‘आश्रम’ मालिकेवर तत्परतेने बंदी घाला !
संपादकीय
मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या पवित्र आश्रमसंस्कृतीचे अश्लाघ्य चित्रण करणार्या ‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची तोडफोड केली. ‘सातत्याने हिंदु धर्माचा घोर अवमान होत असतांना आणि तो थांबतच नसतांना किती काळ हिंदूंनी ते सहन करायचे ?’, असे कुणाला वाटले’, तर चूक कसे म्हणता येईल ? हिंदूंना भावना नाहीत का ? कि अवमान केवळ कुराणाचा होतो ? धर्माभिमानी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी ‘आश्रम १’ या वेब सिरीजच्या विरोधात सनातन हिंदु धर्माची अपकीर्ती केल्याप्रकरणी जोधपूर येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. तरीही त्यापुढे जाऊन या मालिकेचा ‘भाग २’ प्रदर्शित होऊन आता ‘भाग ३’चे चित्रीकरण चालू आहे. याचा अर्थ या मालिकेचे निर्माते आणि संबंधित यांना कायद्याच्या धाकाची कोणतीही भीती नाही. ‘खटला न्यायालयात चालू राहील आणि मालिका बनवण्याचे कामही चालू राहील’, असे त्यांना वाटते.
लोकप्रतिनिधी उदासीन का ?
‘आश्रम’ या मालिकेच्या सर्व भागांचे चित्रीकरण भोपाळ येथे झाले आहे. बजरंग दलाने आक्रमकपणे विरोध केल्यावर मध्यप्रदेशचे लोकप्रतिनिधी ‘आश्रम’ मालिकेच्या विरोधात बोलू लागले आणि प्रश्न करू लागले. हे एक प्रकारे चांगले झाले; परंतु ‘आश्रम’ ही मालिका प्रदर्शित झाल्यावर आणि होण्यापूर्वीपासूनच हिंदुत्वनिष्ठांनी त्यास विरोध चालू केला होता. त्या वेळी तेथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी त्याची नोंद घेत या मालिकेचे चित्रीकरण बंद पाडून संबंधितांना शिक्षा करणे अपेक्षित होते. ‘भाजपच्या राज्यात अशा प्रकारे हिंदु संस्कृतीचा अतिशय अश्लाघ्यरित्या अवमान होऊनही तो अनेक मास तसाच चालू दिला जातो’, हे हिंदूंना अपेक्षित नाही. त्यामुळे ‘हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमकता दाखवल्याविना त्यांचे लोकप्रतिनिधीही देवता, धर्म, संस्कृती यांची विटंबना रोखण्यास स्वतःहून पुढाकार घेत नाहीत’, असे हिंदूंना वाटले तर चूक ते काय ? आता बजरंग दलाकडून जोरदार विरोध झाल्याने मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘राज्यामध्ये चित्रीकरणासाठी दिशादर्शिका (गाईडलाईन) बनवली जाईल आणि चित्रपटाची संहिता वाचायला देणे बंधनकारक असेल.’
सनातन संस्कृती ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, अशा ४ आश्रमांवर आधारित आहे. जीवन जगण्याची ही जगातील सर्वाेच्च आदर्श व्यवस्था आहे. ‘आश्रम’ हा शब्द त्याग, भक्ती, समर्पण यांचे प्रतीक आहे. सनातन हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी जाणूनबुजून सनातन धर्माच्या आदर्श आणि संपूर्ण हिंदु समाजाला सर्वार्थाने सशक्त बनवणार्या परंपरांवर आघात करण्याचे परधर्मियांचे हे जुनेच षड्यंत्र आहे. ‘सरकारने हिंदु धर्मावर आघात करणार्या अशा प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आता स्वतःहून कारवाई करणे आरंभले पाहिजे’, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !