे : २९.१.२०१८ या दिवशी सासर्यांना रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांची सोनोग्राफी केली. त्याचा अहवाल केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे सर्वसाधारण (नॉर्मल) आला. तेव्हा माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. सासर्यांना न्यूमोनिया झाला असल्याने आधुनिक वैद्यांनी त्यांना केवळ ८ दिवसांची औषधे दिली आणि ८ दिवसांनी पुन्हा तपासायला बोलावले.
५ ए. गुरुमाऊलींच्या कृपेने या परिस्थितीत यजमान स्थिर राहू शकणे आणि ‘गुरुमाऊलींनी शारीरिक, मानसिक, आर्थिक अन् आध्यात्मिक या स्तरांवर काळजी घेऊन प्रारब्धाची तीव्रता न्यून केली’, असे जाणवणे : हे सर्व ऐकल्यावर मला क्षणभर हे स्वप्नच वाटले. ‘गुरुमाऊली आपल्यासाठी काय आणि किती करतात !’, हे शब्दांतही सांगू शकत नाही. या प्रसंगात गुरुदेवांनी आमची शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक या स्तरांवर काळजी घेतली होती. त्यांनी या प्रसंगात मला स्थिर ठेवले, प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ दिले आणि माझी प्रारब्धाची तीव्रता न्यून केली. माझे यजमान भावनाशील आहेत, तरी त्यांना स्थिर ठेवून योग्य निर्णय घेण्यास गुरुदेवांनी बळ दिले. केवळ गुरुमाउलींच्या कृपेने आमच्या दोघांचे निर्णय जुळत होते.
६. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, माझ्याकडून साधनेचे कुठलेच प्रयत्न होत नाहीत, तरी या अज्ञानी जिवावर आणि कुटुंबियांवर तू कृपेचा वर्षाव करतोस. देवा, तू आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतोस. गुरुराया, हे अज्ञानी लेकरू आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. प्रतिभा फलफले, धनकवडी, पुणे. (१०.३.२०१८)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |