कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे !
१. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सहजतेने सांगणे : ‘कै. (सौ.) प्रमिला केसरकरकाकू आणि मी व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या एकाच गटात होतो. काकू आढाव्यात ‘कोणत्या प्रसंगात स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू उफाळून आले ?’, हे सहजतेने सांगायच्या. नंतर त्यांची प्रकृती पुष्कळ खालावल्यामुळे त्या आढावा देण्यासाठी येत नव्हत्या; पण त्यांची साधना मात्र अखंड चालू होती. हे त्यांच्या झालेल्या आध्यात्मिक उन्नतीवरून लक्षात येते.
१ आ. काकूंना त्यांची सेवा करणार्या यजमानांविषयी कृतज्ञता वाटणे : काकू स्वतःच्या आजाराविषयी अल्प बोलायच्या. त्या त्यांना होणार्या शारीरिक त्रासाविषयी सांगायच्या; पण त्यात अवडंबर नसायचे. केसरकरकाका (काकूंचे यजमान अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे), आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सतत त्यांची सेवा करायचे. काकूंना काकांप्रती कृतज्ञता वाटायची.
१ इ. सेवेची तळमळ : काकूंची प्रकृती ठीक असेपर्यंत त्यांनी संकलनाची सेवा चांगल्या प्रकारे केली. ‘संकलनाच्या सेवेमुळे देव त्यांना आजारपणाच्या मानसिक त्रासापासून दूर ठेवत होता’, असे मला जाणवत होते.
२. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. काकूंकडे पाहून ‘सामान्य व्यक्ती मृत्यूचे भय बाळगते; पण साधनारत व्यक्तीला मृत्यूचे भय नसते’, असे मला जाणवले.
आ. काकूंच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना ‘त्या शांतपणे पुढच्या प्रवासाला निघाल्या आहेत’, असे मला वाटले.’
– रजनी नगरकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)
पत्नीच्या आजारपणात तिची अविरत सेवा करणारे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) !‘अधिवक्ता रामदास केसरकरकाकांनी स्वतःचा विचार न करता सौ. प्रमिला केसरकर यांची अविरत सेवा केली. मी त्यांना कधीतरी विचारायचे, ‘‘काका, मी तुम्हाला काय साहाय्य करू ?’’ तेव्हा ते सहजतेने हसत म्हणायचे, ‘‘मी तुम्हाला नक्की सांगीन.’’ – रजनी नगरकर (१९.१०.२०२१) |