मुसलमानांच्या प्रार्थनांचा गर्भितार्थ !

संपादकीय

हिंदूंनी साधना करून राष्ट्ररक्षणासाठी प्रार्थना केली, तर ती फलद्रूप होईल !  

पाकचे केंद्रीय गृहमंत्री शेख रशीद अहमद

टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाक यांच्यात २४ ऑक्टोबर या दिवशी झालेला सामना पाकिस्तानने भारताचा पराभव करून मोठ्या फरकाने जिंकला. ‘हा सामना रहित करावा’, अशी मागणी देशभक्त हिंदूंकडून केली जात होती. पाकपुरस्कृत आतंकवादी भारतात, विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारे आतंकवादी कारवाया करत आहेत, गेल्या काही दिवसांत हिंदू आणि शीख यांना वेचून वेचून लक्ष्य केले जात आहे, ते पहाता हा सामना भारताने न खेळणेच योग्य होते. आतापर्यंतचा इतिहास आहे की, भारत आणि पाक यांच्यातील क्रिकेट सामन्याकडे ‘क्रिकेट’ ऐवजी ‘युद्ध’ म्हणूनच पाहिले जाते. २४ ऑक्टोबरचा सामनाही त्याला अपवाद नव्हता; कारण पाकचे केंद्रीय गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी केलेले विधान. पाकने सामना जिंकल्यावर अहमद म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला, त्याला सलाम करतो. पाकिस्तानचा संघ आणि मुसलमान बांधव यांनाही शुभेच्छा !  जगातील सर्व इस्लामी जनतेचा हा विजय आहे. भारतातील मुसलमान बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या संघासमवेत होत्या. केवळ भारतात नाही, तर जगभरातील मुसलमान बांधव पाकिस्तानी संघाच्या पाठीशी होते.’’ यातून स्पष्ट होते की, हा सामना एका देशाचा संघ आणि दुसर्‍या देशाचा संघ असा नव्हता, तर हिंदू आणि मुसलमान यांच्यात होता. यापूर्वीही पाकच्या एका नेत्याने भारत-पाक युद्धाच्या संदर्भात विधान करतांना ‘पाकमधील ५ कोटीच नव्हे, तर भारतातील २० कोटी मुसलमानही पाकच्या बाजूने युद्धात लढतील’, असे म्हटले होते.

‘मौनं सर्वार्थसाधनम् ।’

पाकमधील राजकीय नेते भारतातील मुसलमानांना ‘ते त्यांच्या बाजूचे आहेत’, असे स्पष्टपणे समजतात आणि उघडपणे बोलतात, तर दुसरीकडे भारतात भारत आणि पाक यांच्यातील सामना पाकने जिंकल्यावर अनेक ‘छोटी  पाकिस्ताने’ म्हटल्या जाणार्‍या भागांमध्ये फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. इतर वेळेसही धार्मिक मिरवणुका अथवा कार्यक्रम येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे शेख रशीद अहमद यांनी जो प्रार्थनेचा दावा केला आहे, तो नाकारता येण्यासारखा नाही, असेच कुणीही म्हणेल. भारत आणि पाक यांच्यातील क्रिकेटच्या सामन्यात जर अशी स्थिती असेल, तर भारत-पाक यांच्यात युद्ध झाले, तर काय असेल, याची कल्पना येते. इतकेच नव्हे, तर केवळ प्रार्थनेच्या स्तरावर नाही, तर प्रत्यक्ष अंतर्गत उठाव कुणी केला, तर आश्चर्य वाटू नये. सीमेवर पाकशी भारतीय सैन्य युद्ध करत आहे, तर देशांतर्गत पाकच्या समर्थकांशी भारतीय पोलीस लढत आहेत, असे चित्र दिसू शकते. काश्मीरमध्ये तर हे नेहमीच दिसत असते. तेथे सुरक्षादलांची पाकपुरस्कृत आतंकवाद्यांसमवेत चकमक होत असते, तेव्हा देशद्रोही काश्मिरी मुसलमान भारतीय सुरक्षादलांवर दगडफेक करत असतात, हे अनेकदा पहाण्यात आले आहे. अहमद यांच्या विधानाचा अद्यापतरी भारतातील मुसलमान संघटना, त्यांचे नेते, धार्मिक नेते यांनी विरोध केलेला नाही किंवा अहमद यांना ‘भारतातील मुसलमान पाकसाठी नाही, तर भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होते’, अशा शब्दांत खडसावलेले नाही. त्यामुळे ‘मौनं सर्वार्थसाधनम्।’ (मौनामुळे सर्व कामे साध्य होतात) असे संस्कृत सुवचन आहे, त्याचा प्रयत्य येतो, हे हिंदूंनी आणि विशेषतः ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी लक्षात घ्यायला हवे.

चीनप्रमाणे उपाययोजना हव्यात !

देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आतापासून कठोर उपाययोजनाही करणे आवश्यक आहे. सध्याचे केंद्रातील सरकार काही प्रमाणात उपाययोजना करत असले, तरी ते अपुरे आहे. याहीपेक्षा कठोर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे अन्यथा एकेका घरातील माणूस पुढील अंतर्गत युद्धात कामी आला, तर आश्चर्य वाटू नये. चीनने हा धोका लक्षात घेऊन आधीच कठोर उपाययोजना करण्यास चालू केले. त्यामुळे चीनमध्ये जिहादी आतंकवाद अस्तित्वात नाही किंवा त्याचा प्रभाव तरी नाही. भारतातील सध्याच्या शासनकर्त्यांना अनेक मर्यादा असल्याने ते उपाययोजना काढण्यास हतबल आहेत, असे म्हणता येईल. भारताने चीनच्या पावलावर पाऊल टाकले पाहिजे, असे आवश्यक नसले तरी काही कठोर कायदे बनवणे आवश्यक आहेत. तसेच ज्या ठिकाणी कट्टरतेचे शिक्षण मिळते, ती शिक्षणव्यवस्था बंद करणे आवश्यक आहे. जे अशा प्रकारचे शिक्षण देत असतात, त्या शिक्षकांवर बंधने घालणे आदी उपाय काढता येऊ शकतात.

भक्तांच्या प्रार्थना देव ऐकतो !

शेख रशीद अहमद यांच्या प्रार्थनेच्या विधानावर अन्य एका दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. जर पाक आणि अहमद म्हणतात त्याप्रमाणे ‘भारतातील मुसलमानांच्या प्रार्थनांमुळे पाकिस्तानचा क्रिकेट संघ सामना जिंकला’ असे असेल, तर ‘भारतियांनी केलेल्या प्रार्थना त्या तुलनेत अल्प ठरल्या आहेत’, असे म्हणावे लागेल. मुळात प्रार्थना या निष्काम आणि आध्यात्मिक उन्नतीतील अडथळे दूर करण्यासाठी अन् देवाचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी केल्या गेल्या पाहिजेत. तरी जे कुणी क्रिकेटच्या सामन्यासारख्या गोष्टींसाठी प्रार्थना करत असेल आणि ती फलद्रूप होत नसेल, तर त्यामागील त्याची आर्तता, भाव, भक्ती अल्प पडत आहे, असेही समजले पाहिजे. भारतियांमध्ये, विशेषतः हिंदूंमध्ये मुसलमानांच्या तुलनेत धर्मपालन, धर्माचरण हे अगदी अल्प आहे. हिंदू स्वतःला पुरोगामी अधिक समजतात आणि धर्माविषयी बुद्धीचा किस पाडून शंका उपस्थित करतात. या उलट हिंदूंनी श्रद्धा ठेवून साधना केली, तर त्यांच्या प्रार्थनेमध्ये बळ येऊ शकते. असे झाले, तर क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी नाही, तर पाकचे अस्तित्व नष्ट होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची बुद्धी होईल आणि देव साधना करणार्‍या भक्तांचे ऐकत असल्याने ती प्रार्थना फलद्रूपही होईल, हे लक्षात घ्यायला हवे.