हिंदुद्वेषी ‘वैचारिक’ जिहाद !

संपादकीय

हिंदुविरोधी वैचारिक जिहादचा अंत करण्यासाठी केंद्र सरकार पावले केव्हा उचलणार ?

‘हिंदुत्व हॅरॅसमेंट फील्ड मॅन्युअल’

जिहाद्यांकडून आताच होऊन गेलेल्या नवरात्रीत बांगलादेशातील हिंदू, त्यांची मंदिरे आणि दुर्गादेवीचे पूजा मंडप यांवर शेकडो आक्रमणांच्या घटना घडल्या. तिकडे अफगाणिस्तानमध्येही तालिबान्यांनी मुसलमानेतरांचा छळवाद मांडलेला असतांना त्यावर भारत, तसेच पाश्चात्त्य धर्मनिरपेक्षतावादी गप्प आहेत. जगाच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादावर ‘ब्र’ही न काढणार्‍यांना मात्र ‘हिंदु’ पीडितांचे भय वाटत आहे ?

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) हा द्वेषावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमही अशाच ‘जिहाद’चा प्रकार गेल्या मासात पार पडला. त्यामध्ये सहभागी झालेल्या विविध विद्वानांनी त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन घडवून त्यांच्या बुद्धीची पातळी किती आहे ? हे जगाला दाखवून दिले. आता त्याच्याच उपटसुंभ आयोजकांनी हिंदुत्वाकडून छळ झाल्याचे सांगत जगासाठी चक्क एक ‘फील्ड मॅन्युअल’ (दिशादर्शक माहिती) सिद्ध केले आहे. हिंदूंनी कुणाचा छळ केला (‘हॅरॅसमेंट’ केली) असल्यास त्या छळाला कशा प्रकारे सामोरे जावे ? याविषयी या हिंदुद्वेष्ट्यांनी सिद्ध केलेल्या संकेतस्थळावर विस्ताराने माहिती देण्यात आली आहे. ‘हिंदुत्व हॅरॅसमेंट फील्ड मॅन्युअल’ असे या उपक्रमाचे नाव असून सध्याच्या काळातील वैचारिक जिहादचाच हा एक भयानक प्रकार आहे. या संकेतस्थळाची भयावहता यातून स्पष्ट होते की, त्यावर आस्थापनांचे मालक अथवा कार्यालयीन सहकारी यांना त्यांच्या आस्थापनामध्ये कुणी हिंदु असल्यास त्याच्यापासून कशा प्रकारे सावध रहावे, वेळप्रसंगी त्याच्याशी दोन हात कसे करावेत, याची माहितीही दिली आहे. हे जेवढे लांच्छनास्पद तेवढेच धोकादायक आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंपासून सावध रहाण्यासाठी सांगितलेले उपाय नव्हेत, तर पृथ्वीच्या पाठीवर सर्वांत प्राचीन धर्माला आणि त्याच्या अनुयायींना लक्ष्य करून त्यांचे जीवन कठीण करण्यासाठी दिलेली चिथावणी आहे. पूर्वग्रहाने पछाडलेल्या या प्रकाराला आता प्राणपणाने विरोध होणे आवश्यक आहे.

केंद्र सरकार आक्रमक केव्हा होणार ?

असे सर्व होत असतांना ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ या कार्यक्रमाच्यासंदर्भात भारत सरकारने कोणतीच अधिकृत भूमिका घेतली नाही. बांगलादेशात घडलेल्या हिंदुविरोधी उच्छादाच्या विरोधातही भारतीय शासनकर्त्यांनी मौन बाळगण्यातच धन्यता मानली. ‘जगभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून हिंदूंवरील आक्रमणांवर आवाज उठवला जात असतांना आता केंद्र सरकार हिंदुहितासाठी कार्यरत आहे कि नाही ?’, असा विचार कुणा हिंदूच्या मनाला शिवल्यास त्यात चूक ते काय ? त्यामुळे हिंदूंचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आतातरी हिंदूंची न्याय्य बाजू उचलून धरत षड्यंत्रकार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी, अशी अपेक्षा !