एस्.टी. महामंडळाने १७ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला !

धाराशिव – एस्.टी. (राज्य परिवहन) महामंडळाने १७ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून येत्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ, नियमित उत्पन्नातील घट, त्यात कोरोना संसर्गाच्या कालावधीतील आर्थिक फटका यांमुळे महामंडळाला देखभाल-दुरुस्तीसह कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून ही भाडेवाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी जून २०१८ मध्ये महामंडळाने भाडेवाढ केली होती. त्यानंतर ३ वर्षांनंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये ही वाढ होणार आहे. ही वाढ करतांना हकीम समितीच्या शिफारसींचा अभ्यास करून प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. वर्ष २०१८ मध्ये करण्यात आलेल्या भाडेवाढीचाही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी महामंडळाला ४ सहस्र कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कोरोना काळातील दीड वर्षात हा तोटा ३ सहस्र कोटींहून अधिक झाला आहे. आतापर्यंत एस्.टी. महामंडळाला १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.