केंद्र सरकारमध्ये उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणावर अहंकार ! – केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा दावा
नवी देहली – केंद्र सरकारमध्ये अनेक ठिकाणी अहंकार असतो. विशेष करून सरकारमध्ये उच्चस्तरावर अधिक अहंकार असतो. ‘सर्वकाही आपल्याला कळले पाहिजे’ असे संबंधितांना वाटते; म्हणून कुणाचा सल्ला घेणे किंवा कुणाचे ऐकणे हे बहुतेक ठिकाणी होत नाही. कुणी १०० शंभर टक्के परिपूर्ण नसतो आणि ‘मी परिपूर्ण आहे’ असा दावा कुणीच करू शकत नाही. सर्वांमध्ये उणीवा आहेत आणि त्यातून इतरांकडून जाणून घेतल्यास आपल्याला अधिक माहिती मिळते, अशा शब्दांत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःच्या सरकारवर टीका केली आहे. ‘कन्सल्ट’ या वैयक्तिक सल्ला देणार्या ‘ॲप’च्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते.
गडकरी पुढे म्हटले की,
१. मी देहलीमध्ये रहायला लागल्यावर अनेकांची भेट झाली आणि संपर्क झाला. ज्यांना मी मोठे समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यावर कळले की, ते किती छोटे आहेत आणि ज्यांना छोटे समजत होतो, ते किती मोठे आहेत, हे कळले.
२. सरकारी प्रकल्पांना विलंब होण्याचे कारण म्हणजे निर्णय वेळेवर घेतले जात नाहीत. निर्णय काय घेतले जातात ?, ही समस्या नाही. निर्णयच घेतले जात नाहीत, ही मूळ समस्या आहे. सहसचिवांची चूक सचिव सावरतात, सचिवाची चूक मंत्री सावरतात; पण मी पारदर्शक आहे. दायित्व निश्चित करण्यात विश्वास ठेवतो.
३. आता भूसंपादनासाठी अधिक पैसे दिले जातात. त्यामुळे सर्व राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेस-वेचे प्रकल्प चालू असतांनाही भूसंपादनाच्या सूत्रावर कुठेही विरोध होत नाही. ‘माझी भूमी घेऊ नका’, असे लोक आता म्हणत नाहीत. लोक आता ‘माझीही भूमी घ्या’, असे ते सांगतात.