नवी मुंबईत पत्रकारांसाठी इंग्रजी भाषा कार्यशाळेचे आयोजन !
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका पत्रकार कक्षाच्या वतीने इंग्रजी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले-पाटील, व्याख्याते संजय लीला बाळकृष्ण उपस्थित होते.
‘ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा शिकली, तरी मराठी भाषेचा दर्जा उच्चच असेल’, असा आशावाद मान्यवरांनी या वेळी व्यक्त केला.
‘इंग्रजी हे संभाषण कौशल्य असून ते वाया जात नाही’, असे मत अभिजित बांगर यांनी व्यक्त केले. या वेळी इंग्रजी भाषा आत्मसात करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. संजय लीला बाळकृष्ण यांनी साध्या सोप्या शैलीत इंग्रजी भाषेची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले-पाटील यांनी ‘भविष्यात हा उपक्रम महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राबवणार आहे’, असे सांगितले.