‘सेवा करतांना साधकांना सेवा परिपूर्ण करण्यासाठी सुचणारी सूत्रे हे ईश्वरी ज्ञान असते’, असे जाणवणे

कु. दीपाली होनप

२ – ३ दिवसांपूर्वी माझा भाऊ राम (सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप) मला म्हणाला, ‘‘एकदा एका प्रश्नाचे सूक्ष्मातून उत्तर मिळवतांना मला ३ – ४ ओळींचे ज्ञान मिळाले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आणखी खोल जाऊन ज्ञान मिळवायला हवे.’ मग मला त्यावर आणखी ज्ञान मिळाले. त्यानंतर मला पुन्हा वाटले, ‘आणखी खोल जाऊन ज्ञान मिळवायला हवे.’ त्यानंतर मला आणखी ज्ञान मिळाले. असे ३ – ४ वेळा केल्यावर मला त्या प्रश्नाचे सूक्ष्मातून परिपूर्ण उत्तर मिळाले. तेव्हा ‘अवघड गणित सोडवतांना आपण टप्प्याटप्प्याने ते सोडवत जातो’, तसे मला वाटले.’’

श्री. राम होनप

हे ऐकून माझ्या मनात पुढील विचार आले, ‘सनातन’चे ग्रंथ किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’ यांसाठीच्या लिखाणाचे संकलन करतांना प्रारंभी माझ्याकडे कच्ची संगणकीय धारिका आलेली असते. तिच्यात अनेक सुधारणा करायच्या असल्याने त्या धारिकेचे संकलन करणे, म्हणजे एक अवघड गणित सोडवण्यासारखे असते.

प्रार्थना करून सेवा करायला आरंभ केल्यावर त्यातील एकेक पायरी पुढे गेल्यावर, म्हणजे ‘लिखाणातील अनावश्यक भाग पुसणे, शुद्धलेखन आणि व्याकरण पडताळणे, वाक्यरचना नीट करणे, मथळे देणे’ इत्यादी केल्यावर ते गणित सुटत जाते. अंतिमतः संकलन केलेली धारिका पाहिल्यावर एक अवघड गणित सोडवल्याचा आनंद मिळतो. ही सेवा करतांना टप्प्याटप्प्याने अधिक खोलवर जावे लागते. संकलनाच्या प्रत्येक टप्प्याला ईश्वरच सूत्रे सुचवत असल्याने ते अवघड गणितही सोडवता येते. सेवा परिपूर्ण करण्यासाठी ईश्वराने सुचवलेली सूत्रे, म्हणजे ईश्वरी ज्ञानच आहे; कारण ईश्वरानेच मानवाला बुद्धी दिली आहे आणि ती सत्सेवेसाठी झिजवल्याने ईश्वर सेवेतील सूत्रे सुचवून साधकांना ज्ञानच देत असतो.’

यावरून ‘सेवा करतांना सेवा परिपूर्ण करण्यासाठी सुचणारी सूत्रे हे ईश्वरी ज्ञान असते’, असे मला जाणवले.

– कु. दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक