मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी ३ सहस्र ७०० कोटींपैकी २ सहस्र ८३० कोटी रुपये मिळाले !
संभाजीनगर – अतीवृष्टीमुळे मराठवाड्यात ४७ लाख ७४ सहस्र ४८९ शेतकर्यांची ३६ लाख ५२ सहस्र ८७२ हेक्टर शेतीची हानी झाली होती. वाढीव दरानुसार ३ सहस्र ७६२ कोटी रुपयांचे अतीवृष्टीसाठीचे साहाय्य राज्यशासनाच्या घोषणेनुसार संमत झाले आहे. त्यापैकी राज्यशासनाने ७५ टक्के याप्रमाणे मराठवाड्याला २ सहस्र ८६० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. या संदर्भात राज्यशासनाने याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या २ दिवसांत हा निधी वितरित करण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी संभाजीनगर येथे दिली.
‘१३ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्याचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात येईल’, असे घोषित केले होते. त्यामुळे शासनाचा निधी कधी येणार ? याची प्रतीक्षा होती. विरोधी पक्षाच्या वतीनेही दिवाळीत पैसे मिळणार कि नाही ? याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याविषयी महसूल उपायुक्त पराग सोमण म्हणाले की, निधी प्राप्त झाल्याचे आदेश आले आहेत. ही रक्कम जमा होऊन एका दिवसात सर्व जिल्हाधिकार्यांना मिळेल. त्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून अधिकोषाला निधी देत या रक्कमेचे वाटप होईल.