भूत आणि भविष्य या काळांतील गोष्टी कळणारा अन् देशाचे रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणारा कु. अवधूत संजय जगताप !
भूत आणि भविष्य या काळांतील गोष्टी कळणारा अन् देशाचे रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणारा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत संजय जगताप (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अवधूत जगताप आणि चि. कृष्णाली माने ही आहेत !
२७ ऑक्टोबर २०२१ या दिवशीच्या अंकात मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. अवधूत जगताप याने सांगितलेले उपाय केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांचा आध्यात्मिक त्रास दूर होणे याविषयी वैशिष्ट्यपूर्ण लिखाण पाहिले. कु. अवधूतमध्ये भूत आणि भविष्य या काळातील गोष्टी कळणे, तसेच पृथ्वीवर आलेल्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढून देशाचे रक्षण करण्यासाठी ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणे यांविषयीची सूत्रे आज पाहूया.
‘अध्यात्मातील जाणकार दैवी बालक कसे असतात ?’, हे अवधूतच्या उदाहरणावरून लक्षात येईल. बुद्धीप्रामाण्यवादी अवधूतबद्दलची माहिती काल्पनिक असल्याचे म्हणतील ! हे त्यांच्या घोर अज्ञानाचे एक प्रतीक असेल. देवाने आपल्याला अवधूतसारख्या अपूर्व दैवी बालकाची माहिती दिल्याबद्दल आपण कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती कमीच असेल. अवधूतमुळे ‘पुढे येणारे ईश्वरी राज्य कोण सांभाळणार ?’, याची मला काळजी उरली नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.६.२०२०) |
४. सूक्ष्मातील गोष्टी जाणण्याची क्षमता असलेला अवधूत !
४ अ. अवधूतला रहात्या घराच्या पूर्वेतिहासाविषयी काही ठाऊक नसतांना त्याने त्याविषयी सत्य माहिती सांगणे : २४.५.२०२० या दिवशी अवधूत मला म्हणाला, ‘‘आई, आपण रहात असलेला हा बंगला बरीच वर्षे असाच पडून होता ना ? इथे कुणीही रहात नव्हते. तेव्हा या घरात वाईट शक्ती रहात होत्या. येथे फार त्रास होता. आपण येथे रहायला येण्याआधी देवाचे आणि वाईट शक्तींचे युद्ध झाले. त्यामुळे वाईट शक्ती येथून निघून गेल्या. मग देवाने आपल्याला येथे रहायला आणले. हे सर्व देवाचेच नियोजन होते.’’ वास्तविक या घराविषयी अवधूतला काहीच ठाऊक नव्हते. प्रत्यक्षातही हा बंगला बरीच वर्षे पडून होता. येथे कुणीही रहात नव्हते. पूर्वी या बंगल्यात राजकारणी मंडळींच्या पार्ट्या, दारू, जुगार आदी सर्व चालायचे. त्यामुळे येथे रहायला आल्यानंतर आरंभी आम्हा सर्वांना पुष्कळ त्रास झाला. नंतर सनातन संस्थेने सांगितलेले आध्यात्मिक उपाय करायला लागल्यावर हा त्रास पुष्कळ न्यून झाला.
४ आ. ‘पृथ्वीवर भरपूर वाईट शक्ती आल्या आहेत. त्यामुळे मला साधना करून लवकर ‘संत’ व्हायचे आहे’, असे अवधूतने सांगणे : कोरोनाचे संकट येण्याच्या ३ – ४ मास आधी अवधूत आणि माझ्यात पुढील बोलणे झाले.
अवधूत : मला लवकरात लवकर ‘संत’ व्हायचे आहे. पृथ्वीवर भरपूर वाईट शक्ती आल्या आहेत. त्या माणसांना त्रास देण्यासाठी आल्या आहेत; पण देवबाप्पा आपले रक्षण करत आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर संत व्हायचे आहे.
मी : संत होण्यासाठी पुष्कळ साधना करावी लागते. पुष्कळ नामजप करावा लागतो. तुझा तेवढा नामजप होत नाही.
अवधूत : संत होण्यासाठी मी प्रयत्न करीन. मी साधना वाढवतो.
४ इ. ‘देवाने देशाचे रक्षण करण्यासाठी मला शक्ती आणि आशीर्वाद दिला आहे’, असे अवधूतने सांगणे : २६.५.२०२० या दिवशी आमच्यात पुढील संवाद झाला.
अवधूत : आई, देवाने मला एवढी शक्ती आणि आशीर्वाद कशासाठी दिला आहे ?, सांग.
मी : तूच देवबाप्पाला विचार.
अवधूत (डोळे मिटून प्रार्थना केली) : देवाने मला उत्तर दिले, ‘तुला देश चालवायचा आहे. त्यासाठी तुला आशीर्वाद दिला आहे.’
एरव्हीही तो नेहमी मला म्हणतो, ‘‘मला देशाचे रक्षण करायचे आहे.’’
५. योग्य दृष्टीकोन देऊन आई-वडिलांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणारा तत्त्वनिष्ठ अवधूत !
५ अ. आई-वडिलांमध्ये एका सूत्रावर वाद झाल्यावर अवधूतने दोघांनाही साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन एकमेकांची क्षमा मागायला सांगणे : २३.५.२०२० या दिवशी यजमानांच्यात आणि माझ्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. दोघेही आपापल्या मतावर ठाम राहून स्वतःची चूक मान्य करत नव्हतो. त्या वेळी अवधूत तेथेच खेळत होता; पण त्याचे आमच्याकडे लक्ष होते. तो मला म्हणाला, ‘‘आई, या प्रसंगात तुझी चूक आहे. तू बाबांची क्षमा माग.’’ तेव्हा माझा अहं दुखावल्यामुळे मला ‘क्षमा मागायला नको’, असे वाटत होते. माझ्या मनातील विचार त्याला कळला असावा. तो मला म्हणाला, ‘‘आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी क्षमा मागायला हवी, नाहीतर आपली साधना वाया जाते. क्षमा मागितल्याने देवबाप्पा आपल्याला क्षमा करतो आणि ते देवाला आवडते. तू या चुकीसाठी प्रायश्चितही घे.’’ या वेळी तो तत्त्वनिष्ठपणे बोलत होता. नंतर तो त्याच्या वडिलांना म्हणाला, ‘‘बाबा, तुमचीही थोडी चूक आहे. तुम्हीही आईची क्षमा मागा.’’ यजमानांना ते मान्य नव्हते. त्यांनी चूक मनापासून स्वीकारली नव्हती. तेव्हा तो बाबांना म्हणाला, ‘‘मी सांगतो आहे; म्हणून तुम्ही चूक स्वीकारत आहात; पण आपण चूक मनापासून स्वीकारली, तरच देव आपल्याला क्षमा करतो.’’
५ आ. ‘आध्यात्मिक त्रासामुळे प्रसंग घडला’, असे सांगून दोघांनाही नामजपादी उपाय वाढवण्यास सांगणे : नंतर अवधूत म्हणाला, ‘‘हा प्रसंग आध्यात्मिक त्रासामुळे घडला आहे. वाईट शक्ती आपल्यातील स्वभावदोष आणि राग यांचे प्रमाण वाढवतात अन् त्यामुळे असे घडते. त्यासाठी आपण उपाय आणि साधना भरपूर वाढवली पाहिजे.’’
‘हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे आम्हाला या दैवी बालकाचा सहवास मिळत आहे. आमच्या मनात सदैव कृतज्ञतेचा भाव राहू दे. ‘आमच्यावर तुमची कृपादृष्टी सदोदित राहू दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’ (समाप्त)
– सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई), मिरज, सांगली. (जून २०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |