सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला आणि साधना वाढवून लवकरात लवकर ‘संत’ बनण्याचे ध्येय ठेवणारा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अवधूत संजय जगताप (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अवधूत जगताप आणि चि. आनंदी शिंदे हे आहेत !
‘अध्यात्मातील जाणकार दैवी बालक कसे असतात ?’, हे अवधूतच्या उदाहरणावरून लक्षात येईल. बुद्धीप्रामाण्यवादी अवधूतबद्दलची माहिती काल्पनिक असल्याचे म्हणतील ! हे त्यांच्या घोर अज्ञानाचे एक प्रतीक असेल. देवाने आपल्याला अवधूतसारख्या अपूर्व दैवी बालकाची माहिती दिल्याबद्दल आपण कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती कमीच असेल. अवधूतमुळे ‘पुढे येणारे ईश्वरी राज्य कोण सांभाळणार ?’, याची मला काळजी उरली नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.६.२०२०) |
मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. अवधूत जगताप याचा आध्यात्मिक त्रास संतांच्या दर्शनानंतर आणि संतांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर न्यून झाला, याविषयी कालच्या अंकात लिखाण प्रसिद्ध करण्यात आले होते. आजच्या अंकात ‘कु. अवधूतमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे’, याविषयी त्याच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/521703.html
१. गर्भारपणात अवधूतच्या आईने दत्ताची उपासना केलेली असणे आणि रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर अवधूतने ‘स्वतःमध्ये थोडे दत्ततत्त्व आहे’, असे सांगणे
१ अ. गरोदरपणात दत्ताचा नामजप, तसेच गुरुचरित्रातील अध्याय वाचणे अन् बाळाचा जन्म गुरुवारी झाल्याने त्याचे नाव ‘अवधूत’ ठेवणे : ‘अवधूतच्या वेळी गरोदरपणात मी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप नियमित करत होते, तसेच गुरुचरित्रातील एक अध्यायही वाचत होते. अध्याय वाचतांना मला पुष्कळ शांत आणि उत्साही वाटायचे. मला दत्ताचा नामजप करायलाही पुष्कळ आवडायचे. बाळाचा जन्म गुरुवारी झाला; म्हणून आम्ही त्याचे नाव ‘अवधूत’ ठेवले.
१ आ. अवधूतच्या जन्मानंतर नृसिंहवाडी येथे ‘कालसर्पशांती’ विधी करणे आणि विधी करणार्या पुरोहितांनी ‘अवधूत फार तेजस्वी असून तो जन्मतः ज्ञान घेऊन आला आहे’, असे सांगणे : चि. अवधूत ६ मासांचा असतांना आम्ही नृसिंहवाडी येथे त्याच्यासाठी ‘कालसर्पशांती’ हा विधी केला होता. हा विधी एक घंटा चालू होता. लहानपणापासून अवधूत कधी एका जागी स्थिर बसायचा नाही आणि सारखा रडायचा; पण हा विधी चालू असतांना तो मांडीवर शांत बसला होता. तेव्हा ‘तो विधीतील चैतन्य अनुभवत होता’, असे मला जाणवले. विधी झाल्यानंतर तेथील पुरोहितांनी आम्हाला सांगितले, ‘‘हे बाळ फार तेजस्वी आणि चपळ आहे. याच्यात सूर्यासारखे तेज आहे. तो जन्मतः ज्ञान घेऊन आला आहे. तुम्ही त्याला शिकवायला न्यून पडाल !’’
प्रत्यक्षातही अवधूत फार हुशार आहे. त्याची बुद्धीमत्ता तल्लख आहे. त्याला एखादी गोष्ट सांगितली की, तो लगेच आत्मसात करतो. त्याची शरीरयष्टी नाजूक आहे; पण तो फार चपळ आहे. त्याच्या प्रत्येक कृतीतून ते जाणवते.
१ इ. रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर अवधूतने स्वतःमध्ये दत्ततत्त्व आल्याचे सांगणे : ऑगस्ट २०१९ मध्ये आम्ही रामनाथी आश्रमात जाऊन आल्यानंतर कधी कधी अवधूत मला म्हणतो, ‘‘माझे नाव ‘अवधूत’ आहे. माझे नाव दत्ताचे आहे. त्यामुळे ते नीट म्हणा. माझ्यामध्ये दत्ताचे थोडे तत्त्व आले आहे. देवाने मला आशीर्वाद दिला असून आध्यात्मिक त्रास न्यून करण्याची शक्ती दिली आहे.’’
२. अवधूतने वडिलांच्या शारीरिक त्रासांसाठी उपाय सांगितल्यावर काही वेळात त्यांचा त्रास न्यून होणे
‘मला आध्यात्मिक त्रासामुळे काही वेळा शारीरिक त्रास होतात. कधी माझे डोके फार दुखते, तर कधी माझ्या छातीत दुखते. हे मी अवधूतला सांगितले की, तो मनात देवाचे नाव घेतो आणि दुखणार्या भागावर विभूती लावतो. ‘थोड्या वेळाने तो त्रास न्यून होतो’, असे माझ्या लक्षात आले.’ – श्री. संजय जगताप (चि. अवधूतचे वडील), मिरज, सांगली.
३. आईचा आध्यात्मिक त्रास ओळखून तिच्यावर उपाय करून तो त्रास दूर करणारा बाल अवधूत !
३ अ. अवधूतने आईला होत असलेल्या त्रासाविषयी विचारून ‘तुझ्या त्रासावर उपाय सांगून तो न्यून करतो. देवाने मला तसा आशीर्वाद दिला आहे’, असे सांगणे : ‘जेव्हा माझे मन निराश होते, तेव्हा अवधूतकडे पाहिल्यावर माझ्या मनाला शांत आणि प्रसन्न वाटते. एकदा अवधूत मला म्हणाला, ‘‘आई, तुला काही त्रास होत असल्यास मला सांग. मी त्यावर उपाय सांगून तुझा त्रास न्यून करतो. देवाने मला तसा आशीर्वाद दिला आहे.’’ तेव्हा मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला; म्हणून मी त्याला मला होणार्या त्रासांविषयी सांगितले, ‘‘मला गेले २ – ३ मास रात्री झोप येत नाही आणि अस्वस्थ वाटते. मी सारखी उठून बसते. ‘माझा हा त्रास शारीरिक आहे कि आध्यात्मिक ?’, हे मला कळत नाही.’ त्यावर तो म्हणाला, ‘‘शारीरिक’ म्हणजे काय ?’’ मी त्याला सांगितले, ‘‘शरिरातील काही दुखत असेल, तर शारीरिक त्रास आणि आध्यात्मिक म्हणजे वाईट शक्तींचा त्रास.’’
३ आ. अवधूतने आईला होणारा त्रास ‘आध्यात्मिक त्रास’ असल्याचे सांगून त्यासाठी उपाय सांगणे आणि उपायांनंतर त्रास न्यून होऊन तिला रात्री शांत झोप येऊ लागणे : अवधूत मला म्हणाला, ‘‘तुला आध्यात्मिक त्रास होत आहे आणि त्यामुळे तुला झोप लागत नाही.’’ त्याने देवघरातून विभूती आणून मनातल्या मनात नामजप करून ती विभूती माझ्या आज्ञाचक्राला लावली. त्या वेळी मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या आणि काही सेकंद मला वेगळाच छानसा सुगंध आला. अवधूत मला म्हणाला, ‘‘येथे वाईट शक्तीचे स्थान आहे. आता देवाचे कवच निर्माण झाल्यामुळे तुला त्रास होणार नाही. आजपासून तुला शांत झोप लागेल !’’
प्रत्यक्षातही त्या दिवसापासून माझा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन मला शांत झोप लागत आहे.
३ इ. अवधूतचे बोलणे ऐकतांना ते दैवी वाटून भावजागृती होणे, त्याचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसणे; पण त्याच वेळी ‘त्याचे बोलणे खरे कि खोटे ?’, असा संभ्रम निर्माण होणे आणि तो अवधूतच्या लक्षात आल्यावर त्याने प्रार्थना करून परात्पर गुरुदेवांना विचारून घेण्यास सांगणे : अवधूतचे सर्व बोलणे ऐकत असतांना ‘ते बोलणे दैवी आहे’, असे मला जाणवले. तो प्रत्येक वाक्य बोलत असतांना माझी भावजागृती होत होती. त्याचे बोलणे एखाद्या साधू-संताप्रमाणे वाटत होते. त्याचा तोंडवळा आणि डोळे पुष्कळ तेजस्वी दिसत होते. त्याचे बोलणे आणि दिसणे मोहक होते; पण दुसरीकडे ‘हा बोलतो ते दैवी आहे कि असेच नुसते बडबडत आहे ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. माझ्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता. त्या क्षणी अवधूत मला म्हणाला, ‘‘तुला हे सर्व खोटे वाटत आहे ना; पण असे नाही. मी खरंच सांगत आहे. देवच मला सांगतो आहे. तुझा विश्वास बसत नाही, तर देवाला विचार.’’ त्याने मला डोळे मिटायला सांगितले आणि म्हणाला, ‘‘प.पू. डॉक्टरांना प्रार्थना कर आणि विचार, ‘अवधूत बोलतो, ते खरे आहे का ? त्यांना सर्व ठाऊक आहे.’’ मी डोळे मिटले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे नामजप केला आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून विचारले, ‘अवधूतच्या बोलण्याचे कारण मला कळत नाही.’ तेव्हा मला उत्तर आले, ‘हे आध्यात्मिक आहे.’ नंतर अवधूतने मला विचारले, ‘‘तुला प.पू. डॉक्टरांनी काय उत्तर दिले ?’’ मी सांगितले, ‘‘ते म्हणाले, ‘‘हे आध्यात्मिक आहे.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘बघ, मी सांगतो, ते खरे आहे ना ? आतातरी तुझा विश्वास बसला ना ?’’
३ ई. अवधूतच्या बोलण्यावर त्याच्या आईचा विश्वास बसत नसल्याने अवधूतने ‘तुला देवबाप्पाने उत्तर दिले आहे ना’, असे सांगून ‘आपली देवावर श्रद्धा असली पाहिजे’, असे सुचवणे : अवधूतचा आणि माझा असा संवाद झाल्यानंतर मी स्वयंपाकघरात गेले. तेव्हा माझ्या मनात विचार चालूच होते, ‘अवधूतचे बोलणे दैवी वाटते, तरी माझ्या मनात शंका का येते ? हे काय चालू आहे ?’ तेवढ्यात अवधूत स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, ‘‘अजूनही तुझ्या मनात तेच विचार चालू आहेत ना ? तू माझ्यावर विश्वास ठेव. मी खरे सांगतो आहे. तुला देवबाप्पानेही तसे उत्तर दिले आहे ना !’’ तेव्हा त्याला ‘देवावर श्रद्धा ठेव’, असे मला सांगायचे होते. त्या वेळी ‘माझ्या मनातील विचार त्याला कसे कळले ?’, असे वाटून मला फार आश्चर्य वाटले. तो मला नेहमी म्हणतो, ‘‘माझी देवावर श्रद्धा आहे. कोणाची श्रद्धा असो वा नसो, आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे.’’ (क्रमश: उद्याच्या अंकात)
– सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई), मिरज, सांगली. (जून २०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अवधूतविषयी काढलेले कौतुकोद्गार !
रामनाथी आश्रमातून निघतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अवधूतला पाहून म्हणाल्या, ‘‘अवधूत दैवी बालक आहे. त्याच्याकडे पाहून फार चांगले वाटते आणि चांगली स्पंदने येतात.’’
– सौ. वेदिका संजय जगताप (चि. अवधूतची आई), मिरज, सांगली.