कळंबोली (जिल्हा रायगड) येथील सुधागड विद्या संकुल शाळेला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !
सनातन संस्थेचे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत रामदास शेवाळे प्रतिष्ठानचा उपक्रम !
पनवेल, २७ ऑक्टोबर (वार्ता) – कळंबोली (रायगड) येथील ‘सुधागड एज्युकेशन सोसायटी’च्या अंतर्गत सुधागड विद्या संकुल शाळेला ‘श्री रामदास शेवाळे प्रतिष्ठान’च्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रामदास शेवाळे यांच्या हस्ते ग्रंथालयाला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट देण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘सुधागड एज्युकेशन सोसायटी’चे शिक्षण महर्षि दादासाहेब लिमये यांच्या छायाचित्राचे श्री रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रामदास शेवाळे यांनी पुष्पहार घालून पूजन केले.
श्री. रामदास शेवाळे यांनी उपस्थित १४० शिक्षक- शिक्षिका यांना ग्रंथ भेट देण्याचा उद्देश समजावून सांगितला. या वेळी ते म्हणाले, ‘‘मुलांवर संस्कार करायला हवेत. दूरचित्रवाणी, इंटरनेट आणि भ्रमषभाष यांच्या माध्यमातून मुले संस्कृती अन् संस्कार विसरत आहेत. मी नक्कीच समाजकार्यासाठी उभा राहीन.’’
या वेळी व्यासपिठावर श्री रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे श्री. रामदास शेवाळे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक श्री. आत्माराम गावंड, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य श्री. राजेंद्र पालवे, समाजसेवक श्री. सतीश बिचुकले आणि श्री. प्रशांत ननावरे, सनातन संस्थेचे श्री. उमेश किचंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक आणि विद्यार्थी यांनी वाढदिवसानिमित्त शाळेच्या ग्रंथालयाला सनातनचे ग्रंथ भेट देण्याची प्राचार्यांची मागणी !
शाळेचे प्राचार्य श्री. राजेंद्र पालवे यांनी ‘ग्रंथालयामध्ये ग्रंथ वाचन करणे किती महत्त्वाचे आहे’, याविषयी समजावून सांगितले. ‘शिक्षकांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेच्या ग्रंथालयाला सनातनचे भेट द्यावेत, तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर व्यय न करता शाळेच्या ग्रंथालयाला ग्रंथ भेट द्यावेत’, अशी त्यांनी विनंती केली.