एस्.एस्.आर्.एफ्.च्या युनायटेड किंगडम् येथील साधिका सौ. देवयानी होर्वात यांनी स्वभावदोषावर केलेली मात आणि त्यांना आलेली अनुभूती
१. आरंभी स्वभावदोषांमुळे बालसाधकांना त्यांच्या चुका सांगता न येणे, स्वभावदोषावर मात करून बालसाधकांना चुका सांगितल्यावर त्यांनी योग्य आचरण करणे आणि त्यामुळे सेवा परिपूर्ण होणे
‘माझ्यात ‘भिडस्तपणा’ आणि ‘अती विचार करणे’ हे स्वभावदोष असल्यामुळे मला अन्य साधकांना त्यांच्या चुका सांगणे कठीण वाटते. रामनाथी (गोवा) आश्रमातील दुपारच्या भोजनानंतर माझ्याकडे भोजनकक्ष आवरण्याची सेवा असते. या सेवेत मला साहाय्य करण्यासाठी बालसाधकांचे नियोजन असते; परंतु माझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषामुळे बालसाधकांकडून सेवेत होत असलेल्या चुका आणि त्यांनी केलेल्या अपूर्ण सेवा यांविषयी मी त्यांना सांगू शकत नव्हते. काही दिवसांपूर्वी मी माझ्या या स्वभावदोषांवर मात करण्याचा प्रयत्न केला आणि बालसाधकांना त्यांच्या चुका सांगितल्या. त्यामुळे बालसाधकांनी योग्य आचरण केले आणि आमची सेवा परिपूर्ण झाली. त्यानंतर मी श्री अन्नपूर्णादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्ती केली.
२. अनुभूती – सेवा परिपूर्ण झाल्यामुळे श्री अन्नपूर्णादेवीच्या मुखावर प्रसन्नता झळकत असल्याचे जाणवणे
आश्रमातील भोजनकक्षात श्री अन्नपूर्णादेवीचे चित्र असलेला फलक आहे. त्यावर जेवण्यापूर्वी म्हणायचा श्लोकही लिहिलेला आहे. ज्या वेळी मला स्वयंपाकघरात सेवा असते, त्या वेळी मी अन्नपूर्णादेवीच्या चित्रासमोर प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते. एक दिवस सेवा झाल्यावर मी श्री अन्नपूर्णादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत होते. त्या वेळी मला श्री अन्नपूर्णादेवीच्या चित्रात जिवंतपणा आल्याचे जाणवले. देवीच्या मुखावर स्मितहास्य होते. तेव्हा ‘स्वयंपाकघरातील सेवा परिपूर्ण होत असल्याने देवी प्रसन्न झाली आहे’, असे मला जाणवले. मला तिथे अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवत होते. त्यानंतर मला आतून पुष्कळ प्रसन्न वाटत होते. मला प्रोत्साहित करणारी सुंदर अनुभूती दिल्यामुळे मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. देवयानी होर्वात, स्कॉटलंड, युनायटेड किंगडम्. (२१.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक