परभणी येथे लिंगायत महामोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी महामोर्चा !
परभणी – ‘महाराष्ट्रात लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांकांचा दर्जा लागू करावा आणि लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी राज्यशासनाने केंद्रशासनाकडे शिफारस करावी’, यासह अन्य मागण्यांसाठी २४ ऑक्टोबर या दिवशी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘राज्यव्यापी महामोर्चा’ काढण्यात आला.
शहरातील शनिवार बाजार येथून निघालेल्या या महामोर्च्यात सहस्रो समाज बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या. शहरातील विविध मार्गांनी हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचला. या महामोर्च्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील आंदोलन मैदानावर सभेत रूपांतर झाले.
या सभेत विविध वक्त्यांनी सरकारच्या उदासीनतेवर टीका केली. ‘गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी लिंगायत बांधव देशाच्या विविध राज्यांत आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत १० मोर्चे काढण्यात आले. प्रत्येक महामोर्च्यात लाखो लिंगायत बांधव सहभागी झाले, तरी केंद्र आणि राज्य सरकारने लिंगायतांच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार केलेला नाही’, असा आरोप समन्वय समितीच्या संतप्त पदाधिकार्यांनी केला.