हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा नियोजित कार्यक्रम रहित करावा !
हिंदु जनजागृती समितीची प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे मागणी !
मुंबई, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन २६ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे अधिकारी संदीप वैशंपायन यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, धर्मप्रेमी सर्वश्री देवांग भट, माणिकसिद्ध भांबुरे आणि प्रदीप लोटलीकर हे उपस्थित होते.
मुनव्वर फारूकी यांचा ‘डोंगरी टू नोवेअर’ (Dongri to Nowhere) हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर या दिवशी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात, तर ३० ऑक्टोबर या दिवशी वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी नाट्यगृहाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी २०२१ मध्ये मुनव्वर फारूकी यांनी इंदूर (मध्यप्रदेश) येथील एका कार्यक्रमात हिंदु देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या प्रकरणी मुनव्वर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. मुनव्वर फारूकी यांची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबईतील सामाजिक अन् धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम रहित करावा. कार्यक्रम रहित न झाल्यास आंदोलन करावे लागेल.