भावंडांच्या मुलांवर पितृवत् प्रेम करणारे आणि इतरांच्या आनंदात आनंद मानणारे श्री. कमलकिशोर आसारामजी तिवाडी (वय ६७ वर्षे) !
मूळच्या सोलापूर येथील साधिका अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी या रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात. कु. दीपा तिवाडी यांचे काका श्री. कमलकिशोर आसारामजी तिवाडी (वय ६७ वर्षे) हे सनातन संस्थेच्या कार्यात विविध प्रसंगी सहभागी होतात. कु. दीपा आणि त्यांची बहीण सौ. पौर्णिमा संदीप जोशी यांना त्यांच्या काकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
अधिवक्त्या (कु.) दीपा रमेशचंद्र तिवाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व
१ अ. बहुगुणी : ‘माझ्या काकांना घरकाम, स्वयंपाक, शिवणकाम, विद्युत यंत्रणेविषयीची कामे, नळदुरुस्ती इत्यादी अनेक गोष्टी येतात. घरातील गोष्टी नादुरुस्त झाल्यास काका सर्व दुरुस्त करतात.
१ आ. नवीन प्रयोग करून वेगवेगळ्या स्वादांतील आईस्क्रीम बनवणे : काका नाविन्यपूर्ण उपाययोजना करून व्यवसाय उत्तम रितीने करतात. आमचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. काकांनी बनवलेले खाद्यपदार्थ चविष्ट असतात. काकांनी नवीन प्रयोग करून विड्याच्या पानाच्या चवीचे आईस्क्रीम, चोको चॉकलेट आईस्क्रीम इत्यादी स्वादांतील आईस्क्रीम बनवले. ग्राहकांनाही हे आईस्क्रीम आवडले.
१ इ. नाट्य आणि संगीत या क्षेत्रांतील कार्यक्रमांचे आयोजक म्हणून काम करणे : वर्ष १९८० – २००० या कालावधीत काकांनी नाट्य आणि संगीत या क्षेत्रांतील अनेक उत्कृष्ट दर्जाच्या कार्यक्रमांचे आयोजक म्हणून काम केले. काका अशा कार्यक्रमांचे विज्ञापन नाविन्यपूर्ण आणि आकर्षक शब्दांत बनवून प्रसिद्ध करत असत. काकांचा प्रत्येक काम परिपूर्ण करण्यावर भर असतो.
२. पाल्यांना धाडसी आणि स्वावलंबी बनवणे
काकांनी आम्हा सर्व भावंडांना दुचाकी चालवायला शिकवली. काकांनी आमच्या मनातील वाहनाविषयी असलेली अनावश्यक भीती दूर करून आम्हाला धाडसी आणि स्वावलंबी बनवले.
३. इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणे
काका इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानतात. ‘कुटुंबातील कुणालाही काही न्यून पडू नये’, असा काकांचा विचार असतो. काका त्यांच्या मित्रांनाही साहाय्य करायला नेहमी तत्पर असतात. लहानपणापासून काकांच्या वागण्यातून मला ‘इतरांच्या आनंदात आनंद कसा मानायचा ?’, हे शिकायला मिळाले.
४. स्वतःला हृदयविकाराचा झटका आल्यावरही सर्वांशी हसत-खेळत बोलणे
वर्ष २००९ मध्ये घरातील २ कर्त्या पुरुषांचा अकाली मृत्यू झाला. त्या प्रसंगांतून आम्ही सावरलो नसतांनाच काकांना हृदयविकाराचा झटका आला. काका रुग्णालयात असतांना ‘घरातील इतरांना ताण येऊ नये’, या विचाराने ते त्या स्थितीतही आम्हा सर्वांशी हसत-खेळत बोलायचे.
५. सुनांना मुलींप्रमाणे सांभाळणे आणि घुंगट घेण्याची पद्धत बंद करणे
आम्ही मूळचे राजस्थान येथील असून आमच्या घरात ‘घुंगट पद्धत’ होती. (घुंगट पद्धत, म्हणजे घरातील सुनांनी सासू-सासरे आणि वडीलधारे यांच्या समोर जातांना डोक्यावरून पदर घेणे. हा पदर महिलेच्या नाकापर्यंत खाली असतो.) माझी आजी कडक शिस्तीची असल्यामुळे ती सांगेल, त्याप्रमाणे सर्व रितीरिवाज पाळावे लागत असत. घरातील दायित्व काकांकडे आल्यावर त्यांनी सुनांना आपल्या मुलींप्रमाणे सांभाळले आणि ‘मुलींनी वडिलांसमोर घुंगट घ्यायला नको’, असे सांगितले.
६. साधिकेने पूर्णवेळ साधना करण्याला प्रारंभी काकांची अनुमती नसणे; परंतु सनातनचा रामनाथी आश्रम पाहिल्यानंतर साधनेसाठी साहाय्य करणे
मी वर्ष २०११ मध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला आणि रामनाथी, गोवा येथील आश्रमात आले. त्या वेळी पूर्णवेळ साधना करण्यासाठी काकांची अनुमती नव्हती. आश्रमात आल्यानंतर मी ३ – ४ मासांनी काही दिवसांसाठी घरी गेले. त्या वेळी काकांनी माझ्या साधनेला विरोध केला नाही. उलट २ वेळा काका मला पोचवण्यासाठी रामनाथी आश्रमात आले. रामनाथी आश्रमात येऊन गेल्यानंतर आश्रम पाहून काकांना सनातन संस्थेचे कार्य आवडले. त्यामुळे काका आता इतरांना सांगतात, ‘‘प्रत्येकाने रामनाथी आश्रम पाहिला पाहिजे.’’ त्यानंतर काकांनी मला साधनेसाठी नेहमी साहाय्य केले. त्यामुळेच मी आश्रमात राहून आनंदाने साधना करू शकते.
७. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभागी होणे
७ अ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि शिबिरे यांसाठी प्रसाद अन् महाप्रसाद अर्पण स्वरूपात देणे : एकदा सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होती. त्या वेळी काकांनी सेवा करणार्या साधकांसाठी अर्पण स्वरूपात महाप्रसादाची सोय केली होती. त्यांना विविध शिबिरांसाठी प्रसाद किंवा महाप्रसाद अर्पण स्वरूपात देण्याविषयी विचारल्यास त्यांनी आतापर्यंत कधी नकार दिला नाही.
७ आ. शिबिरासाठी आलेल्या साधकांशी मोकळेपणाने बोलणे : दोन वर्षांपूर्वी सोलापूर येथे एक शिबिर होते. या शिबिरासाठी १० ते १२ साधक सोलापूर येथे आले होते. त्या साधकांच्या समवेत मीही घरी गेले होते. त्या वेळी सर्व साधक घरी आल्यानंतर काका सर्वांशी मोकळेपणाने आणि सहजतेने बोलत होते. नंतर काकांनी त्या सर्व साधकांना आवर्जून घरी जेवणासाठी बोलावले होते.
८. कृतज्ञता
‘हे भगवंता, तू आम्हाला असे बहुगुणी आणि पितृवत् प्रेम करणारे काका दिलेस. त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. हे गुरुमाऊली, ‘काकांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात साधनेविषयी योग्य दिशा मिळावी आणि त्यांची अध्यात्मात प्रगती होऊन मनुष्यजन्माचे सार्थक व्हावे. त्यांच्यावर आपली कृपादृष्टी सदैव असू द्यावी’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
सौ. पौर्णिमा संदीप जोशी (श्री. कमलकिशोर यांची पुतणी)
१. काकांनी सर्व भावंडांना आई आणि वडील या दोघांचेही प्रेम देणे
आमच्या लहानपणी काका कुठेही बाहेरगावी गेल्यास आमच्यासाठी खेळणी आणत असत. ‘काका गावाहून येणार’, असे कळल्यावर आम्ही सर्व जण त्यांची आतुरतेने वाट पहात बसायचो. काकांनी आम्हा भावंडांना आई आणि वडील या दोघांचे प्रेम दिले आहे.
२. काकांनी विविध गोष्टी शिकवणे
काकांनी वडिलांचे कर्तव्य पार पाडलेच; परंतु त्यांनी एका आईप्रमाणे मला घडवले आहे. काकांनी मला रांगोळी काढणे, चहा बनवणे, स्वयंपाक बनवणे आदी गोष्टी शिकवल्या. पोळ्या कशा लाटायच्या आणि भाजायच्या हेही काकांनीच मला शिकवले.
‘देवाने काकांना सतत आनंदी ठेवावे आणि ‘माझ्या काकांसारखे काका सर्वांना मिळावेत’, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २२.९.२०२१)
श्री. तिवाडी यांच्यातील निरपेक्ष प्रेमामुळे एकत्र कुटुंब टिकून रहाणे !‘आमचे एकत्र कुटुंब आहे. माझे बाबा (कै. रमेशचंद्र तिवाडी), दोन काका (कै. नंदकिशोर तिवाडी आणि श्री. कमलकिशोर तिवाडी) एक आत्या (श्रीमती ललिता जोशी) आणि आम्ही ६ भावंडे (मोठ्या काकांची २ मुले (श्री. लक्ष्मीकांत तिवाडी आणि श्री. श्रीकांत तिवाडी), लहान काकांची १ मुलगी (कु. पूर्वा तिवाडी) आणि आम्ही तिघे (मी, बहीण (सौ. पूर्णिमा जोशी) आणि एक भाऊ (श्री. तेजस तिवाडी)) असे सर्व जण एकत्र रहातो. माझी आजी (वडिलांची आई) (कै. (श्रीमती) कलावती तिवाडी) म्हणत असे, ‘एकत्र कुटुंबात राहिल्याने कठीण काळात एकमेकांना आधार असतो.’ वर्ष २००५ मध्ये माझी आजी आणि माझ्या आत्यांचे पती (सीताराम जोशी) यांचे निधन झाले. त्यानंतर वर्ष २००८ मध्ये माझे बाबा आणि वर्ष २००९ मध्ये माझे मोठे काका यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे दायित्व एकट्या काकांवर आले. काकांनी आम्हा सर्व भावंडांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळले. काकांमधील निरपेक्ष प्रेमामुळेच आजही आम्ही एकत्र कुटुंबात रहात आहोत.’ – अधिवक्त्या (कु.) दीपा रमेशचंद्र तिवाडी |