दिवाळी आणि किल्ला !
दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी म्हटले की, अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या रहातात. त्यात नवीन कपडे खरेदी करणे, सुटीची मौजमजा, आवडीचे पदार्थ खाणे; मात्र या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीचा हळूहळू विसर पडत चालला आहे, तो म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याचा ! सध्याच्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना दिवाळीत किल्ला कसा बनवायचा ? हे न शिकवल्यामुळे ‘ही कला लुप्त होणार कि काय ?’ अशी भीती वाटू लागली आहे. दिवाळीत किल्ला बनवण्याची प्रथा केवळ महाराष्ट्रात आहे, याचा युवा पिढीला सार्थ अभिमान असायला हवा. मुलांच्या हातात भ्रमणभाष आल्यापासून त्यांना मातीत हात घालण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे भविष्यात मुलांच्या मनातील या शूरवीरांच्या मातीशी नाळ तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचे कर्तृत्व, तसेच अफझलखान, शाहिस्तेखान यांसारख्या शत्रूंवर महाराजांनी मिळवलेला विजय हा इतिहास मुलांना समजावून त्यातूनच येणार्या नव्या पिढीमध्ये देशप्रेम अन् राष्ट्रप्रेम जागृत होण्यास साहाय्य होईल.
किल्ला बनवण्याच्या कृतीमुळे मुलांमध्ये कौशल्य विकासासह इतरांना घेऊन एकत्रितपणे काम करणे, इतरांची मते जाणून घेणे यांसारख्या विविध गुणांचा विकास होण्यास साहाय्य होईल. सध्या पालकांच्या वयोगटात असलेल्या पिढीतील अनेकांनी किल्ला बनवण्यातील आनंद मनसोक्त घेतलेला आहे, मग आपल्या पाल्यांनाही तो आनंद घेण्यास उद्युक्त करायला हवे. यातून त्यांना खर्या इतिहासाची आठवण होण्यासह त्यांच्यातील शौर्य जागृत होण्यास निश्चितच लाभ होईल. दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवून आर्थिक हानी आणि हवा अन् ध्वनी यांचे प्रदूषण करण्याऐवजी, मुलांकडून किल्ले बनवून घेतल्यास खर्या अर्थी लाभदायी होईल.
अनेक शहरांमध्ये उत्कृष्ट किल्ले बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये आपल्या मुलांना आवर्जून भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करा. त्या निमित्ताने मुलांमधील आनंद आणि कुतूहल जागृत होईल. आतापर्यंत आपण आपल्या पाल्याला सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना किल्ला बनवण्याच्या माध्यमातून जीवनातील एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यायला शिकवा; म्हणजे त्यांना पुढील जीवनात त्याचा पुष्कळ लाभ होईल.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर