नागपूर विद्यापिठाच्या विधीसभेची ‘ऑनलाईन’ बैठक तांत्रिक कारणामुळे एका घंट्यातच थांबवली !
नागपूर – शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या विधीसभेची ‘ऑनलाईन’ बैठक तांत्रिक कारणाने एका घंट्यातच थांबवण्यात आली. यावर सदस्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. ‘लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विद्यापीठ करत आहे’, असा आरोपही करण्यात आला. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असतांनाही कुलगुरूंनी ‘ऑफलाईन’ सभेस नकार दिल्याने सदस्यांनी या निर्णयाचा निषेध केला. आता ही बैठक २७ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.
२५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ऑनलाईन’ विधीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सर्व सदस्यांना ‘लिंक’ पाठवण्यात आली होती; मात्र बहुतांश सदस्यांना दिलेल्या ‘लिंक’वर बैठकीत सहभागी होता आले नाही. ‘जे सदस्य बैठकीत सहभागी झाले, त्यांना आवाज ऐकू येत नाही’, असे सदस्यांनी सांगितले. याविषयी कुलसचिवांशी सदस्यांनी संपर्क साधला; मात्र त्यांनी ‘विद्युत् पुरवठा खंडित होत असल्याने वारंवार अडथळे येत आहे’, असे स्पष्ट केले.