प्रेमळपणा या गुणामुळे रामनाथी आश्रमातील वैद्य साधकांचे आधारस्तंभ ठरलेले पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !
२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. (कै.) वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांनी देहत्याग केला. ते पुष्कळ नामांकित वैद्य होते. आयुर्वेदिक औषधे बनवण्यात ते निष्णात होते. त्याच समवेत ते सातत्याने ईश्वराच्या अनुसंधानातही असायचे. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन, साधकांना पू. भावेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. सहजता
‘काही वर्षांपूर्वी मी सुटीत रामनाथी आश्रमात आल्यावर चिकित्सालयामध्ये माझी पू. भावेकाकांशी प्रथमच भेट झाली होती. त्यांच्यामध्ये पुष्कळ सहजता असल्याने ‘पू. काका संत असूनही मला ते जवळचे, प्रेमळ आणि आमची काळजी घेणारी वडीलधारी व्यक्ती आहे’, असे वाटले. मला त्यांच्याशी बोलतांना ‘आमची पुष्कळ जुनी ओळख आहे’, असे जाणवायचे.
२. जवळीक साधणे
अ. पू. भावेकाका यांचे पुण्याच्या ‘अष्टांग आयुर्वेद’ महाविद्यालयामध्ये शिक्षण झाले होते. माझेही शिक्षण त्याच महाविद्यालयामध्ये झाल्याने आमच्यामध्ये एक वेगळीच जवळीक झाली. पू. काकांना ज्या वैद्यांनी शिकवले आणि त्यांना ज्यांचा सहवास लाभला, त्यांची वैशिष्ट्ये अन् त्यांचे रुग्णानुभव अशा दुर्मिळ गोष्टी पू. काकांनी मला अगदी बारकाव्यानिशी सांगितल्या.
आ. आयुर्वेदिक औषधीकरण क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याच्या अंतर्गत त्यांनी सर्वत्रच्या वैद्यांना पुष्कळ चांगल्या प्रकारे जोडून ठेवले होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या दौर्याच्या सुमारास खोपोलीला वैद्यकीय सेवा करणार्या माझ्या वैद्य असलेल्या मामांच्या चिकित्सालयालाही त्यांनी भेट दिली होती.
३. सखोल मार्गदर्शन करणे
एखाद्या सूत्राविषयी त्यांना विचारल्यावर ते त्या संदर्भातील अनेक सूत्रे मला आठवणीने सांगायचे. पू. काकांनी ‘आणखी कुणाकडे जाऊन काय शिकू शकते ?’, याविषयीही मला अनमोल मार्गदर्शन केले.
४. प्रीती
अ. एकदा पू. भावेकाका आणि त्यांच्या पत्नी काही कामानिमित्त पुण्यामध्ये आले होते. तेव्हा त्यांनी मला आवर्जून बोलावून घेतले. औषधीकरणाच्या संदर्भातील काही सेवा झाल्यावर त्यांनी अतिशय हौसेने आम्हाला सर्वांच्या आवडीचा खाऊ खायला नेले. त्यांच्यातील ‘प्रीती’ या दैवी गुणामुळे ते अतिशय सहजतेने सर्वांना सामावून घेत असत.
आ. एकदा परीक्षा झाल्यावर सुटीमध्ये मी रामनाथी आश्रमातील चिकित्सालयामध्ये सेवेसाठी आले होते. त्याच सुमारास माझ्या परीक्षेचा निकाल लागला. तेव्हा पू. काकांना अतिशय आनंद झाला आणि कौतुकाने त्यांनी स्वतःहून सर्वांसाठी पेढे अन् खाऊ मागवला.
५. कर्तेपणा नसणे
पू. भावेकाकांमधील अंतर्मुखतेमुळे ते स्वतःकडे कर्तेपणा न घेता तो ईश्वरचरणी समर्पित करायचे.
६. अनुभूती
अ. ‘त्यांची आठवण येऊन मला त्यांच्याशी बोलावे’, असे वाटायचे. तेव्हा मी त्यांना संपर्क करण्याआधीच ते स्वतःहून मला भ्रमणभाषद्वारे संपर्क करायचे. याचे मला नेहमीच पुष्कळ विशेष वाटून त्यातील आनंद अनुभवता यायचा.
आ. त्यांना भेटल्यावर किंवा त्यांना संपर्क केल्यावर ते नेहमी माझ्या घरच्यांची आणि विशेषतः आईची अतिशय आपुलकीने विचारपूस करायचे. आम्हा कुटुंबियांना होणार्या त्रासांसाठी ते औषधोपचार अन् नामजपादी उपायही सांगायचे. त्याचा आम्हाला बराच लाभ झाला.
इ. एकदा मी रामनाथी आश्रमामध्ये असतांना आईला होत असलेल्या त्रासाविषयी पू. काकांना केवळ सांगताच आणि त्यांनी त्यावर औषधोपचार सांगण्यापूर्वीच बर्याच प्रमाणामध्ये आईचा त्रास उणावला. हीसुद्धा आम्हा सर्वांसाठी पुष्कळ मोठी अनुभूती होती. आम्हा सर्वांना त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
ई. पू. काकांचे दर्शन आणि संवाद यांतून मला पुष्कळ हलकेपणा जाणवायचा. मला ऊर्जा मिळून आनंदी आणि उत्साही वाटायचे. (१.७.२०२१)
वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रख्यात वैद्य असूनही साधी रहाणी
‘पू. भावेकाका एक प्रख्यात वैद्य होते. ते सिद्ध करत असलेली औषधे फार प्रसिद्ध होती. असे असूनही त्यांचे रहाणीमान अतिशय साधे होते.
२. प्रीती
काही वेळा जिल्ह्यांमध्ये धर्मप्रसाराची सेवा करणारे साधक आश्रमात आले की, तपासणीसाठी चिकित्सालयात यायचे. तेव्हा पू. भावेकाका त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अतिशय प्रेमाने विचारपूस करायचे. त्यामुळे ते साधक पुन्हा आश्रमात आल्यावर पू. भावेकाकांची आठवण काढायचे. पू. काका पहिल्या भेटीतच समोरच्याशी लगेच जवळीक साधायचे.
३. निरपेक्ष प्रीती
एकदा पू. काका घरी जाणार होते. तेव्हा एका साधिकेने त्यांना सहज सांगितले, ‘‘पू. काका, मला घरी लावण्यासाठी येतांना अळूवडी करतात, ते अळूचे एक रोप आणू शकाल का ?’’ पू. काकांनी घरून आश्रमात परत येतांना त्यांच्या एवढ्या व्यस्ततेतही आठवणीने तिच्यासाठी एका पिशवीमध्ये अळूचे रोप आणले होते.
४. वैद्यांची अडचण तत्परतेने सोडवणारे पू. भावेकाका !
‘आम्हा वैद्यांना कुठलीही अडचण आली की, ग्रंथामधील संदर्भ पहाण्याआधी ‘पू. भावेकाकांना अडचण विचारल्यास ती लगेच सुटेल’, याची आम्हाला निश्चिती असायची. त्यामुळे आम्हाला त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा. पू. काकांना कुठल्याही वेळी भ्रमणभाष केला, तरी ते नेहमी आमच्या शंका सोडवण्यासाठी वेळ द्यायचे.
५. श्री गुरूंचे आज्ञापालन करण्याची तळमळ
एकदा चिकित्सालयात सेवा करणार्या साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू होता. पू. काकांनी तो ऐकला. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सारणी लिखाण कसे करतात ? स्वयंसूचनांची सत्रे कशी करायची ?’, हे मलाही सांगा. मीही ते चालू करतो.’’ यातून संत असूनही गुरुमाऊलीने सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्याची त्यांची तळमळ आणि शिकण्याची वृत्ती हे गुण मला शिकायला मिळाले.’(१.७.२०२१)
वैद्या (सौ.) अपर्णा हृषिकेश नाईक, ढवळी, फोंडा, गोवा.
१. ‘पू. भावेकाका यांचा स्वभाव प्रेमळ होता. ते सगळ्यांची नेहमीच विचारपूस करायचे.
२. माझे गर्भारपण आणि बाळंतपण यांत पथ्यापथ्य किंवा अन्य काळजी घेण्याविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केले होते.’ (१.७.२०२१)
सौ. ज्योती कांबळे, फोंडा, गोवा.
१. सहजावस्था
‘कधी काही औषधे तातडीने काढायची सेवा आली, तर पू. काका आम्हाला सांगत, ‘‘औषधे काढायला मीही तुम्हाला साहाय्य करतो, म्हणजे अपेक्षित वेळेत सेवा पूर्ण होईल.’’ पू. काकांची इतकी सहजावस्था होती की, ती आठवली, तरी ‘आताही सेवा करतांना पूज्य काका आमच्या समवेत आहेत’, असे जाणवते.
२. पू. भावेकाकांची अनुभवलेली अपार प्रीती !
२ अ. आगगाडीने प्रवास करतांना एक छोटी मुलगी पू. काकांना बिलगून बसणे आणि तहान लागल्यावर तिने पू. काकांकडे पाणी मागितल्यावर पू. काकांनी कुठलाही विचार न करता तिला स्वतःजवळचे पाणी पिण्यासाठी देणे : पू. काका ‘प्रीतीचा सागर’ होते. एकदा पू. काका आणि आम्ही कुटुंबीय एकाच आगगाडीने प्रवास करत होतो. तेव्हा एक लहान मुलगी पू. काकांना अगदी बिलगून बसली होती. ती तिच्या आईकडे जात नव्हती. काही वेळाने तिने पू. काकांकडे पाणी मागितले. प्रत्यक्षात पू. काकांकडे पाण्याची एकच बाटली होती आणि पुढचा प्रवासही लांबचा होता, तरीही कसलाही विचार न करता पू. काकांनी तिला पाण्याची बाटली दिली. तिच्या आईने तिला याविषयी सांगितल्यावर ते तिच्या आईला म्हणाले, ‘‘असू दे. तिला माझ्याकडूनच पाणी हवे आहे.’’
२ आ. रुग्ण साधिकेला होत असलेला त्रास पाहून पू. काकांनी तिच्या समवेत आलेल्या साधिकेला तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवण्यास सांगणे : पू. काकांना रुग्ण साधकांच्या वेदना पहावत नसत. एकदा चिकित्सालयात एक वैद्य आले होते. ते एका साधिकेच्या पायावर उपचार करत असतांना तिला पुष्कळ वेदना होत होत्या. पू. काकांनी त्या साधिकेच्या समवेत आलेल्या साधिकेला सांगितले, ‘‘ती कळवळत आहे. तिच्या डोक्यावरून हात फिरव. किमान तिचा हात हातात घेऊन तिला आधार दे. असे केल्याने तिला बरे वाटेल.’’
३. सूक्ष्मातून रुग्णाचा आजार समजणे
पू. भावेकाकांना एखाद्या रुग्ण साधकाला पाहिल्यावरच त्याच्या व्याधी समजत असत, तरीही रुग्ण त्याचे त्रास सांगत असतांना ‘त्या रुग्णाचे मन हलके व्हावे’, या भावाने पू. काका ध्यान लागल्यासारखे सर्वकाही शांतपणे ऐकायचे. मी एकदा पू. काकांना ‘मला काही शारीरिक त्रास होत आहेत’, असे सांगितले. त्यांना आध्यात्मिक त्रासही कळत असल्याने त्यांनी मला औषधे देण्याआधी सांगितले, ‘‘नामजपादी उपायही विचारून घ्या, म्हणजे लवकर बरे वाटेल.’’
४. भाव
पू. काकांना इतरांना खाऊ घालायला अतिशय आवडायचे; परंतु त्यांचा स्वतःचा आहार अगदी अल्प होता. त्याविषयी एकदा ते म्हणाले, ‘‘आता देहाच्या हालचालीसाठी आहार घ्यायचा’’ आणि हातातील माळ दाखवून म्हणाले, ‘‘आता परम पूज्यांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा हाच माझा मोठा आधार आहे.’’ त्यांची प.पू. गुरुमाऊलीवर असलेली अपार श्रद्धा त्यांच्या दृष्टीतून जाणवत असे.’ (३०.६.२०२१)
सौ. गौरी चौधरी, फोंडा, गोवा.
१. ‘पू. काकांवर पंचकर्म उपचार करतांना माझ्या मनाची स्थिती चांगली नसली, तर बर्याचदा ‘माझे मन आणि बुद्धी यांवर आलेले आवरण त्यांची सेवा केल्यामुळे नष्ट होत आहे’, असे माझ्या लक्षात यायचे अन् माझ्या मनाची स्थिती चांगली व्हायची.
२. पू. काकांसमवेत सेवा करतांना पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवायचा.’ (३०.६.२०२१)
कु. मनीषा राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रत्येक कृती सुंदर आणि परिपूर्ण करणे
‘आयुर्वेद औषधे काढत असतांना त्यांनी आम्हाला ‘योग्य पुडी कशी करायची ?’, हे शिकवले. त्यांनी केलेली पुडी आणि आम्ही केलेली पुडी यांची तुलना केल्यावर पू. काकांची पुडी अतिशय सुंदर बांधलेली असायची. ते म्हणायचे, ‘‘ती पुडी चौथ्या माळ्यावरून खाली टाकली, तरी ती तशीच रहायला हवी.’’
२. नियोजनकौशल्य
पू. काका त्यांचे गावाकडील घर, शेती आणि औषधालय येथील सर्व नियोजन आश्रमातूनच करायचे आणि तिकडे तसे भ्रमणभाषवर सांगायचे. त्याप्रमाणे तेथील सेवा केल्या जायच्या. पू. काकांचे नियोजन अतिशय उत्तम होते.’(३०.६.२०२१)
चिकित्सालयातील सर्व साधक‘त्यांच्या देहत्यागामुळे ते सगुणातून आपल्या समवेत नसले, तरी निर्गुणातून ते नेहमीच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत रहाणार आहेत’, याची निश्चिती वाटते. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हा सर्वांना पू. भावेकाकांचा अनमोल सत्संग लाभला’, यासाठी आम्ही सर्व जण त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत. ‘पू. भावेकाका यांनी आम्हाला जे शिकवले, ते आचरणात आणण्यासाठी आम्हा सर्व साधकांकडून देवाला अपेक्षित असे प्रयत्न होऊ देत. प.पू. गुरुदेव आणि पू. भावेकाका यांना अपेक्षित अशी आयुर्वेदाच्या संदर्भातील सेवा आम्हा सर्वांकडून करवून घ्यावी’, अशी प.पू. गुरुदेव अन् भगवान धन्वन्तरि देवता यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’ (३०.६.२०२१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |