‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणी आर्यन खान याच्यासह दोघांना जामीन संमत !
मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाने ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर केलेल्या कारवाईच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चट आणि मुनमुन धामेचा यांना २८ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकूण २० जणांना अटक करण्यात आली होती.
१. आर्यन खान याच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात बाजू मांडली. जामिनावर सुटका करतांना न्यायालयाने आर्यन खान याला काही अटी घातल्या आहेत. यामध्ये आर्यन खान याला मुंबईबाहेर जाता येणार नाही. मुंबईच्या बाहेर जायचे असल्यास त्याला अन्वेषण अधिकार्यांची अनुमती घ्यावी लागेल, तसेच आठवड्यातून एकदा त्याला अमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. २५ दिवसांनी आर्यन खान याची सुटका होत आहे.
२. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात कारवाई करणारे अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप, या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना झालेली अटक, तसेच या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी अन्वेषण अधिकार्यांवरच आरोप करणे आदी प्रकारांमुळे हे प्रकरण अधिक चर्चेत होते.
३. आर्यन खान याच्या अटकेपासून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू होते. या प्रकरणी सचिन वानखेडे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आर्यन खान याची जामिनावर सुटका झाली असली, तरी या कारवाईवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी अधिवक्ता सुभाष झा आणि अधिवक्ता अंबरीष मिश्रा यांनी म्हटले, ‘‘न्यायालयात जामिनासाठी १०० अर्ज प्रलंबित असतांना आर्यन खान यालाच जामीन मिळाला.’’ |