अतिक्रमणाच्या नोटिसेचा कालावधी संपल्यावर कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबवू नका ! – शंकरराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर
पन्हाळा आणि विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाची ‘ऑनलाईन’ बैठक
कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – पुरातत्व विभागाने विशाळगड येथील अतिक्रमण धारकांना नोटिसा दिल्या आहेत. २२ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे ३० दिवस पूर्ण होतील. हा कालावधी संपल्यावर ज्या यंत्रणेचे साहाय्य आवश्यक आहे त्या यंत्रणेचे साहाय्य घ्या; मात्र कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबवू नका, असे आदेश कोल्हापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिले. २७ ऑक्टोबर या दिवशी विशाळगड आणि पन्हाळा येथील अतिक्रमणाच्या संदर्भात आयोजित ‘ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे त्यांनी हे आदेश दिले. पुढील बैठक ३० नोव्हेंबर या दिवशी घेण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.
या बैठकीसाठी पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे, शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार, पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वनविभागाचे अधिकारी, तसेच विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते. अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व विभाग, शाहूवाडी-पन्हाळा येथील तहसीलदार आणि संबंधित सर्व विभाग यांनी समन्वय साधून आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी अन् अतिक्रमणाचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.
१. प्रारंभी विलास वहाणे यांनी विशाळगड येथील ४५ अतिक्रमणधारकांना पुरातत्व विभागाने ३० दिवसांच्या नोटिसा दिल्या असून त्यात प्रामुख्याने शेती, घरे, दुकाने, भाड्याने देण्यासाठी गाळे उभे करणे अशा लोकांचा समावेश असल्याचे सांगितले.
२. पन्हाळा तहसीलदारांनी आमच्याकडे केवळ २ च अतिक्रमणधारक असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. यावर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी एखादे प्रकरण नुसते न्यायालयात गेले म्हणजे न्यायप्रविष्ट झाले असे नाही, तर त्यावर न्यायालयाचा कोणत्याही प्रकारचा आदेश येत नाही तोपर्यंत प्रशासनास कारवाई करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाचा कोणताही आदेश नसल्यास कारवाई करण्याचे थांबू नका, असे सांगितले.
३. शाहूवाडी तहसीलदारांनी पुढील मासात आम्ही विशाळगड येथील मोजणी करणार असून त्यात आणखी काही अतिक्रमणे निघण्याची शक्यता आहे, असे सांगितले.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा गडावर २५ अतिक्रमणे ! – बाबासाहेब भोपळे
या बैठकीत श्री. बाबासाहेब भोपळे म्हणाले, ‘‘गतवेळी पन्हाळा तहसीलदारांनी या गडावर कोणतीही अतिक्रमणे नाहीत, असे सांगितले, तर या वेळी केवळ २ च अतिक्रमण आहेत, असे सांगत आहेत. वस्तूत: आम्ही भारतीय पुरातत्व खात्याकडून माहितीच्या अधिकारात मिळाळेल्या माहितीच्या आधारे पन्हाळा गडावर २५ अतिक्रमणे असल्याचे स्पष्ट केले होते. त्या संदर्भात सूची आणि निवेदन आम्ही पन्हाळा तहसीलदार अन् कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले आहे. इतके स्पष्ट असूनही प्रशासन केवळ २ च अतिक्रमण कशाच्या आधारे सांगते ? तरी यावर योग्य ती कृती व्हावी.
याच समवेत पन्हाळा येथे ऐतिहासिक स्मारकांची दुरवस्था आहे. वीर शिवा काशीद यांच्या समाधीला गडावरून येणार्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला असून तेथील ‘पेव्हर ब्लॉक’ निघत आहेत. गडावर प्राचीन हरिहरेश्वर मंदिर असून त्याच्या बाजूला असलेली दोन कुंड पूर्णत: बुजलेली आहेत. ही कुंड खुली करण्यासाठी पुरातत्व विभागाने प्रयत्न करावेत.’’
यावर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी या संदर्भात पुरातत्व विभागाला काय करता येईल ?, ते पहाण्याचे आदेश दिले.