सेवेत कायम करा ! – शारीरिक शिक्षकांची धरणे आंदोलनाद्वारे मागणी

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पणजी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यातील विविध शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या शारीरिक शिक्षकांनी (फिजिकल ट्रेनिंग टिचर) ‘सेवेत कायम करावे’, यासाठी पणजी येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारने शिक्षकाना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन दिले होते. आता ५ वर्षे उलटली, तरी स्थिती आहे तशीच आहे. त्यामुळे जोपर्यंत शिक्षण खाते आश्‍वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवले जाईल, अशी चेतावणी शिक्षकांनी दिली आहे. याविषयी एक शिक्षक गंगाराम लांबोर म्हणाले, ‘‘आम्ही अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर केवळ प्रतिमास १५ सहस्र रुपये वेतनावर काम करत आहोत. त्यामुळे अल्प वेतनामध्ये घर कसे चालवायचे ? किंवा स्वतःचा खर्च कसा करायचा ? असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला सेवेत कायम करावे किंवा ज्या शाळांमध्ये कायम पदे भरायची आहेत, त्या पदांवर नियुक्ती करावी. ‘सरकारी खात्यांमध्ये १० सहस्र पदे भरणार’, असे सरकार सांगत आहे. त्यातील ५० जागा तरी आम्हाला द्याव्यात. आसाम, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांतील सरकारे कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करण्यास प्राधान्य देत आहे. मग गोव्यात तसे का केले जात नाही ? सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. विधानसभा निवडणुका केवळ २ मासांवर येऊन ठेपल्याने आता तरी आमची मागणी मान्य करून शिक्षकांना न्याय द्यावा.’’