नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात चोरी !
अकार्यक्षम पोलीस यंत्रणा !
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार्या बंगल्यात चोरी होतेच कशी ? अशी पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांच्या घरांचे रक्षण काय करणार ? – संपादक
नाशिक – येथील विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सरकारी बंगल्यात चोरी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. अज्ञात चोरट्यांनी गमे यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले आहे. प्रत्यक्षात तेथे २४ घंटे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याही बंगल्यांच्या आवारात चोर्या झाल्या आहेत. याविषयी सर्व गुन्हे नोंद असतांना आतापर्यंत एकही चोर पोलिसांना सापडलेला नाही. (चोरीच्या प्रकरणांतील एकही आरोपी न सापडणे हे संतापजनक आहे. चोराला शोधू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ? – संपादक)
येवला येथे ७ ठिकाणी घरफोड्या !
जिल्ह्यातील येवला शहरात चोरट्यांनी ७ ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. ५ ठिकाणी बंद घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडत चोरी केली, तर परिसरातील राधाकृष्ण मंदिर आणि आनंदनगर भागातील गणपति मंदिर यांतील दानपेटी फोडत चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरली. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (लहानशा शहरात ७ ठिकाणी घरफोड्या होणे हे पोलिसांसाठी लाजिरवाणे नव्हे का ? – संपादक)