६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप (वय ८ वर्षे) याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात झालेले आमूलाग्र पालट
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे दर्शन आणि आशीर्वाद, परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय यांमुळे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप (वय ८ वर्षे) याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात झालेले आमूलाग्र पालट
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अवधूत जगताप हा एक आहे !
मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. अवधूत जगताप याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये कालच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. आजच्या अंकात, योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर कु. अवधूतचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात कसे पालट झाले ? याविषयी पाहूया.
कु. अवधूत जगताप याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/521703.html
१. आरंभी अवधूतला होत असलेले आध्यात्मिक त्रास
‘पूर्वी कु. अवधूतला पुष्कळ आध्यात्मिक त्रास व्हायचा. तो लहानपणापासून आम्हाला पुष्कळ त्रास देत होता. सांगितलेले काहीच तो ऐकायचा नाही आणि उलट बोलायचा. तो हट्टीपणा करायचा. त्याच्या मनाविरुद्ध काही झाले, तर तो चिडून आरडाओरडही करायचा. त्याला राग आला की, ‘तो वस्तूंची आदळआपट करणे, समोरच्या व्यक्तीला मारणे’, असे करायचा. त्याचा हा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यामुळे त्याला सांभाळतांना माझी पुष्कळ चिडचिड होत होती.
२. वर्ष २०१७ मध्ये योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या दर्शनानंतर अवधूतमध्ये झालेले पालट
२ अ. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे दर्शन आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद ! : वर्ष २०१७ मध्ये योगतज्ञ दादाजी वैशंपायन औदुंबर येथे आले असतांना आम्हाला त्यांच्या दर्शनाचा योग आला. अवधूतने त्यांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या वेळी योगतज्ञ दादाजींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ‘तू मोठा होशील’, असा आशीर्वाद दिला. दादाजी आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्हाला सोन्यासारखा मुलगा झाला आहे. चांगले झाले. तो वेगळाच आहे.’’
२ आ. योगतज्ञ दादाजी यांच्यातील चैतन्यामुळे अवधूतमध्ये पालट होऊन तो शांत आणि समंजस होणे : योगतज्ञ दादाजी यांचे दर्शन झाल्यानंतर अवधूतमध्ये आमूलाग्र पालट झाला. त्याचा चिडचिडेपणा न्यून होऊन तो शांत झाला. पूर्वी तो कुठलीच गोष्ट ऐकत नव्हता. आता तो सर्वांचे ऐकतो आणि सांगितलेले काम करतो. त्याचा समंजसपणा वाढला आहे. घरातील सर्वांना अवधूतमध्ये झालेले पालट पाहून आश्चर्य वाटले.
योगतज्ञ दादाजींचे दर्शन, त्यांच्यातील दैवी चैतन्य आणि त्यांचा आशीर्वाद यांमुळे अवधूतला होत असलेला आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात पालट झाले.
३. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या उपायांमुळे अवधूतचे त्रास न्यून होणे
३ अ. मंत्रजप आणि उपाय यांमुळे अवधूतची पोटदुखी दूर होणे : वर्ष २०१८ मध्ये अवधूत ५ वर्षांचा असतांना त्याला पोटदुखीचा पुष्कळ त्रास होत होता. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्याला मंत्रजप आणि काही उपाय करण्यास सांगितले. ते तो नियमित करायचा. पोट दुखायला लागले की, तो भ्रमणभाषवर मंत्रजप लावून ऐकायचा. त्यानंतर त्याचा पोटदुखीचा त्रास पूर्णपणे बरा झाला.
३ आ. मध्ये मध्ये अवधूतचा त्रास वाढत असल्याने परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘बालग्रह पीडा विधी’ हा विधी करण्यास सांगणे आणि त्यानंतर अवधूतमध्ये पालट होणे : काही मासांनंतर मध्ये मध्ये अवधूतचा त्रास वाढायचा. त्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी घरात ‘बालग्रह पीडा विधी’ हा विधी करण्यास सांगितले. या विधीचे मंत्र चालू असतांना अवधूत हात जोडून शांतपणे बसला होता आणि मधे मधे नामजप करत होता. होम चालू असतांना त्याला धुराचा त्रास होत होता; पण तो चिडचिड न करता आपणहून होमात आहुती घालत होता. इतर वेळी तो क्षणभरही एका जागेवर बसत नाही. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रातील सामर्थ्य आणि चैतन्य यांमुळे तो सांगितलेली कृती लगेच करू लागला. या विधीनंतर अवधूतमध्ये बरेच पालट झाले.
३ इ. शाळेत गेल्यावर वर्गातील मुलांमध्ये न मिसळणार्या अवधूतमध्ये विधीनंतर झालेले पालट शाळेतील शिक्षिकेच्याही लक्षात येणे आणि त्यांनी तसे बोलून दाखवणे : पूर्वी अवधूत शाळेत गेल्यावर वर्गात कुणाशीही, त्याच्या शिक्षिकेशीही बोलायचा नाही. तो वर्गातील मुलांमध्ये मिसळायचा नाही आणि गप्प रहायचा. विधीनंतर अवधूतमध्ये पालट झाले. ते त्याला शिकवणार्या शिक्षिकेच्याही लक्षात आले. त्या मला म्हणाल्या, ‘‘आता तो शाळेत माझ्याशी आणि सर्व मुलांशी बोलतो. तो मुलांमध्ये मिसळतो आणि मला मुलांची गार्हाणीही सांगतो. तो अभ्यासात पुष्कळ हुशार आहे.’’
‘एरव्ही कुणाशीही न बोलणार्या अवधूतमध्ये एवढा पालट झाला’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. तो पुष्कळ गुणी आहे. त्याच्या बाईंना तो पुष्कळ आवडतो.
– सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई), मिरज, सांगली. (३०.८.२०१९)
|