विविध आस्थापनांच्या दिवाळीनिमित्तच्या विज्ञापनांत ‘कुंकू’ न लावलेल्या ‘मॉडेल्स’ दाखवून हिंदु धर्मशास्त्राला डावलण्याचा प्रकार !

आस्थापनांच्या हिंदुद्रोही प्रकाराला ‘#NoBindiNoBusiness’ या हॅशटॅगचा वापर करत हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांच्या मोहिमेला सामाजिक माध्यमांवर उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु धर्मावरील अशा प्रकारच्या सांस्कृतिक आक्रमणांना विरोध करणार्‍या शेफाली वैद्य यांचे अभिनंदन ! असे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती होय ! – संपादक

मुंबई, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळीनिमित्त विविध आस्थापनांकडून वस्त्रे, दागिने आदी उत्पादनांची विज्ञापने प्रसारित करण्यात येत आहेत. दिवाळीसारख्या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्त विज्ञापन करत असतांना त्यामध्ये हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या ‘कुंकू’ या आचारविधीलाच डावलण्यात येत आहे. या विज्ञापनांमध्ये काम करणार्‍या ‘मॉडेल्स’ कुंकू लावत नाहीत. हिंदूंच्या सणांनिमित्त विज्ञापन करतांना हिंदूंच्या धर्मशास्त्रालाच डावलण्याचा गंभीर प्रकार यांतून दिसून येत आहे. प्रसिद्ध लेखिका आणि हिंदुत्वनिष्ठ शेफाली वैद्य यांनी सामाजिक माध्यमांवरून या प्रकाराला जोरदार विरोध दर्शवला असून त्यांच्या ‘#NoBindiNoBusiness’ या ‘हॅशटॅग’ला सामाजिक माध्यमांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शेफाली वैद्य यांनी संबंधित आस्थापनांच्या विज्ञापनांची चित्रे ‘ट्वीट’ करत त्यास विरोध दर्शवला आहे. यांमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे छायाचित्र असलेल्या ‘पीएन्जी’ (पू.ना. गाडगीळ) आस्थापनाचे दागिन्यांचे विज्ञापन, तसेच ‘तनिष्क’ आणि ‘पी.सी. चंद्रा’ यांच्या दागिन्यांच्या विज्ञापनांचा समावेश आहे. यांतील गंभीर सूत्र म्हणजे दिवाळीसारख्या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्त विज्ञापन करतांना या विज्ञापनांतील एकाही महिलेने कुंकू किंवा टिकली लावलेली नाही.

हिंदूंचे पैसे पाहिजेत, मग हिंदूंच्या परंपरांचा सन्मान करायला शिका ! – शेफाली वैद्य

प्रसिद्ध लेखिका आणि हिंदुत्वनिष्ठ शेफाली वैद्य

‘तुम्ही कुंकू लावा, नाहीतर झिंज्या सोडून नाचा, तो तुमचा प्रश्‍न आहे. मी काही फतवा काढलेला नाही की, सर्व बायकांनी टिकली लावलीच पाहिजे. फतवा काढणारे लोक वेगळे असतात. तेव्हा तुम्ही ‘इट्स कल्चरल यू नो’ (‘सांस्कृतिक परंपरा’ या नावाने समर्थन करणे) बुरख्यापासून सगळ्यांचे समर्थन करता. मी स्पष्टपणे सांगते की, दिवाळी हा हिंदूंचा सण आहे. हिंदूंचे पैसे पाहिजेत ना, मग हिंदूंच्या परंपरांचा सन्मान करायला शिका ! आमच्या सणांमध्ये कुंकू न लावलेल्या बायका सूतकी तोंडवळ्याने वावरत नाहीत, मग विज्ञापनात तरी असे का असावे ? माझे कष्टाचे पैसे आहेत, ते कशावर व्यय करायचे, ते मी ठरवीन. सामाजिक माध्यमांवर जेव्हा हा विषय चर्चिला गेला, तेव्हा अनेक लोकांना माझ्यासारखेच वाटत होते. त्यामुळे मी केवळ त्या खदखदीला वाट करून दिली आहे. आतापर्यंत हा ‘हॅशटॅग’ जवळजवळ ७ लाख लोकांनी बघितला आहे. यांतील अर्ध्या लोकांनी जरी हे खरोखर मनावर घेतले, तरी ‘ब्रँड्स’ना (प्रतिष्ठित आस्थापनांना) विज्ञापन पालटावेच लागेल.